श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग १५ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- दारावरची बेल वाजवताच आमचीच वाट पहात असल्यासारखं दार तत्परतेने उघडलं गेलं. निरंजन साठेनी माझी नेमकी अडचण समजून घेतली आणि मोजक्या शब्दात वस्तुस्थितीची कल्पनाही मला दिली.ते म्हणाले,
“युनियन बँकेच्या ‘मेहता चेंबर्स’ मधील ‘रेक्रूटमेंट सेल’ मधे गेल्या आठवड्यापासून रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे. डॉ. विष्णू कर्डक तिथे सुपरिंटेंडेंट आहेत. दोन महिन्यांपूर्वी माझा इंटरव्ह्यूही त्यांनीच घेतला होता. त्यानंतर आमची भेट नाहीय, पण ते बहुतेक मला ओळखतील. आपण त्यांना सांगू सगळं. टेस्टप्रोग्रॅम शनिवारी संपला असेल तर मात्र प्रॉब्लेम येईल, एरवी काहीतरी मार्ग निघू शकेल.माझं डिपार्टमेंट त्याच कॅम्पसमधील ‘मेहता महल’ मधे आहे.हे माझं कार्ड.तू सोमवारी बरोबर सकाळी दहा वाजता माझ्या केबिनमधे ये. आपण भेटू डाॅ.कर्डकना. बघू काय होतं ते.”
निरंजन साठेंच्या घरून निघालो तेव्हा इतका वेळ मनात भरून राहिलेल्या अंधारात प्रयत्नांची दिशा दाखवणारा आशेचा अंधुक का होईना एक किरण मला दिसू लागला.)
साठे कुटुंबीयांचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली होती.
‘उद्याची सकाळ प्रसन्न प्रकाश घेऊन येईल की हा रात्रीचा काळोख सरलेलाच नसेल?’ या संभ्रमात रात्री उशिरा अंथरुणाला पाठ टेकली खरी,पण स्वस्थ झोप नव्हतीच.
जागरणाचा शीण आणि विचारांचं दडपण घेऊन मी चर्नीरोडला लोकलमधून उतरलो.वेळ गाठायची निकड होती, त्यामुळे घरून थोडंफार कसंबसं खाऊन निघालो होतो पण भूक भागलेली नव्हतीच. त्यामुळेच असेल, हाकेच्या अंतरावरचा ‘मेहता महाल’ मला मैलोन् मैल दूर असल्यासारखा वाटत राहिला.
या कुठल्याच उलाढालींची कल्पना घरी आई-बाबा कुणालाही नव्हतीच. त्यांना दिलासा देणारं यातून कांही चांगलं निष्पन्न झालं तरच मला आनंद वाटणार होता. मग त्यासाठी टेस्ट-इंटरव्यू वगैरे सोपस्कारांमधून बाहेर पडायला कितीही दिवस लागले तरी वाट पहायची माझी तयारी होती. ही कोंडी एकदाची फुटावी,अंधार सरावा, नवी प्रकाशवाट दिसावी एवढंच उत्कटतेनं वाटत होतं.पण आश्चर्य म्हणजे त्यासाठी थांबावं लागलंच नाही! वाट पहायची वेळ आलीच नाही. कारण पुढची पंधरा-वीस मिनिटं असा काही झंझावात घेऊन आली की मन उत्साहानं भरूनच गेलं एकदम.
मी ‘मेहता महल’ च्या लिफ्टपाशी जाऊन थांबलो तेवढ्यात मला निरंजन साठे लगबगीने लिफ्टच्या दिशेनेच येताना दिसले. मी तत्परतेने पुढे होऊन त्यांना ‘विश’ केलं.ते हसले. त्यांनी हातातल्या घड्याळात पाहिलं.
“शार्प टेन. गुड. बरं झालं इथेच भेटलो आपण. चल लगेच. डॉ.कर्डकना आधी भेटू. बघू काय म्हणतात ते.”
डॉ. कर्डकांनी आमचं हसतमुखाने स्वागत केलं.
“येस मि.साठे, हाऊ आर यू?”
” फाईन सर. थँक्यू.व्हेरी बिझी?”
” ऑफ कोर्स…,बट नाॅट फाॅर यू..बोला.”
“याचे एक छोटेसे काम आहे तुमच्याकडे.म्हणून मुद्दाम याला घेऊन आलोय.”बोलता बोलता माझ्याकडून कॉल लेटर घेऊन ते निरंजननी त्यांच्यापुढे केलं. नेमका प्रॉब्लेम त्यांना समजावून सांगितला.
“माय गुडनेस..आज शेवटचा दिवस आहे रिटन-टेस्ट प्रोसेसचा. आताच आलात फार बरं झालं. जस्ट अ मिनिट. मी बघतो काय करता येईल ते. बसा.आलोच.”
माझं कॉल लेटर सोबत घेऊन ते झरकन् उठले. केबिन बाहेर गेले .ते परत येईपर्यंतच्या क्षणात एक प्रकारची निश्चिंतता माझ्या मनात पाझरत राहिलेली होती. डाॅ.कर्डक यांचं व्यक्तिमत्वच नव्हे तर त्यांचा अॅप्रोचही उत्साहवर्धक होता.
डाॅ.कर्डक हे सायकॉलॉजी घेऊन एम्. ए. झाले होते अन् मग त्यातच डॉक्टरेट! तेही खास रेक्रूटमेंट इन्चार्ज म्हणून नुकतेच रुजू झाले होते. एन.आय.बी.एम च्या मार्गदर्शनाखाली ‘अॅप्टीट्यूड टेस्ट’ च्या माध्यमातून ‘फास्टट्रॅक रेक्रूटमेंट प्रोसेसची राष्ट्रीयकृत बँकांमधली ही सुरुवात होती.
” हे बघ, आता सव्वा दहा वाजलेत. साडेदहाच्या बॅचला किंवा दुपारी अडीचच्या बॅचला तुला रिटन टेस्ट देता येईल. काय करतोस बोल.”
डाॅ. कर्डकनी मला विचारलं. क्षणाचाही विचार न करता मी म्हणालो,” सर,आत्ताची साडेदहाची बॅच चालेल मला”
“चल तर मग.पेन आहे ना जवळ ?”
“हो सर”
“गुड.कम फास्ट…!”
माझी वाट न पहाता ते तातडीने केबिनबाहेर पडले. मी जाऊ लागणार तेवढ्यात निरंजन साठेंनी मला थांबवलं.
“आर यू मेंटली प्रीपेअर्ड?”
“हो”
“पण तू खाल्लेयस कां पुरेसं कांही? नाहीतर व्यवस्थित जेवण वगैरे आवरून दुपारी अडीचच्या बॅचलाच ये सरळ. इट विल बी बेटर आय थिंक”
” नाही.. नको. खरंच नको.” त्या विचाराच्या मोहात पडण्यापूर्वीच मी तो विचारच तत्परतेने झटकून टाकला.
” मी खाऊन आलोय.मला आता भूक नाहीये. खरंच.”
मी चक्क खोटं बोललो होतो. कारण समोर आलेली संधी मला दुपारपर्यंत पुढे ढकलायचीच नव्हती.
टेस्टचं स्वरूपही माहीत नसताना भुकेपोटी, अतिशय उतावीळपणानं असं टेस्ट द्यायला तयार होणं हा चक्क एक जुगार होता आणि माझ्याही नकळत का होईना पण मी तो खेळायला प्रवृत्त झालो होतो.
ही लेखी परीक्षा म्हणजे अॅप्टीट्यूड टेस्ट होती. .इंग्रजी, गणित,सामान्यज्ञान याबरोबरच मुख्यत: बौद्धिक क्षमतेची चाचणी घेणारी एक टेस्ट.शंभर प्रश्न होते. पर्यायी उत्तरांमधल्या अचूक उत्तराला टिक करायची होती. हल्ली सर्रास सुरु झालेल्या प्रोसेसचं ते सुरुवातीचं पहिलं वर्ष होतं.
मघाशी या प्रोसेसचा ‘फास्टट्रॅक’ असा उल्लेख मी केला त्यानुसार खरोखरच पुढचं प्रोसेस विनाविलंब द्रूतगतीनं सुरु झालं.रिटन टेस्टच्या दुसऱ्याच दिवशी टेस्टमध्ये उत्तीर्ण झालेल्यांची लिस्ट बँकेतल्या काचफलकांत लगेचच झळकली. त्यात माझा नंबर बराच वरचा होता. तिसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू झाले आणि पाचव्या दिवशी माझ्या हातात नेमणुकीचं पत्रही पडलं.ते खरंच एक आक्रितच होतं. क्षणभर मला मी स्वप्नातच हे सगळं बघतोय,अनुभवतोय असंच वाटत राहिलं. तसं तर हे सगळं योगायोगानंच घडलं होतं असं वाटेल खरं,पण ते तसं नव्हतं.मी मेव्हण्यांच्या सूचनेनुसार त्यादिवशी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधे नाव नोंदवलंच नसतं तर?त्यांनीच पुढाकार घेऊन रात्री उशीर झालेला असूनही माझ्यासाठी लगोलग ठाण्याला जायचा निर्णय घेतलाच नसता तर? किंबहुना त्यांच्या मावस बहिणीचा दीर नेमका युनियन बँकेतच असणं आणि त्यानेही अगदी मनापासून माझ्या मदतीला धावून येणं हे सगळे योग्यवेळी योग्य क्रमाने घडत गेलेले केवळ योगायोग असूच कसे शकतील? ते तसे असतीलच तर ते कुणीतरी जाणीवपूर्वक घडवून आणलेले असणार! माझ्या हातात नेमणुकीचं पत्र पडलं त्याक्षणी हे सगळे विचार मनात आले आणि मला उत्कटतेने ‘त्या’ची आठवण झाली. माझा कोणताही नित्यनेम सुरू नसताना,मला नकारात्मक विचारांच्या दडपणात या चार-सहा दिवसात ‘त्या’ची पुसटशी आठवणही झालेली नसताना, ‘त्या’ला माझ्या अशा या मन:स्थितीत कसलं साकडं घालायचा विचार मनात येण्याइतपत स्वस्थताही मला लाभलेली नसतानासुध्दा ‘त्या’ने मात्र माझ्यावर रणरणत्या उन्हात अशी सावली धरलेली होती!!
या जाणीवेच्या स्पर्शानेच मला अचानक बाबांची आठवण झाली. त्यांचा निरोप घेऊन निघतानाचे त्यांचे… ‘सगळं सुरळीत होईल. काळजी नको.’ हे शब्द मला जवळ घेऊन थोपटतायत असं वाटत राहीलं.
‘त्याच्याकडे कधीच काही मागायचं नाही. आपल्यासाठी आपल्या हिताचं काय हे आपल्यापेक्षा त्याला जास्त समजतं. तो यश देतोच. क्वचित कधी अपयश आल्यासारखं वाटलं तरी त्यातच आपलं हित होतं हे नंतर जाणवतंच’…कधी काळी बाबांच्या तोंडून ऐकलेल्या या शब्दांचा रोख गेल्या दोन-तीन महिन्यात घडलेल्या,माझ्या संपूर्ण आयुष्याला नेमकी आणि वेगळी कलाटणी देणाऱ्या घटनांकडेच असावा असा विश्वास
वाटण्याइतका या शब्दांचा नेमका अर्थ या अनुभवांनी मला समजून सांगितला होता. ‘त्या’ला मी इतकी वर्षं मानत आलो होतो. या घटनाक्रमांच्या निमित्ताने ‘त्या’ला जाणण्याची प्रक्रियाही माझ्या मनात नकळत सुरू झाली!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈