श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- हा आशानिराशेचा खेळ पुढे अनेक महिने असाच सुरू राहिला. खूप प्रयत्न करूनही हाती काही न लागताच अखेर  हातातून सगळं निसटून गेलंच.स्टेट बॅंकेची पूर्वीची वेटिंग लिस्ट रद्द होऊन नवीन भरतीसाठी पेपरमधे पानभर जाहिरातही झळकली. केवळ भावाच्या आग्रहाखातर त्या जाहिरातीस प्रतिसाद म्हणून मी पुन्हा नव्याने अर्ज केला. त्याच दरम्यान माझ्या मेहुण्यांच्या ओळखीने शिवडीतल्या ‘स्वान मिल’च्या  पीडीएफ् डिपार्टमेंटला मला दिवसभर चरकातून पिळून काढणारी तुटपूंज्या पगाराची नोकरी मिळाली आणि नव्या खेळाला नव्याने सुरुवात झाली!

पुढे जे घडत गेलं ते सगळं योगायोग वाटावेत असंच, पण ते योगायोग मात्र अघटीत म्हणावेत असेच होते!

‘क्वचित कधी अपयश आलंच तरी ते आपल्या हितासाठीच होतं हे कालांतरानं जाणवतंच’ हे कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मी त्या संघर्षकाळात घट्ट धरून ठेवले होते आणि पुढे ते आश्चर्यकारकरीत्या शब्दशः खरेही ठरले.)

मिलमधल्या कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतच होता.त्याच धकाधकीत स्टेट बॅंकेचा नव्याने केलेल्या अर्जामुळे पुन्हा रिटनटेस्टसाठी काॅल आला.ती टेस्ट होऊनही महिनाभर उलटून गेला.रोजचं रुटीन अक्षरश: कसंबसं रेटणं सुरु होतं. मिलमधली नोकरी एक तर खाजगी. मिलमजुरांची आणि इतर स्टाफची पीएफ् खाती वर्षानुवर्षे अपडेटच केलेली नव्हती. त्यामुळे ऑडिटर्सनी घेतलेल्या स्ट्रीक्ट ॲक्शनमुळे ते प्रदीर्घकाळ पेंडिंग असलेले काम शिकून घेऊन ठराविक मुदतीत पूर्ण करण्याचं प्रचंड दडपण माझ्यावर असायचं.आमचे मॅनेजर शास्त्रीसाहेब तर कायम कातावलेलेच असायचे. कामासंदर्भातल्या काही शंका असतील तर त्यांच्याकडे जाऊन सांगण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. मी अदबीने त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो की मला पाहून त्यांचं कपाळ आठ्यांनी भरून जायचं. ते कामच अतिशय एकसूरी आणि किचकट असल्यामुळे खूप कंटाळवाणं वाटायचं न् तिथं माझ्या शंकांचं निरसन करुन कामाला गती देणारं कुणीही नव्हतं. तरीही ती नोकरी माझी गरज म्हणून मला टिकवणं भागच होतं. कामासाठी रोज रात्री उशीरपर्यंत बसायला लागायचं. खूप उशीर झाला की बस नसल्याने भुकेल्यापोटी शिवडीहून दादरपर्यंत चालत यावे लागे.या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत बहिणीच्या घरी मिळणारं घरपण हाच एकमेव दिलासा होता.

बहिणीचं मूळ सासरघर कोल्हापूरला होतं. तिथं घरी सर्वांना आणि इस्लामपूरला आमच्या आईबाबांनाही भेटण्यासाठी म्हणून बहिणीने रजा घेऊन थोडे दिवस तिकडं जाऊन यायचं ठरवलं.तिला पोचवायला मेहुणेही जाणार होते.दोन चार दिवस राहून ते परत येणार होते. त्या दरम्यान दादरला एकट्यानंच रहाणं माझ्या जीवावर आलं होतं. ते न सांगताच समजल्यासारखं माझी डोंबिवलीची मावशी एकदा दादरला बहिणीकडे आली होती, तेव्हा ती ‘तुम्ही जाऊन परत येईपर्यंत याचे इथे जेवणाचे हाल कशाला?थोडे दिवस बदल म्हणून मी याला डोंबिवलीला घेऊन जाते’ म्हणाली.मी चार दिवस मावशीकडे रहायचं आणि मेहुणे परत येतील तेव्हा मी त्यांना दादर स्टॅंडवर उतरवून घ्यायला यायचं न् मग दोघांनी दादरच्या त्यांच्या घरी जायचं असं सगळं आमचं  निघतानाच ठरलं. हे सगळं मला त्यावेळी सोईचं वाटलं खरं, पण तेच पुढं माझ्या आयुष्यात मात्र प्रचंड उलथापालथ करणार होतं याची तेव्हा आम्हा कुणालाच कल्पना नव्हती ! आज इतक्या वर्षानंतर ते सगळं आठवतं तेव्हा या सगळ्या घटनाक्रमात लपलेल्या अघटीत योगायोगाचं आश्चर्य वाटतं एवढं खरं!

ठरल्याप्रमाणे मी त्या रविवारी डोंबिवलीहून माझी बॅग घेऊन मेहुण्याना उतरवून घ्यायला निघालो. त्यांची बस रात्री साडेआठला येणार होती. उशीर व्हायला नको म्हणून मी आठ वाजताच तिथे जाऊन बसची वाट पहात थांबलो.बस अनपेक्षितपणे तासभर उशिरा आली. तिथून चित्रा टॉकीजसमोरच्या इस्माईल बिल्डिंगमधल्या घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे साडेनऊ वाजून गेले होते. सामान घरी ठेवून,फ्रेश होऊन लगेच बाहेर जेवायला जायचं ठरलं होतं. आम्ही गडबडीने कुलूप काढून दार ढकललं तर समोरच शटरमधून आत टाकलेली दोन तीन पत्रे पडलेली होती. पुढे होऊन मी ती उचलली आणि पाहिलं तर त्यात एक लिफाफा चक्क माझ्या नावाचा होता ! इथे या पत्त्यावर आणि माझं पत्र? उत्सुकतेपोटी तो लिफाफा उचलला आणि घाईघाईने उघडून पाहिला तर आत ‘युनियन बॅंक आॅफ इंडिया’ कडून आलेलं एक पत्र होतं. मुंबईत आल्याबरोबर मी मेहुण्यांच्या सल्ल्याने माझ्या मनात नसतानाही इथल्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मधे नाव नोंदवलं होतं त्याची आठवण करुन देणारं ते पत्र होतं! कारण ते पत्र म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजद्वारे मागवलेल्या यादीनुसार नुकत्याच राष्ट्रीयीकरण झालेल्या युनियन बँक ऑफ इंडियाने मला पाठवलेलं ते रिटन टेस्टचं कॉल लेटर होतं! जीवघेण्या उकाड्यांत अनपेक्षितपणे मनाला स्पर्शून गेलेली ती गार वाऱ्याची झुळूकच होती जशीकांही! हे अनपेक्षित पत्र म्हणजे ‘स्वान मिल’ मधल्या रुक्ष,कोंदट वातावरणातून मला तात्काळ बाहेर पडणं सहजसुलभ  करणारी एक संधीच होती.त्या अनपेक्षित आनंदाच्या भरात क्षणाचाही विलंब न लावता मी ते कॉललेटर झरझर वाचून पूर्ण केलं आणि त्याचक्षणी सगळी शक्तीच कुणीतरी काढून घेतल्यासारखा मटकन् खुर्चीत बसलो. पत्र धरलेला माझा हात थरथरु लागला. डोळे नकळत भरून आले.

फ्रेश होऊन जेवायला जायच्या तयारीने मेहुणे बाहेर आले आणि मला पहाताच थबकले.

“काय रे? काय झालं? कुणाचं..कसलं पत्र आहे ते?”

मी सून्न होऊन गप्प बसलो.आता बोलण्यासारखं कांही शिल्लक होतंच कुठं? मी न बोलता ते पत्र त्यांच्या हातात दिलं.

“ओह्…” तो धक्का त्यांनाही अनपेक्षित होता. कारण प्रवासाला जाण्यापूर्वी दादरच्या घराला कुलूप लावलं होतं त्याच दिवशी हे पत्र इथं येऊन पडलं होतं,म्हणजे साधारण आठवडा होऊन गेला होता.पण ते आमच्या हातात पडायला मात्र बराच उशीर झाला होता. कारण रिटन-टेस्टची तारीख आदल्या दिवशीची म्हणजे शनिवारची आणि वेळ दुपारी अकराची होती. अर्थातच रिटर्न टेस्ट कालच होऊन गेलेली होती!

हातातोंडाशी आलेला सुग्रास घास पुन्हा एकदा हिरावला गेला होता!

मन कोंदट अंधाराने भरुन गेलेलं असतानाच पुढचे तीन साडेतीन तास असे झंझावातासारखे आले की अनपेक्षितपणे आकारलेल्या सकारात्मक घटनांनी त्या अंधारल्या मनात पुन्हा आशेची ज्योत पल्लवित झाली!

क्रमश:..  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments