श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग १२ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र – “युवर मेडिकल रिपोर्ट इज नॉट फेवरेबल. यू आर मेडिकली अनफिट..” रिसेप्शनिस्टचे शब्द ऐकून मला धक्काच बसला.
“यू मे कॉल ऑन अवर मेडिकल ऑफिसर डाॅ.आनंद लिमये.ही इज अ राईट पर्सन टू टेल यू द करेक्ट रिझन.” ती म्हणाली.
मी नाईलाजाने जड पावलांनी पाठ फिरवली. ‘कां?’ आणि ‘कसं?’ या मनातल्या प्रश्नांना त्याक्षणी तरी उत्तर नव्हतं. आता डॉ.आनंद लिमये हाच एकमेव आशेचा किरण होता! मला अचानक बाबांनी दिलेल्या दत्ताच्या फोटोची आठवण झाली.एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा मी माझ्या शर्टचा खिसा चाचपला.पण..पण तो फोटो मी नेहमीसारखा आठवणीने खिशात ठेवलेलाच नव्हता.सकाळी निघतानाच्या गडबडीत माझ्या नकळत मी तो फोटो घरीच विसरलो होतो.तीच रुखरुख मनात घेऊन मी डॉ. आनंद लिमये यांच्या क्लिनिक समोर येऊन उभा राहिलो..)
माझं तिथं येणं त्यांना कदाचित अपेक्षित नसावं.मला पहाताच ते काहीसे अस्वस्थ झाल्याचा भास मला झाला.मी तिथे येण्यामागची सगळी पार्श्वभूमी त्यांना थोडक्यात सांगितली. अतिशय पोटतिडकीने त्यांना माझी सगळी कर्मकहाणी सांगून स्टेट बँकेतली ही नोकरी या परिस्थितीत माझ्या जगण्याचा एकमेव आधार आहे हे त्यांना पटवून द्यायचा माझ्यापरीने प्रयत्न करीत राहिलो. ते काहीसे चलबिचल झाल्याचे जाणवले.
“पण तुमच्या ब्लड, यूरिन, स्टूल सगळ्याच रिपोर्ट्समधे निगेटिव्ह ईंडिकेशन्स आहेत. अशा परिस्थितीत मी फेवरेबल मेडिकल रिपोर्ट कसा देणार? आणि आता तर मी ऑलरेडी माझा रिपोर्ट ब्रॅंचला सबमिट केलेला आहे.अशा परिस्थितीत…”
“पण डॉक्टर, मुंबईला आयुष्यात मी प्रथमच आलोय. त्यामुळे हवापाण्यातल्या बदलामुळे मला नुकताच ताप येऊन गेला होता.मेडिकल टेस्टच्या एकदोन दिवस आधीच ताप उतरला होता. रिपोर्ट्समधल्या त्या त्रुटी हा त्याच्याच परिमाण असणार ना?माझी औषधं अजून सुरु आहेत आणि या त्रुटी औषधाने यथावकाश दूर होणाऱ्याच तर आहेत.मग केवळ त्यामुळे बँकेत नोकरी करण्यासाठी मी कायमस्वरूपी अनफिट कसं काय ठरु शकतो?”
“हो, पण तुम्ही तुमच्या आजारपणाबद्दल मला आधी कल्पना द्यायला हवी होतीत ना? मेडिकल टेस्ट कांही दिवस पुढे ढकलता आली असती. अॅट धीस स्टेज… आय ॲम हेल्पलेस. सॉरी.. आय कान्ट डू एनिथिंग…”
खूप आशेने मी इथे आलो होतो. निराश होऊन बाहेर पडलो. खूप एकटं.. खूप निराधार वाटू लागलं.अंधारुन आलेल्या मनात प्रकाशाची तिरीप यावी तशी ‘त्या’ची आठवण झाली आणि… ‘त्या’नेच मला सावरलं! हो.. ‘त्या’नेच..! कारण त्याची आठवण झाली त्याच क्षणी ‘सगळं सुरळीत होईल काळजी नको’ हे बाबांचे शब्दही आठवले. मनात ध्वनित झालेल्या त्या शब्दांनी ‘तो’च मला दिलासा देतो आहे असा भास झाला आणि मी सावरलो!आता स्वस्थ बसून चालणार नाही, अखेरपर्यंत शक्य असतील ते सगळे प्रयत्न आपणच करायला हवेत याची जाणिव झाली. लहानपणापासून वेळोवेळी कानावर पडलेले बाबांचे शब्द मला आठवले आणि मी सावरलो….!मनात उमटत राहिलेले त्याच शब्दांचे प्रतिध्वनी मला दिलासा देत माझ्या विचारांना योग्य दिशा देत राहिले…
‘त्याच्याकडे कधीच कांही मागायचे नाही. जे घडेल ते मनापासून स्वीकारायचे. खंबीरपणाने त्याला सामोरे जायचे. आपल्या हिताचे काय आहे ते आपल्यापेक्षा तोच जाणतो. आणि योग्य वेळ येताच आपल्याला तो ते न मागता देतोही. आपण कर्तव्यात कसूर करायची नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा सोडायची नाही. तो यश देतोच. क्वचित कधी अपयश आलंच, तर ते दीर्घकाळाचा विचार करता आपल्या हिताचंच होतं हे नंतर जाणवतंच…’ मनात घुमणारा बाबांचा शब्द न् शब्द मला त्या हताश मनोवस्थेत योग्य मार्ग दाखवून गेला. मनावरचं दडपण थोडं कमी झालं.
‘काहीही अडचण आली तरी बँकेच्या नंबरवर मला लगेच फोन कर’ हे निरोप घेतानाचे भावाचे शब्द मला आठवले.मनात उलटसुलट विचारांनी पुन्हा गर्दी केली…..
‘त्याला फोन करायलाच हवा. हे सगळं त्याला सांगायलाच हवं… पण.. पण कसं सांगायचं? काय वाटेल त्याला हे सगळं ऐकून? त्याने आणि घरी आई-बाबांनीही आपण आज स्टेट बँकेत जॉईन झालोय हेच गृहीत धरलंय.आता हे सगळं ऐकून काय वाटेल त्यांना..?”
मी मनावर दगड ठेवून जवळच्याच पोस्टात गेलो. भावाला फोन लावला खरा पण रिसीव्हर धरलेला माझा हात भावनातिरेकानं थरथरु लागला. मोजक्या शब्दात सगळं
सांगतांनाही आवाज भरून येत होता. सांगून संपलं तरी क्षणकाळ त्याच्याकडून काही प्रतिसादच आला नाही. त्याला सावरण्यासाठी तेवढा वेळ तरी आवश्यक होताच.
“हे बघ, तू स्वतःला सावर. डिस्टर्ब होऊ नको. अजूनही यातून काही मार्ग निघेल” तो म्हणाला.
“नाही निघणार…”मी रडवेला होऊन गेलो..”कसा निघणार..?”
“आपण प्रयत्न तरी करु.मी माझ्या मॅनेजरसाहेबांशी बोलतो. स्टाफ डिपार्टमेंटमधे त्यांच्या चांगल्या ओळखी आहेत. ते नक्की मदत करतील. काळजी करू नकोस.मी आधी माझ्या साहेबांशी बोलून बघतो.तू थोड्या वेळाने मला फोन कर. आपण बोलू सविस्तर”
मी रिसिव्हर खाली ठेवला. त्याक्षणी मन स्वस्थ झालं. काहीतरी मार्ग निघण्याची थोडीशी कां असेना पण आशा निर्माण झाली होती.
हा आशानिराशेचा खेळ पुढे अनेक महिने असाच सुरु राहिला. अथक प्रयत्न, संपर्क,गाठीभेटी, रदबदल्या सगळं झाल्यानंतर अखेर या सगळ्या प्रकरणाला अनपेक्षित पूर्णविराम! हाती कांही न लागताच अखेर सगळं हातून निसटून गेलंच. स्टेट बँकेची पूर्वीची वेटिंग लिस्ट रद्दसुद्धा झाली आणि नवीन भरतीसाठी पेपरमधे पानभर जाहिरातही झळकली..!
केवळ भावाच्या आग्रहाखातर त्या जाहिरातीस प्रतिसाद म्हणून मी स्टेट-बँकेत पुन्हा नव्याने अर्ज केला. याच दरम्यान पूर्वी मेहुण्यांच्या ओळखीतून खाजगी नोकरीसाठी त्यांनी शब्द टाकला होता त्याची परिणती म्हणून शिवडीच्या ‘स्वान-मिल’मधल्या पीएफ् डिपार्टमेंटला मला दिवसभर चरकातून पिळून काढणारी तुटपुंज्या पगाराची नोकरी मिळाली. नव्या खेळाला नव्याने सुरुवात झाली..!
पुढे जे काही घडत गेलं ते सगळं योगायोग वाटावेत असंच होतं. पण तरीही जणू काही कुणीतरी ते मुद्दाम घडवत होतं. ‘कुणीतरी’ म्हणजे माझ्या मनात मी श्रद्धेनं जपलेला ‘तो’च होता! कारण वरवर योगायोग वाटणाऱ्या पुढे घडत गेलेल्या सगळ्याच घटना अघटीत वाटाव्यात अशाच होत्या हे माझं मलाच जाणवत होतं. आणि आत्तापर्यंत घडलेल्या या सगळ्या नकारात्मक बारीकसारीक घटना म्हणजे ‘त्या’नेच केलेले या सगळ्या अनिश्चिततेतून मला अलगद बाहेर काढण्यासाठीचे पूर्वनियोजन होते याचा प्रत्ययही आला. पण तोपर्यंतचा संघर्षाचा काळ मात्र माझी आणि माझ्या ‘त्या’च्यावरील श्रद्धेची कसोटी पहाणाराच होता!
‘क्वचित कधी अपयश आलंच तरी ते आपल्या हितासाठीच होतं हे कालांतरानं जाणवतंच’ हे कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मी त्या संघर्षकाळात घट्ट धरून ठेवले होते आणि पुढे ते आश्चर्यकारकरित्या शब्दशः खरेही ठरले!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈