श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – माझे बाबा ‘तो’ आणि मी यांच्यातला एक दुवा आहेत असं पूर्वी वाटायचं. ते गेले आणि तो दुवा निखळला याची रुखरुख पुढे बरेच दिवस मनात होती.पण ‘त्या’नेच मला सावरलं. तो दुवा निखळल्यानंतर ‘तो’ आणि मी यांच्यातलं अंतर खरंतर वाढायला हवं होतं पण तसं झालं नाही.ते दिवसेंदिवस कमीच होत गेलं.)

आज मला जाणवतं ते असं की माझ्या अजाण वयापासूनच सभोवतालच्या आणि विशेषतः घरच्या वातावरणामुळे श्रद्धेचं बीजारोपण माझ्या मनोभूमीत झालंच होतं. नंतरच्या अनेक अघटीत घटना, प्रसंग यांच्या खतपाण्यामुळे ते बी रुजलं,अंकुरलं आणि फोफावलं. त्या श्रद्धेबरोबरच आई-बाबांनी त्यांचे अविरत कष्ट, प्रतिकूल परिस्थितीतही जपलेला प्रामाणिकपणा, सह्रदयता आणि माणुसकी यासारख्या मूल्यांचे संस्कार स्वतःच्या आचरणांनी आम्हा मुलांवर केले होतेच. त्यामुळे मनातल्या श्रद्धेतला निखळपणा सदैव तसाच रहाण्यास मदत झाली. ती श्रद्धा रुजता-वाढताना कधी कणभरही अंधश्रद्धेकडे झुकली नाही.अनेक अडचणी, संकटांच्यावेळीही ‘त्या’च्याकडे कधी ‘याचक’ बनून पहावंसं वाटलं नाही. त्या त्या प्रत्येक वेळी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना ‘तो’ फक्त एक साक्षीदार म्हणून सदैव माझ्या मनात उभा असायचा. ‘कृपादृष्टी असू दे’ एवढीच मनोमन एकच प्रार्थना ‘त्या’च्या चरणी असे. त्यामुळे स्वतःची अंगभूत कर्तव्यं निष्ठेने आणि मनापासून पार पाडण्याकडेच कल कायम राहिला. नित्यनेमाचे रूपांतर त्यामुळेच असेल कर्मकांडात कधीच झाले नाही. तसे कधी घडू पहातेय अशी वेळ यायची तेव्हा या ना त्या निमित्ताने मी सावरलो जायचो. मग आत्मपरीक्षणाने स्वतःच स्वतः ला सावरायची सवय जशी अंगवळणी पडली तसा मी ‘त्या’च्या अधिकाधिक जवळ जाऊ लागलो. ‘तो’ आणि मी यांच्यातलं अंतर कमी होत जाण्याचे हे एक ‘प्रोसेस’ होते!

आणि मग वेळ आली ती माझ्या कसोटीची. पण त्यालाही माझे बाबा १९७३ साली गेल्यानंतर दहा वर्षांचा काळ उलटून जावा लागला!

बाबा नेहमी म्हणायचे, “दत्तसेवा अनेकांना खूप खडतर वाटते. त्यामुळे ‘मी’ करतो असं म्हणून ती प्रत्येकाला जमत नाही.करवून घेणारा ‘तो’च ही भावना हवी.एकदा निश्चय केला कि  मग त्यापासून परावृत्त करणारेच प्रसंग समोर येत रहातात.तेच आपल्या कसोटीचे क्षण.जे त्या कसोटीला खरे उतरतात तेच तरतात….! “

‘तो’ आपली कसोटी पहात असतो म्हणजे नेमकं काय? आणि त्या कसोटीला ‘खरं’ उतरणं म्हणजे तरी काय? याचा अर्थ समजून सांगणारा अनुभव मला लगेचच आला.

तो दत्तसेवेच्या वाटेवरचं पुढचं पाऊल टाकण्याचा एक क्षण होता. घडलं ते सगळं  अगदी सहज घडावं असं.

यापूर्वी उल्लेख केल्यानुसार १९५९ साली कुरुंदवाड सोडून किर्लोस्करवाडीला जायची वेळ आली तेव्हा आईने दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला दर्शनाला येण्याचं व्रत स्वीकारलं होतं. ते व्रत जवळजवळ दोन तपं अखंड सुरु होतं. आई वय झालं तरी ते व्रत बाबा गेल्यानंतरही श्वासासारखं जपत आली होती.

माझे बँकेतले कामाचे व्याप, जबाबदाऱ्या, दडपणं हे सगळं दिवसेंदिवस वाढत होतंच. त्यामुळे रोजची देवपूजा आणि गुरुचरित्राचं नित्य-वाचन एवढाच माझा नित्यनेम असायचा.

नोव्हेंबर १९८३ मधल्या पौर्णिमेला नेहमीप्रमाणे आई नृसिंहवाडीला गेली आणि अचानक माझी मावस बहिण सासरच्या कार्यासाठी या भागात आली होती आणि माझ्या आईला  भेटून जावं म्हणून आमच्या घरी  आली. थोडा वेळ बसून बोलून मग पुढे पुण्याला जायचं असं तिनं ठरवलं होतं.आई यायची वेळ होत  आली होतीच म्हणून तिची वाट पहात ती  थोडा वेळ थांबली होती.

मी नुकताच बँकेतून येऊन हातपाय धुवत होतो तेवढ्यात आई आली. त्यामुळे दार उघडायला तीच पुढे झाली. आमच्या मुख्यदारापर्यंतच्या तीन पायऱ्या चढतानाही आई खूप थकल्यामुळे गुडघ्यावर हात ठेवून सावकाश चढतेय आणि बहिण तिला हाताचा आधार देऊन आत आणतेय हे मी लांबून पाहिलं आणि कपडे बदलून मी बाहेर जाणार तोवर बहिणीने तिला खुर्ची देऊन भांडंभर पाणीही नेऊन दिलं होतं.

“किती दम लागलाय तुला. आता पुरे झालं हं. अगदी देवधर्म आणि नेम झाला तरी शरीर स्वास्थ्यापेक्षा तो महत्त्वाचा आहे कां सांग बघू. खूप वर्ष सेवा केलीस.आता तब्येत सांभाळून रहायचं” बहिण तिला पोटतिडकीने सांगत होती. दोघींचा संवाद अगदी सहज माझ्या कानावर पडत होता.

“सवयीचं झालंय ग आता.नाही त्रास होत.जमेल तेवढे दिवस जायचं. नंतर आराम आहेच की. त्याच्या कृपेनंच तर सगळं मार्गी लागलंय. मग घरच्या कुणी एकानं तरी जायला हवंच ना गं? प्रत्येकाला त्यांचे त्यांचे व्याप आहेतच ना? इथं मी रिकामीच असते म्हणून मी जाते एवढंच” आई म्हणाली.

आईनं आजपर्यत हक्कानं, अधिकारानं आम्हा कुणावर कधीच काही लादलं नव्हतं. आज मावस बहिण आल्याचं निमित्त झालं म्हणून आईच्या मनाच्या तळातलं मला नेमकं समजलं तरी. आई आता थकलीय. घरातल्या कुणीतरी एकानं जायला हवंच तर मग ते मीच हे ओघानंच आलं. कारण तेव्हा माझा मोठा भाऊ बदली होऊन नागपूरला गेला होता. लहान भाऊ अजून शिकत होता. प्रवासाची दगदग आता यापुढे आईला जमणार नाही हे या प्रसंगामुळे मला तीव्रतेने जाणवलं होतं आणि आईचं ते व्रत आता यापुढे आपण सुरु ठेवायचं आणि त्यातून तिला मोकळं करायचं हे त्याचक्षणी मी मनोमन ठरवून टाकलं. त्यानंतरची डिसेंबर १९८३ ची पौर्णिमा दत्तजयंतीची होती.

या पौर्णिमेला नेहमीप्रमाणे आई सकाळीच नृ.वाडीला गेलेली.त्या संध्याकाळी मी बँकेतून परस्परच वाडीला गेलो. दत्तदर्शन घेतलं. हात जोडून मनोमन प्रार्थना केली ,

‘दर पौर्णिमेला निदान एक तप नित्यनेमाने आपल्या दर्शनासाठी येण्याची माझी मनापासून इच्छा आहे. आपला कृपालोभ असू दे. हातून सेवा घडू दे.” अलगद डोळे उघडले तेव्हा आत्यंतिक समाधानाने मन भरून गेलं होतं. अंत:प्रेरणेने पडलेलं दत्तसेवेच्या वाटेवरचं हे माझं पुढचं पाऊल होतं.

घरी हे आईला सांगितलं.आता यापुढे खूप दगदग करून,ओढ करुन तू अट्टाहासानं नको जाऊस.मी जात जाईन असंही म्हटलं.सगळं ऐकून आई एकदम गंभीरच झाली.

“माझ्याशी आधी बोलायचंस तरी..” ती म्हणाली.

” का बरं?असं का म्हणतेस?”

“उद्या तुझी कुठे लांब बदली झाली तर? कशाला उगीच शब्दात अडकलास?”

“नकळत का होईना अडकलोय खरा” मी हसून म्हटलं. ” तू नेहमी म्हणतेस ना, तसंच. सुरुवात तर केलीय. होईल तितके दिवस जाईन. पुढचं पुढं”

आईशी बोलताना मी हे हसत हसत बोललो खरं पण तिच्या बोलण्यातही तथ्य आहेच हे मला नाकारता येईना.

खरंच. देवापुढे हात जोडून मनोमन संकल्प सोडताना माझ्या ध्यानीमनीही नव्हतं की हा आपला बँकेतला जॉब आहे. तो ट्रान्स्फरेबल आहे. कुठेही कधीही बदली होऊ शकेल. तेव्हा काय करायचं? बारा वर्षांचा दीर्घकाळ आपण थोडेच या परिसरात रहाणार आहोत? पुढे नाही जमलं तर?”

या जरतरच्या गुंत्यात मी फार काळ अडकून पडलो नाही. तरीही ही संकल्पसिद्धी सहज सोपी नाहीय याची प्रचिती मात्र पुढे प्रत्येक पावलावर मला येणार होतीच.

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments