सुश्री संगीता कुलकर्णी
विविधा
☆ तो किनारा… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
प्रत्येकाच्या आयुष्यात रंगांची उधळण होतेच असं नाही आणि ” तो किनारा प्रत्येकाला मिळतोच असंही नाही…
आयुष्याच्या कोणत्या किनाऱ्यावरून आपण आयुष्याकडे बघत आहोत यावरून आयुष्याची रंगत ठरत असावी असे मला वाटते.. काहींना अशा किनाऱ्यावरून आपलं आयुष्य खूप रंगीबेरंगी दिसतं असावं तर काहींना धवल काहींना काळं तर काहींना राखाडी… ज्यांना आयुष्य छान रंगीबेरंगी दिसतं ना अशी माणसं भाग्यवान… !! आयुष्याला रंग देणारे, त्यात रंग भरणारे व रंग जपून ठेवणारे विरळचं…!!
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला अनेक किनारे असतात. आपला किनारा कोणता? हे आपल्याला शोधावं लागतं तर काही किनारे मागे सोडून आपल्याला पुढे चालावचं लागतं. … ” त्या”
किनाऱ्यापाशी आपल्याला कितीही थांबावसं वाटलं तरी नाही जमतं तर काही किनारे आपल्याला सोडून ही जातात. मग उरतो आपण एकटेचं.. तसं जर पाहिलंत तर आपण सगळेचं आपापल्या परीने एकटे असतो पण आयुष्याच्या या वादळात आपल्याला असा एखादा किनारा गवसतो की जो आपला असतो
आपल्यासाठीचं असतो.. .आपल्या आयुष्यात येणा-या वादळात तो आपल्याला घट्ट धरून ठेवतो. येणाऱ्या लाटांच्या प्रवाहात तो आपल्याला वाहून जाऊ देत नाही… घट्ट धरून ठेवतो…असे किनारे मिळायला भाग्य लागतं…मग आपण आपला एकटेपणा विसरतो हळूहळू.. … मग आपण ” त्या ” किनाऱ्यावर जाऊन आपण त्याचेच होऊन जातो. त्याच्या कुशीत विसावतो हासतो रडतो मनं मोकळ करतो आणि आपण विसरून ही जातो की आपल्या “त्या” किनाऱ्याला मर्यादा ही आहेत. त्याची ही सहनशक्ती आहे. मग मनाला प्रश्न पडतो की…आपली किती वादळे त्याने पचवावी? आपल्याला त्याने किती काळ वाचवावं ?
आपला असणारा हा “जीवलगसखा एकटेपणा ” किती वेळ लांब राहणार आपल्या पासून नाही का ?….
किनारा थकतो आणि हळूहळू सुटून जातो आपल्या हातून…आपल्याही नकळत…. मग पुन्हा आपण एकटेचं उरतो.. आपलेच आपल्यासाठी आणि आपला एकटेपणा आपल्यासाठीच..
किनारा सुटण्याचं दु:ख तर असतचं पण त्याने आयुष्य तर थांबत नाही ना आपलं ? आपण जगतचं राहतो किंबहुना जगावचं लागतं म्हणा ना .. लांब असतो ” तो” किनारा … मात्रं तो साक्षीला असतो.. येतो कधीतरी आपल्याला सावरायला… आणि कधीतरी आपण ही विसावतो त्याच्याजवळ… मन शांत होईपर्यंत..
“तो “असतो तोपर्यंत सत्याला उराशी घेऊन एकटेपणाला सोबत घेऊन आणि” त्या” किनाऱ्याकडे नजर ठेवून आपण जगत राहतो..जगतचं राहतो…!!
© सुश्री संगीता कुलकर्णी
लेखिका /कवयित्री
ठाणे
9870451020
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈