श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग १ ☆ श्री अरविंद लिमये ☆
‘तो’ म्हणजे अर्थातच देव..! त्याची माझ्या मनात नेमकी कधी प्रतिष्ठापना झाली हे नाही सांगता यायचं. की कशी झाली असेल हे मात्र सांगता येईल. ‘देव’ ही संकल्पना माझ्या मनात कुणीही जाणीवपूर्वक,अट्टाहासाने रुजवलेली नाहीये. ती आपसूकच रुजली गेली असणार. दत्तभक्त आई-वडील, घरातले देवधर्म, नित्यनेम, शुचिर्भूत वातावरण, हे सगळं त्याला निमित्त झालं असणारच. पण रुजलेला तो भाव सर्वांगानं फुलला तो कालपरत्त्वे येत गेलेल्या अनुभूतीमुळेच!
हे रुजणं, फुलणं नेमकं कधीपासूनचं याचा शोध घेता घेता मन जाऊन पोचतं ते मनातल्या सर्वात जुन्या आठवणीपर्यंत.मी दोन अडीच वर्षांचा असेन तेव्हाच्या त्या काही पुसट तर काही लख्ख आठवणी. आम्ही तेव्हा नृसिंहवाडीला होतो. वडील तेथे पोस्टमास्तर होते. सदलगे वाड्याच्या भव्य वास्तूच्या अर्ध्या भागात तेव्हा पोस्ट कार्यालय होतं. आणि आमच्यासाठी क्वार्टर्सही.वडील आणि आई दोघांचंही नित्य दत्तदर्शन कधीच चुकायचं नाही. रोजच्या पालखीला आणि धुपारतीला वडील न चुकता जायचे.बादलीभर धुणं आणि प्यायच्या पाण्यासाठी रिकामी कळशी बरोबर घेऊन आई रोज नदीवर जायची. धुतलेल्या कपड्यांचे पिळे आणि भरलेली कळशी घेऊनच ती पायऱ्या चढून वर आली की आधी दत्तदर्शन घ्यायची आणि मग उजवं घालून परतीची वाट धरायची.आम्ही सर्व भावंडे तिची वाट पहात दारातच ताटकळत उभे असायचो.त्या निरागस बालपणातली अशी सगळीच स्मृतिचित्रं आजही माझ्या स्मरणात मला लख्ख दिसतात.त्यातलं एक चित्र आहे आम्हा भावंडांच्या ‘गोड’ हट्टाचं! पोस्टातली कामं आवरून वडील आत येईपर्यंत आईने त्यांच्या चहाचं आधण चुलीवर चढवलेलं असायचं. तो उकळेपर्यंत आई देवापुढे दिवा लावून कंदील पुसायला घ्यायची.अंधारून येण्यापूर्वी कंदील लावला की रात्रीच्या जेवणासाठी स्वयंपाकाची तयारी सुरू करायची. तोवर चहा घेऊन देवाकडे जाण्यासाठी वडिलांनी पायात चप्पल सरकवलेल्या असायच्या.
“मुलांनाही बरोबर घेऊन जा बरं. म्हणजे मग मला स्वैपाक आवरून, तुम्ही येईपर्यंत जेवणासाठी पानं घेऊन ठेवता येतील” आईचे शब्द ऐकताच आम्हा भावंडांच्या अंगात उत्साह संचारायचा.
“चला रेs” वडीलांची हाक येताच आम्ही आनंदाने उड्या मारत बाहेर पडायचो.त्या आनंदाचं अर्थातच देवदर्शनाची ओढ हे कारण नसायचं.त्या वयात ती ओढ जन्माला आलेलीच नव्हती. त्या आनंद, उत्साहाचं कारण वेगळंच होतं. वडिलांच्या मागोमाग आम्हा बालगोपालांची वरात सुरक्षित अंतर ठेवून उड्या मारत मारत सुरू होई.दुतर्फा पेढेबर्फीच्या दुकानांच्या रांगा आज आहेत तिथेच आणि तशाच तेव्हाही होत्या. रस्ताही आयताकृती घोटीव दगडांचा होता. ती दुकानं जवळ आली की माझी भावंडं मला बाजूला घेऊन कानात परवलीचे शब्द कुजबुजायची. मी शेंडेफळ असल्याने त्यांची हट्ट करायची वयं उलटून गेलेली आणि मी हट्ट केला तर वडील रागावणार नाहीत हा ठाम विश्वास. मग त्यांनी पढवलेली घोषणा ऐकताच नुसत्या कल्पनेनेच माझ्या तोंडाला पाणी सुटायचं.डोळे लुकलुकायचे.न राहवून आपल्या दुडक्या चालीने धावत जाऊन मी वडिलांचा हात धरून त्यांना थांबवायचा प्रयत्न करायचो.
“काय रे?”
“कवताची बलपी..”
“आधी दर्शन घेऊन येऊ. मग येताना बर्फी घेऊ.चलाs..” ते मला हाताला धरून चालू लागायचे. काय करावे ते न सुचून मी मान वळवून माझ्या भावंडांकडे पहायचो. त्यांनी केलेल्या खुणांचा अर्थ मला नेमका समजायचा. मी वडिलांच्या हाताला हिसडा देऊन तिथेच हटून बसायचो.आणि माझ्या कमावलेल्या रडक्या आवाजात..’ कवताची बलपी’ घेतलीच पायजे..’ अशा बोबड्या घोषणा देत रहायचो. वडील थांबायचे. कोटाच्या खिशात जपून ठेवलेला एक आणा न बोलता बाहेर काढायचे.’अवधूत मिठाई भांडार’ मधून कवठाची बर्फी घेऊन ती पुडी माझ्या हातात सरकवायचे. त्यांनी तो एक आणा देवापुढे ठेवायला घेतलेला असायचा हे त्या वयात आमच्या गावीही नसे. न चिडता,संतापता, आक्रस्ताळेपणा न करता, कसलेही आढेवेढे न घेता माझा हट्ट पुरवणाऱ्या वडिलांच्या त्या आठवणी माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत. कारण त्या ‘गोड’ तर आहेतच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या आठवणींना दत्तमंदिराच्या परिसराची सुरेख,पवित्र, शुचिर्भूत अशी सुंदर महिरप आहे.
देव म्हणजे काय हेच माहीत नसलेल्या वयातली ही त्याच देवाच्या देवळासंदर्भातली सर्वात जुनी आठवण! ‘त्या’ची गोष्ट सुरू होते ती त्या आठवणीपासूनच! देवाची खरी ओळखच नसणाऱ्या माझ्या त्या वयात वडिलांमागोमाग चालणाऱ्या माझ्या इवल्याशा पावलांना, जीवनप्रवासातील अनेकानेक कठोर प्रसंगात खंबीरपणे उभं रहायचं बळ ज्याच्यामुळे मिळालं ‘त्या’चीच ही गोष्ट!
माझी कसोटी पहाणारे कितीतरी प्रसंग पुढे आयुष्यभर येत गेले.अर्थात या ना त्या रूपात ते प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात. पण त्या प्रसंगातही माझ्या मनातली त्याच्याबद्दलची श्रद्धा कधी डळमळीत झाली नाही. त्या अर्थानं सगळेच प्रसंग माझी नव्हे तर त्या श्रद्धेचीच कसोटी पहाणारे होते. त्यापैकी अनेक प्रसंगात मी माझ्या मनातली ‘देव’ ही संकल्पना मुळातूनच तपासून पहायलाही प्रवृत्त झालो आणि पुलाखालून बरच पाणी वाहून गेल्यानंतरच्या आजच्या या क्षणीही त्या पाण्याबरोबर वाहून न गेलेली ती श्रद्धा तितकीच दृढ आहे !
माझ्या आयुष्यातल्या या सगळ्याच अनुभवांबद्दल लिहायला मी प्रवृत्त झालो खरा, पण हे अनुभव जगावेगळे नाहीत याची नम्र जाणीव मला आहे. तुमच्यापैकी अनेकांना ते तसे आलेही असतील.अशांना माझे हे अनुभव वाचायला नक्कीच आवडतील.जे नास्तिक असतील त्यांनी निदान हे लिहिण्यासाठी निमित्त झालेल्या माझ्या श्रद्धेमागची माझी निखळ भावना समजून घ्यावी हीच माफक अपेक्षा!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈