श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग १४ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- प्रवासाला जाण्यापूर्वी दादरच्या घराला कुलूप लावलं होतं त्याच दिवशी हे पत्र इथं येऊन पडलं होतं. म्हणजे साधारण आठवडा उलटून गेला होता.पण ते आमच्या हातात पडायला मात्र बराच उशीर झाला होता.कारण रिटन-टेस्टची तारीख आदल्या दिवशीची म्हणजेच शनिवारची होती आणि वेळ दुपारी ११ची. अर्थातच रिटन-टेस्टची तारीख उलटून गेली होती.हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेला होता!
मग कोंदट अंधाराने भरून गेलेलं असतानाच पुढचे तीन साडेतीन तास असे झंझावातासारखे आले की अपेक्षितपणे आकारलेल्या सकारात्मक घटनांनी त्या अंधारल्या मनात पुन्हा आशेची ज्योत पल्लवित केली..!)
युनियन बँकेकडून आलेलं ते रिटन टेस्टचं काॅल-लेटर टेस्टची तारीख उलटून गेल्यामुळे आता मुदत उलटून गेलेल्या चेकसारखं माझ्यासाठी कांहीही उपयोग नसलेला कागदाचा एक तुकडाच होतं फक्त.तेच काॅल लेटर वाचून विचारात पडलेले मेहुणे एखाद्या गूढ विचारात गढल्यासारखे स्वतःतच हरवलेले होते. दुसऱ्याच क्षणी काहीतरी गवसल्याच्या उत्साहात ते झपकन् पुढे आले. ते कॉल लेटर माझ्या हातात देऊन घाईघाईने त्यांनी चप्पल पायात सरकवल्या आणि तडक बाहेर पडले. मी कांहीशा गोंधळल्या अवस्थेत दाराकडे धाव घेतली.
“क..काय झालं? कुठे निघालात?” न रहावून मी विचारलं.
“येतो लगेच.आलोच.
तू थांब..” मागे वळूनही न बघता ते दिसेनासे झाले.
ते परत येईपर्यंतची पंधरा मिनिटं मला तिथंच गोठून गेल्यासारखी वाटत राहिली. सरता न सरणारी!
मला अपराध्यासारखं वाटू लागलं. खरंतर आम्ही घरी येताना वाटेतच ठरवल्यानुसार घरी सामान ठेवून,फ्रेश होऊन लगेच जेवायला बाहेर पडणार होतो. एक तर ते एवढ्या लांबच्या प्रवासातून दमून आलेले होते. त्यांना कडकडून भूकही लागलेली होती. असं असताना हे असं अचानक सगळं विचित्रच घडू लागलंय.कुठे गेलेयत हे?
पंधरा एक मिनिटांनी ते घाईघाईने परत आले.
“हे बघ आता जेवण राहू दे. जेवत बसलो तर फार उशीर होईल. मी प्रवासातच थोडी केळी घेतलेली आहेत.तुझ्या आईनं थोडे लाडूही दिलेत. दोघंही तेच घासभर खाऊन घेऊ न् लगेच बाहेर पडू. आपल्याला आत्ताच्या आत्ता ठाण्याला जायचंय?”
हे सगळं त्या क्षणी माझ्यासाठी अनपेक्षित आणि अनाकलनीयच होतं.
“आत्ता..?इतक्या रात्री..?”
“हो..”
“कशासाठी..?”
“जे करायचं ते फार वेळ न दवडता आजच्या आजच करायला हवं म्हणून.हे बघ,मी वरच्या मजल्यावरच्या गोगटे आजोबांच्या घरुन माझ्या ठाण्याच्या मावसबहिणीला फोन करायला गेलो होतो.मी बोललोय तिच्याशी. तिचा इंजिनीयर झालेला धाकटा दीर नुकताच टेक्निकल ऑफिसर म्हणून युनियन बँकेत लागल्याचं मी ऐकून होतो. ते सर्वजण एकत्रच रहातायत.मी ‘त्यांना मला तातडीनं भेटायचंय.महत्त्वाचं काम आहे.लगेच येऊ का?’असं फोनवर बहिणीला विचारलंय. ती ‘ये’ म्हणालीय. आपण आत्ता त्यांना भेटायला जातोय. त्यांच्या ओळखीनं काहीतरी मार्ग निघेल.”
त्यांचा आशावाद जबरदस्त होता. सगळं माझ्यासाठीच तर सुरू होतं. मी ‘नाही-नको’ म्हणायचा प्रश्नच नव्हता.पण तरीही….?
“तुम्ही प्रवासातून दमून आला आहात ना? उद्या सकाळी लवकर गेलो तर नाही का चालणार?”
“कदाचित उशीर होईल. ती ‘ये’ म्हणालीय तर आत्ताच जाऊ. चल. आवर लौकर..”
ठाण्याला जाऊन आम्ही त्यांच्या बहिणीच्या घराची बेल वाजवली तेव्हा रात्रीचे अकरा वाजून गेले होते.मन आशा निराशेच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेत होतं. अनिश्चिततेच्या भावनेनं ते कातर झालेलं होतं.
दारावरची बेल वाजवताच आमचीच वाट पहात असल्यासारखं दार तत्परतेनं उघडलं गेलं.हे साठे कुटुंबीय. मिसेस साठेंनी आमचं हसतमुखाने स्वागत केलं.
“बराच उशीर झालाय पण अगदी नाईलाज म्हणून तुला त्रास द्यावा लागतोय बघ.”
मेहुणे त्यांच्या मावस बहिणीला.. म्हणजेच मिसेस साठेना म्हणाले.
“त्रास कसलाअरे? मी निरंजन भाऊजींना कल्पना देऊन ठेवलीय.त्यांना बोलावते. तू सांग त्यांना सगळं. तुमच्या गप्पा होईपर्यंत मी गरम काॅफी करते पटकन्.आलेच.”
इथे येताना माझ्या मनात असणारा संकोच या मनमोकळ्या स्वागतानं विरून गेला.
“नमस्कार..”
हसतमुखाने नमस्कार करीत निरंजन साठे आमच्यासमोर उभे होते. त्यांना पाहिलं आणि मन निश्चिंतच झालं एकदम. तो त्यांच्या प्रसन्न,देखण्या,रुबाबदार आणि मुख्य म्हणजे निगर्वी व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होता की माझ्या मनाला मिळालेला अकल्पित संकेत होता कुणास ठाऊक पण मन निश्चिंत झालं होतं एवढं खरं.
मेहुण्यांनी नेमकी अडचण थोडक्यात सांगितली. मी सोबत आणलेलं कॉल-लेटर संदर्भासाठी त्यांच्या पुढे केलं. त्यांनी ते वाचलं. त्याची अलगद घडी घालून ते मला परत दिलं.
“एक काम करूया. उद्या सकाळी बरोबर दहा वाजता तू चर्नीरोडवरील युनियन बँकेच्या ‘मेहता-महाल’ मधल्या ऑफिसमधे ये. हे माझं कार्ड. लिफ्टने आठव्या मजल्यावर येऊन माझ्या केबिनमधे यायचं.आपण शेजारच्या ‘मेहता चेंबर्स’ बिल्डिंगमधे ग्राउंड फ्लोअरलाच बॅंकेचं रिक्रुटमेंट सेल आहे तिथे जाऊ.तिथेच ही सगळी रिक्रूटमेंट प्रोसेस सुरू आहे. डाॅ.विष्णू कर्डक तिथले सुपरिंटेंडंट आहेत. दोन महिन्यांपूर्वीच माझा इंटरव्यूही त्यांनीच घेतला होता. त्यामुळे ते बहुधा मला ओळखतील. आपण त्यांना भेटून सांगू सगळं.बघू काय होतं ते.एन.आय.बी.एम.च्या सहकार्याने बँकेतर्फे आठएक दिवसांचे रेक्रूटमेंट प्रोसेस सुरू आहे हे मी ऐकून होतो. तुझी रिटन टेस्ट हा त्याचाच एक भाग असणार आहे. टेस्ट-प्रोग्रॅम शनिवारी संपला असेल तर मात्र प्रॉब्लेम येईल.एरवी काहीतरी मार्ग निघू शकेल”
निरंजन साठे यांनी सर्व परिस्थिती नेमक्या शब्दात समजून सांगितली.आशेचा एक अंधूक किरण दिसू लागला. आम्हाला इथे यायची बुद्धी झाली, प्रयत्नांची दिशा का होईना पण नेमकी सापडली हा दिलासा असला तरी अनिश्चितताही होतीच.
कॉफी घेऊन त्यांचे आभार मानून आम्ही बाहेर पडलो तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली होती!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈