श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- माझ्याही समोर पुढे आयुष्यभर हे असे कसोटीचे क्षण येणार आहेत याची मला कल्पना कुठून असायला? पण म्हणूनच ‘त्या’च्यापर्यंत पोहोचणारा माझा प्रवास ‘त्या’चेच बोट धरून अगदी निश्चिंतपणे सुरू झाला होता एवढं खरं !!)

तथाकथित चमत्कारांवर माझा विश्वास नाही. चमत्कारांवर विश्वास ठेवून भ्रमित होणंही योग्य नाही असंच मला वाटतं. त्या

बालवयातल्या मी प्रमुख साक्षीदार असणाऱ्या अनेक प्रसंगांच्या बाबतीत मात्र हे असं विश्लेषण करायची पात्रता त्यावेळी माझ्याजवळ नव्हती म्हणून असेल पण तेव्हा तरी ते चमत्कारच वाटले होते. आज इतक्या वर्षानंतर त्या प्रसंगांचं पुनरावलोकन करताना मात्र मी म्हणेन की ते प्रसंग चमत्कार नसले तरी अनाकलनीय मात्र नक्कीच होते आणि त्यामागे ईश्वरी कृपालोभाचे संकेतही निश्चितच होते

आमच्या कुरुंदवाडच्या वास्तव्यातले असेच हे प्रसंग. तिथे बाबांचा नित्यदर्शनाचा नेम प्रतिकूल परिस्थितीतही कसा निष्ठेने सुरू होता हे यापूर्वीच सविस्तरपणे सांगितलेले आहेच. त्यांच्या या निरपेक्ष सेवेनंतर ते निश्चितच कसोटीला उतरले असणार. एरवी हा प्रसंग अशा पद्धतीने घडलाच नसता.

तो काळ साधारण १९५४ ते १९५८ चा. विष्णूमंदिराच्या जवळच्या लेलेवकिलांच्या वाड्यात आमचं बिऱ्हाड होतं.‌ मोठं स्वैपाकघर आणि माडीवरची प्रशस्त खोली आमच्याकडे आणि स्वतंत्र स्वयंपाकघर असलेल्या बाकी पाच खोल्यांचा ऐवज लेले कुटुंबासाठी अशी विभागणी होती.‌दोन्ही कुटुंबे दूरच्या नात्यातलीच. त्यामुळे एकाच घरातले हे वेगवेगळे वास्तव्य केवळ सोय आणि सोबत म्हणून दोघांनी मनापासून स्वीकारलेलं होतं.

माझ्या पाठच्या भावाचा जन्म तिथलाच. ऑगस्ट १९५६ चा. त्याच्याच जन्माच्या वेळची ही गोष्ट. धुवांधार  पावसामुळे शेजारच्या आनेवाडीला  (हा पंचगंगेचा एक फाटा) नेहमीप्रमाणे पूर आलेला. पुराचे पाणी गावभर पसरत आमच्या वाड्याच्या मुख्य उंबऱ्याला लागलेले आणि धुवांधार पाऊस सुरूच. आईचे दिवस भरत आले होते.पाऊस असाच कोसळत राहिला तर पाणी कुठल्याही क्षणी घरात घुसू शकेल अशी ती अवेळ. त्यामुळे मुलांना वरच्या माडीवर झोपवून दोन्ही कुटुंबातली मोठी माणसं रात्रभर एकत्र पडवीतच बसून होती. त्या काळात बाळंतपणाला सुईणच घरी यायची. पण या पावसा-पूरात सुईण येणार कशी ही विवंचना होती ती वेगळीच!

“दादा, आता काय करायचं?” लेले वकील बाबांना म्हणाले. बाबा काळजीत होतेच. त्यांनी आईकडे पाहिलं. खरंतर अशा परिस्थितीत आईचा जीव टांगणीला लागायला हवा होता पण निदान वरकरणी तरी ती शांतच होती.

“आपण काय करणार? होईल ते पहात रहायचं.” ती शांतपणे म्हणाली.

“ते खरंच.पण तुम्हाला अचानक त्रास सुरू झाला तर..?” लेलेकाकू तिच्या जवळच बसल्या होत्या,त्या म्हणाल्या. त्यांच्या  बोलण्यात त्यांच्या मनातली काळजी लपून रहात नव्हतीच.  स्वतःचीच समजूत घातल्यासारखं आई म्हणाली,

“त्या सगळ्याचा भार दत्त महाराजांवर. संकट नाही यायचं. आणि आलंच तर शेवटी त्याचं निवारणही तेच करतील.”

परिस्थिती चिंताजनक असूनसुद्धा आईच्या शब्दांमुळे इतरांच्या मनावरचं ओझं थोडं तरी हलकं झालं. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर खूप वेळाने तिथे पडवीतच पसरलेल्या अंथरुणांवर सर्वजण आडवे झाले तरी कुणाच्याच डोळ्याला डोळा नव्हता. आणि आश्चर्य म्हणजे पहाटेच्या आसपास पावसाचा जोर हळूहळू ओसरत चालला आणि फटफटीत उजाडेपर्यंत उंबऱ्याशी येऊन ठेपलेल्या पाण्याने दोन पावलं माघार घेतली होती! आईचे दिवस भरत आल्याचं दडपण तिकडे सुईणीच्या मनावरही होतंच. त्यामुळेच ती विषाची परीक्षा नको म्हणून,स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सकाळी सकाळीच चिंब भिजल्या अवस्थेत कमरेपर्यंतच्या पाण्यातून चालत आमच्या घरी मुक्कामाच्याच तयारीने येऊन पोचली तसा सर्वांचा जीव भांड्यात पडला! त्याच दिवशी दुपारी बाळाचा सुखरूप जन्म झाला!पण…?

अतिशय अनपेक्षितपणे सगळं सुरळीत पार पडल्याचं समाधान मात्र दीर्घकाळ टिकणार नाहीय याची कुणालाच कल्पना नव्हती. कारण दुसरं जीवघेणं संकट दबा धरून बसलेलं होतंच!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments