सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
☆ मराठी साहित्य – विविधा ☆ त्रिकूट…भाग – 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
तारीख 29 ऑक्टोबर सकाळी काळूराम बोका घरात आला तो लंगडतच. मागच्या उजव्या पायाचा तळवा चांगलाच सुजला होता. पायाला कोणालाही हात लावू देत नव्हता. खाणंपिणं झालं आणि पुन्हा रात्री जो बाहेर गेला तो चार दिवसांनीच परत आला. चार दिवसात ती सूज आणखी वाढली होती. घरात तो उपचार करू देणे शक्य नव्हतं. जनावरांचा दवाखाना जवळच असल्याने बास्केट मधून त्याला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी भराभर इंजेक्शन दिली. दुसरे दिवशी पुन्हा चार इंजेक्शन्स झाली. शूज थोडी कमी झाली पण पाय टेकता येत नव्हता. पंजा पूर्ण लाकडासारखा कडक आणि निर्जीव झाला होता. पाय सारखा झाडत होता. नंतर विजयनगरच्या डॉक्टर ढोके ना दाखवून आणलं. रक्त कुठं पर्यंत पोचतय हे पाहण्यासाठी छोट अपरेशन केलं. पायाला बांधलेलं बँडज रहात नव्हत. दोन दिवसांनी पुन्हा दाखवायला नेल. पायात किडे होऊन गॅंगरीन झालं होत. डॉक्टरांनी दोन पर्याय सांगितले. जीव वाचवायचा असेल तर पाय मांडीपासून काढावा लागेल. 100% याला साप चावलेला आहे. त्याशिवाय अस होणार नाही. दुसरे दिवशी मोठं ऑपरेशन झालं. त्याची भूल उतरली आणि काही वेळातच खायला लागला. तीन पायावर घरात हिंडत काय पण चांगला पळत होता. आठ-दहा दिवस त्याला खूप जपायला हव होतं. जखम चाटू द्यायची नव्हती. रोज रात्री घरातले सगळेजण आळीपाळीने जागत होतो. त्याचा तोकडा पाय बघवत नव्हता.
सगळं ठीक होत , तोपर्यंत जखमेवर घातलेले टाके त्याने काढून टाकले. पुन्हा दवाखाना पुन्हा टाके आता त्याचे हाल बघवत नव्हते. दुधातून गोळ्या अँटिबायोटिक औषधे देत होतो. खाण्यापिण्याचे तक्रार नव्हती. 21 नोव्हेंबरला दुसऱ्यांदा घातलेले टाकेही पुन्हा निघाले. जखम पूर्ण उघडी झाली. औषधे तर चालूच आहेत. आता पक्क ठरवलं की तो खातोय पितोय घरात फिरतोय फक्त बाहेर हिंडायला जाता येत नाही. तेव्हा आता दवाखाना टाके इंजेक्शन काहीही विचार करायचा नाही. त्याचे हाल करायचे नाहीत. हळूहळू जखम भरून येईल. कितीही दिवस लागू देत ,पण आता काहीही नको. त्याची घरात सगळी व्यवस्था केलेली आहे. त्याला सारखे बाहेर जायचे असते.पण बाहेर कसे सोडणार? काळूराम सावकाश का होईना बरा होऊन बाहेर जायला लागू दे. शेवटी तो निशाचर प्राणी आहे ना! लवकर बरा होऊ दे अशी प्रार्थना करुया.
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता.
मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈