श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ८ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र – बाबांना मिळणाऱ्या अगम्य अशा भविष्यसूचक संकेतांच्या वाचासिध्दीसदृश इतर सकारात्मक प्रचितींच्या तुलनेतला हा काळजाचा ठोका चुकवणारा एक अपवादात्मक अनुभव मनात बाबांच्या आठवणींना चिकटून बसलाय!)
दत्तमहाराजांवरील बाबांची श्रद्धा उत्कट होती हे खरं पण रोजची पूजाअर्चा, जपजाप्य यासाठी फारसा वेळ ते देऊच शकायचे नाहीत.हे त्यांनी जरी मनोमन स्विकारलेलं असलं तरी गुरुचरित्राचं पारायण करायचं त्यांच्या बरेच दिवस मनात असूनही ते शक्य झालं नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे घरी ती पोथी नव्हती, कुणाकडून तरी मागून घेऊन ती वाचणं बाबांना रुचणं शक्य नव्हतं आणि स्वतः पोथी विकत घेण्याइतकी सवड आर्थिक ओढग्रस्तीत त्यांना मिळालेली नव्हती.या गोष्टीची रुखरुख मात्र बरेच दिवस त्यांच्या मनात होतीच.ती अधिक तीव्र झाली त्याला निमित्त ठरलं वर्तमानपत्रात आलेल्या ‘ढवळे प्रकाशन, पुणे’ या प्रसिद्ध प्रकाशनसंस्थेच्या एका जाहिरातीचं! ती जाहिरात अनेक दिवस रोज ठळकपणे प्रसिद्ध होऊ लागली. गुरुचरित्राची कापडी आणि रेशमी बांधणी अशा दोन प्रकारची नवी आवृत्ती प्रकाशित होणार असल्याची ती जाहिरात होती.त्यासाठी प्रकाशनपूर्व सवलतही जाहीर झालेली होती. शिवाय दहा प्रतींची ऑर्डर देणाऱ्यास एक प्रत मोफत मिळणार होती.ही सवलत अर्थातच पुस्तक विक्रेत्यांसाठी असल्याचे गृहित धरुन बाबांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. एरवीही रेशमी बांधणीपेक्षा कापडी बांधणीच्या प्रतीची किंमत कमी असूनही ती प्रत विकत घेणंही बाबांच्या आटोक्यात नव्हतंच.या पार्श्वभूमीवर अचानक एक दिवस गुरुचरित्राच्या रेशमी बांधणीची एकेक प्रत विकत घेणारे अनेक इच्छुक बाबांना येऊन भेटले व त्यांनी बाबांना सहकार्य करण्याची विनंती केली. ‘आमच्या प्रत्येकी एकेक अशा प्रतींची एकत्रित नोंदणी करणे, त्या व्हीपीने येतील तेव्हा ती व्हीपी सोडवून घेणे हे व्याप दहाजणांनी आपापले करण्यापेक्षा आम्हा दहा जणांचे पैसे आधीच गोळा करून ते आम्ही तुमच्याकडे देऊ.तुम्ही एकत्रित दहा प्रतींची ऑर्डर बुक करा म्हणजे आमचे काम खूप सोपे होईल.त्या बदल्यात दहा प्रतींवर मिळणारी रेशमी बांधणीची एक मोफत प्रत तुम्ही तुमच्यासाठी ठेवून घ्या’ असा त्यांचा प्रस्ताव होता. यात नाकारण्यासारखं काही नव्हतंच. बाबांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि घरबसल्या त्या सर्वांचं काम तर झालंच आणि कांहीही पैसे खर्च न करता गुरुचरित्राची एक प्रत आणि तीही रेशमी बांधणीची बाबांना घरपोच मिळाली. त्याक्षणीचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी कधीच विसरणार नाही.मी माझ्या त्या बालवयात अंत:प्रेरणेनेच त्या पोथीतला रोज एक अध्याय वाचायला सुरुवात केली होती.ते माझं दत्तसेवेच्या वाटेवरचं पहिलं पाऊल होतं! पुढे कालांतराने आम्ही सर्व भावंडे स्थिरस्थावर झाल्यावर नोकरीनिमित्ताने वेगवेगळ्या दिशांना विखुरले गेलो तरी पुढे अनेक वर्षे ती गुरुचरित्राची पोथी माझ्या देवघरात मी बाबांकडून मिळालेला प्रसाद या भावनेनेच जपली होती.ती पोथी हाताळताही न येण्याइतकी जीर्ण होईपर्यंतच्या प्रदीर्घकाळांत गुरुचरित्राचे नित्य वाचन, पारायण हे सगळं माझ्या आनंदाचाच एक भाग होत वर्षानुवर्षे माझ्या अंगवळणीच पडून गेलं होतं!
माझ्या हातून यथाशक्ती सुरू असणाऱ्या दत्तसेवेचं समाधान आणि आम्हा भावंडांच्या पाठी असणारी आई बाबांची पुण्याई माझ्यादृष्टीने अतिशय मोलाची होती हे खरे, पण म्हणून त्यामुळे माझ्या पुढील जीवनवाटेवर खाचखळगे आलेच
नाहीत असं नाही.किंबहुना मिळेल त्या दिशांचा परस्पर वेगळ्या वाटांवरचा आम्हा सर्वच भावंडांचा प्रवास क्षणोक्षणी आमची कसोटी पहाणाराच होता.
माझ्या आयुष्यातल्या अशा अस्थिर प्रवासाला सुरुवात झाली तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. त्या नेमक्या क्षणी स्वतः पूर्णतः परावलंबी होऊन अंथरुण धरलेल्या माझ्या बाबांनी त्यांच्या अंत:प्रेरणेने मला दिलेली अमूल्य भेट मी आजही जपून ठेवलेली आहे. तो सगळाच प्रसंग आत्ता या क्षणी पुन्हा घडत असल्यासारखा मला स्पष्ट दिसतो आहे!
अर्थात या आधी सांगितलेल्या कांही मोजक्या आठवणींच्या तुलनेत खूप वर्षांनंतरची ही गोष्ट आहे.बाबा निवृत्त होईपर्यंत माझ्या दोन्ही बहिणींची लग्ने झालेली होती. आई, बाबा न् आम्ही दोन भाऊ किर्लोस्करवाडी सोडून माझं कॉलेजशिक्षण सोयीचं व्हावं म्हणून मिरजेत रहायला आलो होतो. लहान मोठी नोकरी करत राहिलेल्या माझ्या मोठ्या भावाला माझं काॅलेज शिक्षण संपण्याच्या दरम्यान नुकताच स्टेट बँकेत जॉब मिळून त्याचं पोस्टिंग इस्लामपूरला झालं होतं. आम्ही सर्वजण मग मिरज सोडून तिकडे शिफ्ट झालो.
तिथे गेल्यानंतर काही दिवसातच बाबांनी अंथरूण धरलं ते अखेरपर्यंत त्यातून उठलेच नाहीत. त्याच दरम्यान मला मुंबईत एक जेमतेम पगाराची खाजगी नोकरी मिळायची संधी आली, तेव्हा ती स्वीकारून चांगल्या नोकरीच्या शोधात रहायचं असं ठरलं आणि मी माझी बॅग भरू लागलो. माझं वय तेव्हा जेमतेम १८/१९ वर्षांचं. तोवर घर सोडून मी कुठे बाहेर गेलेलो नव्हतो. मुंबई तर पूर्वी कधी पाहिलीही नव्हती. त्यामुळे जायचं ठरलं त्या क्षणापासून मनावर एक विचित्र असं दडपण होतं आणि अनामिक अशी भीतीही. निघायच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना देवघरातल्या पादुकांवर मी फुलं वाहू लागलो आणि माझे डोळे भरून आले. गुरुचरित्राच्या पोथीलाही मी फुलं वाहून नमस्कार केला तेव्हा ‘माझं तिथं सगऴं व्यवस्थित मार्गी लागू दे’ हा विचार मनात नव्हताच. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या पादुकांच्या नित्यपूजेत मात्र आता प्रदीर्घ काळ खंड पडणार आणि गुरुचरित्र नित्यवाचनही जमणार नाही या कल्पनेनेच मी अस्वस्थ झालो होतो. ‘मला अंतर देऊ नका..’ अशी कळवळून मी केलेली प्रार्थना आजही मला आठवतेय.आश्चर्य म्हणजे माझ्या मनातली ती कळकळ दत्तगुरुपर्यंत पोचल्याची प्रचिती मला घर सोडण्यापूर्वीच मिळाली आणि तीही अंथरुणावर निपचित पडून असलेल्या बाबांच्यामार्फत! हे सगळं माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं तर होतंच पण आजही तितकंच अनाकलनीय!
निघताना मी बाबांचा निरोप घ्यायला गेलो, तेव्हा बाबा थोडे अस्वस्थ झाल्याचं मला जाणवलं.
“जपून जा.” अंथरुणावर पडल्यापडल्याच ते म्हणाले. मी नमस्कारासाठी वाकणार तेवढ्यात आपला थरथरता हात कसाबसा वर करीत त्यांनी माझा आधार घेतला आणि ते महत्प्रयासाने उठून बसले. मी त्यांना वाकून नमस्कार केला.
” तुला काय देऊ?” त्यांनी विचारलं
खरंतर पूर्णतः निष्कांचन असणाऱ्या त्यांनी मला उचलून काही द्यावं अशी माझी अपेक्षा नव्हतीच आणि तसं कांही देण्यासारखं त्यांचं स्वतःचं असं लौकीकार्थानं त्यांच्याजवळ काही नव्हतंही. पण अलौकिक असं खूप मोलाचं कांही देण्याचा ते विचार करत असतील असं माझ्या मनातही आलं नव्हतं.उलट ‘तुला काय देऊ?’ या त्यांच्या प्रश्नात मला काय हवंय यापेक्षा आपण याला काही देऊ शकत नाहीय हीच खंत त्यांच्या मनात होती असंच मला वाटून गेलं. त्यांना बरं वाटावं म्हणून तत्परतेने मी म्हणालो,
“बाबा, खरंच कांही नको. आशीर्वाद द्या फक्त”
ते स्वतःशीच हसले. त्या स्मितहास्यात एक गूढ अशी लहर तरंगत असल्याचा मला भास झाला. त्यांनी मला स्वतःजवळ बसवून घेतलं. थोपटलं. आपला थरथरता हात अलगद माझ्या डोक्यावर ठेवून म्हणाले,
“बाळा, आशीर्वाद तर आहेतच रे. आणि ते नेहमीच रहातील. एवढ्या मोठ्या कामासाठी जातो आहेस, मग कांहीतरी द्यायला हवंच ना रे?..” बोलता बोलता त्यांनी त्यांच्या गादीचा कोपरा अलगद वर दुमडला.तिथली त्यांची डायरी उचलली.त्या डायरीत निगुतीने जपून ठेवलेला एक फोटो अलगद बाहेर काढला आणि तो माझ्यापुढे धरला..
“घे.हा फोटो हेच माझे आशीर्वाद आहेत असं समज. नीट जपून ठेव.रोज याचे नित्य दर्शन घेत जा.तीच तुझी नित्य सेवा .तोच नित्यनेम.सेवेत अंतर पडेल ही मनातली भावना काढून टाक.या फोटोच्या रुपात महाराज तुझी सोबत करतील. सगळं सुरळीत होईल.काळजी नको.”
मी भारावलेल्या अवस्थेत त्यांचा शब्द न् शब्द मनात कोरुन ठेवत होतो. ते बोलायचे थांबले तसा मी भानावर आलो.कृतज्ञतेनं बाबाकडे पाहिलं. सकाळी पूजा झाल्यानंतर मी पादुकांसमोर, पोथीसमोर डोकं टेकवलं तेव्हाची माझ्या मनातली कातरता मला आठवली आणि आताची बाबांच्या नजरेतली चमक आणि त्यांच्या शब्दात भरून राहिलेला, मला स्वस्थ करणारा गाभाऱ्यातूनच उमटल्यासारखा त्यांचा अलौकिक स्वर …मी अक्षरशः अंतर्बाह्य शहारलो. त्याच मनोवस्थेत त्यांच्या हातातला तो फोटो घेतला आणि त्यांना नमस्कार केला.
तो एक अतिशय छोट्या आकाराचा दत्ताचा फोटो होता! छोटा आकार म्हणजे किती तर आपल्या बोटाच्या दोन पेरांएवढ्या उंचीचा न् फार तर एका पेराएवढ्या रुंदीचा. पिवळ्या धमक रंगाचं जरीकाठी सोवळं नेसलेलं, हसतमुख प्रसन्न मुद्रा असलेलं ते दत्तरूप होतं!
या दत्तरूपानं मला पुढं खूप कांही दिलंय. पण प्रकर्षाने कृतज्ञ रहावं असं काही दिलं असेल तर ते म्हणजे बाबांच्या वाचासिद्धीची थक्क करणारी प्रचिती! ती कशी हे सगळंच सांगायचं तर तो एक वेगळाच प्रदीर्घ लेखनाचा विषय होईल. पण माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अवेळेला, माझी कसोटी पहाणाऱ्या असंख्य प्रसंगांच्या वेळी किंवा अगदी उध्वस्त करू पहाणाऱ्या नैसर्गिक संकटांच्या वेळीही फक्त मलाच जाणवेल असा आधार, दिलासा आणि माझ्या विचारांना योग्य दिशा दिलीय ती या दत्तरूपानेच!
आज इतक्या वर्षांनंतरही तो फोटो मी माझ्याजवळ जपून ठेवलाय! आजही त्याचे नित्य दर्शन मी घेतो तेव्हा ‘तो’ माझ्याजवळ असतोच आणि त्याच दत्तरुपाशी निगडीत असणारी माझ्या बाबांची आठवणसुध्दा!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈