श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग १७ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- भावाचं पत्र वाचून पुन्हा उलटसुलट विचार मनात गर्दी करू लागले.आईने लिहिलेला मजकूर वाचून तर मी हळवाच होऊन गेलो.बाबांच्या आठवणीने मी व्याकुळ झालो. अखेर भावनेच्या आहारी जाऊन का होईना पण मी मन घट्ट केलं आणि आता ‘स्टेट बँक’ हेच आपलं नशीब हे स्वीकारलं. युनियन बँक सोडायचा निर्णय पक्का झाला. पण तरीही मनाला स्वस्थता नव्हतीच.मी हातातल्या इनलॅंडलेटरची घडी घालू लागलो आणि लक्षात आलं, त्याला आत दुमडायचा जो फोल्ड असतो तो उलटा धरून त्यावर गिजबीट अक्षरात काही मजकूर दिलेला आहे. हे बाबांनी तर लिहिलं नसेल? हो नक्कीच. थरथरत्या हाताने लिहिल्याचं स्पष्ट जाणवत होतं. प्रयत्नपूर्वक एक एक अक्षर जुळवायचा आटापिटा करून ते वाचलं.त्यातून जे हाती लागलं ते मात्र खरंच लाखमोलाचं होतं!)
घाईघाईने कशीबशी लिहिलेली फक्त दोन वाक्यं होती ती.प्रयत्नपूर्वक अक्षरं जुळवत मी ती वाचली आणि अंतर्बाह्य शहारलो!
‘दत्तकृपेचा प्रसाद म्हणून मिळालेली सध्याची नोकरी काही झालं तरी सोडू नकोस. तिथेच तुझा उत्कर्ष होईल. ‘
या आधीच्या अस्वस्थ मनस्थितीत ‘बाबा हिंडते-फिरते असते तर त्यांच्याशी बोलता तरी आलं असतं.त्यांनी योग्य तो मार्ग नक्कीच दाखवला असता’ असं उत्कटतेनं वाटत राहिलं होतं. ते शक्य नाहीय हे माहित असल्याने मन अधिकच सैरभैर झालं होतं. आणि माझी ही अस्वस्थता नेमकी जाणवल्यासारखं बाबांनी मी न विचारताच माझ्या मनातल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर मला दिलं होतं. मी निश्चिंत झालो. युनियन बँक न सोडण्याचा निर्णय घेतला. खूप दिवसानंतर प्रथमच चार दिवस रजा घेऊ घरी गेलो. मी घेतलेल्या निर्णयाने आई आणि भाऊ दोघांचा खूप विरस झाला होता. आई कांही बोलली नाही पण भाऊ मात्र म्हणाला,
“ही नशिबाने मिळालेली सोन्यासारखी संधी तू सोडायला नको होतीस. तू प्रोबेशन पिरिएडला घाबरून हा निर्णय घेतलायस.हो ना?”
“तसं नाही…पण..”
“मग कसं?”
मी काही न बोलता बाबांकडे पाहिलं. ते शांत झोपले होते. मी बॅग उघडली. बॅगेतलं इन्लॅंडलेटर काढून त्यातला बाबांनी लिहिलेला मजकूर भावाला दाखवला. त्याने तो वाचला आणि अविश्वासाने आईकडे पहात ते पत्र तिच्या हातात दिलं. आईनेही ते वाचलं. काय समजायचं ते समजली. एकवार अंथरुणावर शांतपणे झोपलेल्या बाबांकडे पाहिलं आणि ते पत्र मला परत दिलं.
“माझं लिहून झाल्यावर मी ते चिकटवणार तेवढ्यात यांनी मला थांबवलं होतं. ‘मी वाचून देतो मग टाक’असं म्हणाले होते.
आम्ही खरंतर त्यांना विनाकारण त्रास नको म्हणून त्याबद्दल काही बोललोही नव्हतो. तरीही आमच्या गप्पातून ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं असणार नक्कीच. म्हणून तर जागा मिळाली तेवढ्यात घाईघाईने लिहिलंय हे सगळं जमेल तसं. होतं ते बऱ्यासाठी म्हणायचं दुसरं काय?”
आई असं म्हणाली खरी पण घडलं होतं ते फक्त बऱ्यासाठीच नव्हे तर खूप चांगल्यासाठी होतं याची प्रचिती आम्हा सर्वांना लवकरच आली.
स्टेट बॅंकेतली नोकरी युनियन बॅंकेच्या तुलनेत पगार,इतर सवलती, प्रमोशन्सच्या संधी,मुंबईतून बदली मिळायची अधिक शक्यता अशा सर्वच दृष्टीने निश्चितच आकर्षक होती.तरीही ”दत्तकृपेच्या प्रसाद म्हणून मिळालेली सध्याची नोकरी काही झालं तरी सोडू नकोस. तिथेच तुझा उत्कर्ष होईल ‘ या अंत:प्रेरणेने लिहिलेल्या बाबांच्या शब्दांत लपलेलं गूढ मला योग्य मार्ग दाखवून गेलं होतं.कालांतराने यथावकाश ते गूढही आपसूक उकललं.
माझ्या कन्फर्मेशननंतर लगेचच झालेल्या वेज रिव्हिजनच्या एग्रीमेंटमधे आमच्या बँकेची प्रमोशन पॉलिसी पूर्णतः बदलली. नोकरीची तीन वर्षे पूर्ण होताच प्रमोशनसाठी लेखी परीक्षा आणि इंटरव्यू देण्याचा मार्ग आमच्यासाठी खुला झाला होता. त्यामुळे ती माझ्यासाठी सुवर्णसंधीच ठरली. तीन वर्षे पूर्ण होताच मीही प्रमोशन टेस्ट दिली आणि लगेचच मला पहिलं प्रमोशनही मिळालं.एवढंच नव्हे तर पुढची वेगवेगळ्या
रॅंकची सगळी प्रमोशन्सही मला प्रत्येकवेळी फर्स्ट अटेम्प्टलाच मिळत गेली. त्याही आधी बेळगाव बँक, मिरज स्टेट बँक यासारख्या बँका युनियन बँकेत मर्ज झाल्याने आमच्या बँकेचे ब्रॅच नेटवर्कही सांगली कोल्हापूर भागात अनपेक्षितपणे प्रचंड विस्तारलेलं होतं. त्यामुळे मला लगेचण या भागात बदली तर मिळालीच शिवाय प्रमोशन्सनंतरही प्रत्येक वेळी सोईची पोस्टिंग्जही जवळपासच मिळत गेली. स्टेट बँकेत राहिलो असतो तर हे इतकं सगळं इतक्या सहजपणे नक्कीच मिळालं नसतं.
हे सगळं ज्यांच्या प्रेरणेने शक्य झालं ते माझे बाबा मात्र हा सगळा उत्कर्ष पहायला होतेच कुठे?
बाबांनी इनलॅंडलेटरमधे लिहिलेला तो दोन वाक्यांचा मजकूर हाच आमचा अखेरचा संवाद ठरला होता. कारण त्यानंतर लगेचच सप्टेंबर १९७३ मधे ते गेलेच. जाताना त्यांची सगळी पूर्वपुण्याई आणि आजही मला दिशा दाखवणाऱ्या त्यांच्या मोलाच्या आठवणी हे सगळं ते जाण्याआधी जणू माझ्या नावे करून गेले होते!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈