श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ११ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- मी प्रकाशवाटेच्या उंबरठ्यावर उभा होतो.ते सर्वांना दिलासा देणारं असं एक अनोखं वळण होतं. आता अनिश्चिततेचा लवलेशही माझ्या मनात नव्हता. मला सोमवारी स्टेट बँकेच्या वरळी ब्रॅंचला जॉईन व्हायचं होतं. त्या क्षणी यापेक्षा जास्त आनंददायी दुसरं कांही असूच शकत नव्हतं. त्या आनंदासोबत मनात होती एक प्रकारची आतूर उत्सुकता! पण..? ते सगळं माझ्यासाठी अळवावरचं पाणीच ठरणार होतं याची मला कल्पना कुठं होती?)
रविवारी मी अंथरुणाला पाठ टेकली पण रात्रभर झोप लागलीच नाही. मनातला अंधार विरून गेला होता. मन हलकं होऊन स्वप्नरंजनात तरंगत होतं. त्यामुळे पुरेशी झोप झाली नसूनही रात्र क्षणार्धात सरुन गेल्यासारखं वाटलं.पहाट होताच मी उत्साहाने उठलो.लगबगीने सगळं आवरलं. बहिणीने दिलेला पोळी-भाजीचा डबा घेऊन मी बँकेत जाण्यासाठी तयार झालो. देवाला आणि घरी सर्वांना नमस्कार करून बाहेर पडलो.
बसमधून उतरताच चटके देणाऱ्या उन्हात झपाझप चालत स्टेट बँकेच्या वरळी ब्रॅंचसमोर येऊन क्षणभर थबकलो. वरळी ब्रॅंचची समोरची ही प्रशस्त इमारत हेच आता मला उत्कर्षाकडे नेणारं माझं भविष्य होतं जे माझ्या स्वागतासाठी जणू सज्ज होतं! स्वप्नवत वाटाव्या अशा त्या क्षणी मी भारावून गेलो होतो.त्याच मनोवस्थेत ब्रॅंचचं काचेचं जाड प्रवेशद्वार अलगद ढकलून मी आत पहिलं पाऊल टाकलं. रणरणत्या उन्हातून आत आलेल्या माझं ए.सी.च्या गारव्याने प्रसन्न स्वागत केलं होतं! जणूकांही त्याक्षणी मला जे हवं ते हवं त्यावेळी प्रथमच मिळत होतं!
मी रिसेप्शन काऊंटरकडे गेलो.
“येस प्लीज..?” रिसेप्शनिस्टने माझं हसतमुखाने स्वागत केलं. तिला विश करून मी माझं ‘जॉईनिंग लेटर’ तिच्याकडे सुपूर्द केलं. तिने त्या पत्रावरून नजर फिरवली.माझं नाव वाचताच ती थोडी गंभीर झालीय असा मला भास झाला. मी तो विचार क्षणार्धात झटकून टाकला. ती काही बोलेल म्हणून वाट पहात उभा राहिलो. क्षणभर विचार करून तिने मला बसायला सांगितलं आणि ती इंटरकाॅम वरून कुणाशीतरी बोलू लागली.
‘असू दे. इट इज अ पार्ट ऑफ हर जॉब ‘.. माझ्या मनानं तिच्या शब्दात माझी समजूत घातली. मी तिचं बोलणं संपायची वाट पहात राहिलो.
एक एक क्षण मला आता युगायुगासारखा वाटू लागला.
रिसिव्हर खाली ठेवून लगेचच तिनं मला बोलावलं.ती काहीशी गंभीर झाली होती.
“मि.लिमये…आय अॅम साॅरी.. पण… तुम्हाला जॉईन करून घेता येणार नाहीये…”
“कां..?”
“युवर मेडिकल रिपोर्ट इज नॉट फेवरेबल. यू आर मेडिकली अनफिट…”
ऐकून मला धक्काच बसला. माझ्या पायाखालची जमीन सरकत असल्याचा मला भास झाला. खुर्चीचा आधार घेत मी स्वतःला सावरलं. माझ्या हातातून खूप मौल्यवान असं कांहीतरी निसटून जात होतं आणि ते प्राणपणाने घट्ट धरून ठेवण्यासाठी मीच धडपड करायला हवी होती.
“क..काय?कसं शक्य आहे हे? मी..मी..ब्रॅंच मॅनेजरना भेटू..? प्लीज…?”
“ही इज आॅल्सो हेल्पलेस.जस्ट नाऊ आय टाॅक्ड वीथ हिम ओन्ली.यू मे कॉल ऑन अवर मेडिकल आॅफिसर, डाॅ.आनंद लिमये.ही इज द राईट पर्सन टू टेल यू द करेक्ट रिझन…”
मी नाईलाजाने मनाविरुद्ध जड पावलांनी पाठ फिरवली. सोबतचा बहिणीने निघताना दिलेला पोळीभाजीचा डबा मला आता खूप जड वाटू लागला. नि:शक्त झाल्यासारखी हातापायातली शक्तीच निघून गेली जशीकांही.
मी मघाच्या त्याच काचेच्या जाड दारापाशी येऊन थबकलो. काही वेळापूर्वी अतिशय उत्साहाने हेच दार ढकलून मी आत आलो होतो तेव्हा ए.सी.च्या थंडाव्याने केलेलं माझं स्वागत ही एक हूलच होती तर. आता तेच दार ढकलून मी पुन्हा बाहेरच्या रणरणत्या उन्हात पाऊल टाकलं तेव्हा बाहेरच्या उन्हाचे चटके अधिकच तीव्र झालेले होते!
‘कां?’आणि ‘कसं?’ या मनातल्या प्रश्नांना त्या क्षणी तरी उत्तर नव्हतंच.’आता पुढं काय?’
हा प्रश्न अनुत्तरीत होऊन मनातच लटकत राहिला. त्याही परिस्थितीत मी स्वतःला कसंबसं सावरलं.आता ‘डॉ.आनंद लिमये’ हाच एकमेव आशेचा किरण होता. त्यांचं सौम्य,हसतमुख, तरुण व्यक्तिमत्त्व नजरेसमोर आलं आणि त्यांचा खूप आधार वाटू लागला….!
माझी पावलं नकळत त्यांच्या क्लिनिकच्या दिशेने चालू लागली. मी अंधाराच्या खोल गर्तेत ढकलला गेलो होतो आणि आता काडीच्या आधारासाठी धडपडत होतो! मला अचानक बाबांनी दिलेल्या दत्ताच्या फोटोची आठवण झाली. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा मी माझ्या शर्टचा खिसा चाचपला.पण….?पण.. तो फोटो नेहमीसारखा आठवणीने खिशात ठेवलेलाच नव्हता. सकाळी निघतानाच्या गडबडीत माझ्याही नकळत मी तो घरीच विसरलो होतो! त्या अस्वस्थतेतही माझी पावलं मात्र न चुकता ‘डॉ.आनंद लिमये’ यांच्या क्लिनिक समोर येऊन थांबली होती…!
माझं भवितव्य आता सर्वस्वी फक्त त्यांच्याच हातात होतं!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈