श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग १९ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- आईच्या बोलण्यातही तथ्य आहेच हे मला नाकारता येईना.खरंच.देवापुढे हात जोडून मनोमन संकल्प सोडताना माझ्या ध्यानीमनीही नव्हते की हा आपला बँकेतला जॉब आहे. तो ट्रान्सफरेबल आहे. कुठेही कधीही बदली होऊ शकेल. तेव्हा काय करायचं? बारा वर्षांचा दीर्घकाळ आपण याच परिसरात थोडेच रहाणार आहोत? पुढे नाही जमलं तर?’
या जर-तरच्या गुंत्यात मी फार काळ अडकून पडलो नाही. तरीही ही संकल्पसिद्धी सहज सोपी नाहीय याची प्रचिती मात्र पुढे प्रत्येक पावलावर मला येणार होतीच.)
पुढे चार-पाच महिने काहीच अडसर आला नाही. प्रत्येकवेळी पौर्णिमेला कधी पहाटे लवकर तर कधी ते जमलं नाही तर कितीही उशीर झाला तरी बँकेतली कामं आवरुन संध्याकाळनंतर उशिरा बँकेतून परस्पर नृ.वाडीला जायचं हे ठरुनच गेलं होतं.बसला पौर्णिमेदिवशी गर्दी असल्याने जातायेताचे दोन्ही प्रवास उभं राहूनच करावे लागायचे.पण त्या धावपळीचा कधी त्रास जाणवला नाही.तरीही मी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठून आंघोळ-पूजा आवरायला लागल्याचे पाहून सुरुवातीला आईच मला समजवायची. म्हणायची,
“हे बघ,अगदी पौर्णिमेलाच जायला हवं हा अट्टाहास कशासाठी? पंचमीपर्यंत गेलं तरी चालतं. विनाकारण ओढ नको करत जाऊस.जे करशील ते तब्येत सांभाळून कर.ते महत्त्वाचं”
ती सांगायची त्यात तथ्य होतंच.पण अगदी जमणारच नसेल तर गोष्ट वेगळी असं मला वाटायचं.नाहीच जमलं तर पंचमीच्या आत जायचं आहेच की. पण ते अगदी अपरिहार्य असेल तेव्हाच.तो आपला हुकमाचा एक्का.जरुर पडली तरच वापरायचा. शक्यतो नाहीच.आपल्या सोयीसाठी म्हणून तर नाहीच नाही.’दर पौर्णिमेला मी दर्शनाला येईन’ असा संकल्प केलाय तर शक्यतो पौर्णिमेलाच जायचं हे मी ठरवूनच टाकलं होतं.शेवटी हातून सेवा घडवून घ्यायची की नाही ही ‘त्या’ची इच्छा हाच विचार मनात ठाम होता!
सगळं व्यवस्थित सुरु झालं होतं. पण…? जूनच्या पौर्णिमेचं दत्तदर्शन झालं आणि ध्यानीमनी नसताना १जुलैला अगदी अचानक मला ‘Designated post’ आॅफर करणारी,माझं ‘ब्रॅंच मॅनेजर’ म्हणून महाबळेश्वर ब्रॅंचला पोस्टींग झाल्याची आॅर्डर आली.तीही ताबडतोब रिलीव्ह होऊन ४ जुलैच्या आत महाबळेश्वर ब्रॅंचला हजर होण्याचा आदेश देणारी!
वरवर पहाता खूप आनंदाने साजरी करावी अशी ही घटना होती. राष्ट्रीयकृत बँकांच्या नियमानुसार यापुढील प्रमोशन्ससाठी किमान एक टर्म रुलर ब्रॅंचला काम करणं अपरिहार्य होतंच.अनेकजण अतिशय गैरसोयीच्या खेडेगावी पोस्टिंग झाल्याने सर्वार्थाने खचून गेल्यामुळे जाॅब सॅटीस्फेक्शन अभावी नैराश्याने ग्रासलेले असायचे. या पार्श्वभूमीवर मला रुलर पोस्टिंग मिळालं होतं ते महाबळेश्वरसारख्या हिल स्टेशनवरच्या ब्रॅंचमधलं! हे आॅफीसमधे सर्वांच्याच कौतुकाचा विषयही ठरलं होतंच. पण ते आनंददायी असलं तरी त्या क्षणापर्यंतचं माझं शिस्तबध्दपणे सुरु असलेलं एकमार्गी रुटीन मात्र या घटनेने पूर्णत: ढवळून निघालं. कारण ही आकस्मिक घटना त्या क्षणापुरतीतरी माझ्यासाठी असंख्य प्रश्न निर्माण करणारीच ठरली होती. मनात गर्दी करुन राहिलेल्या त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात पुढचे दोन तीन दिवस कापरासारखे उडून गेले.
माझा मुलगा सलिल तेव्हा चार वर्षांचा होता.तो बालवाडीत जायला लागल्याने आरतीने, माझ्या पत्नीने,एम.ए.नंतर लगेच करता न आलेलं, खूप दिवस मनात असलेलं बी.एड्. करण्यासाठी काॅलेजला अॅडमिशन घेतलेली होती.प्रश्न एक वर्षाचाच होता पण त्यात ही ट्रान्स्फर आॅर्डर आलेली.तिच्या मनातली अस्वस्थता पाहून कांहीतरी ठाम निर्णय मलाच घ्यावा लागणार होता.
“हे बघ,तुला मेरीटवर गव्हर्मेंट काॅलेजमधे अॅडमिशन मिळालीय ना?मग तात्पुरत्या अडचणींचा विचार करुन माघार घेऊ नको.वर्षभर मी तिकडे एकटा राहीन.इथलं सगळं योग्य नियोजन करुन कसं निभवायचं ते शांतपणे विचार करुन ठरवूया.”
तिला दिलासा द्यायला माझे शब्द पुरेसे होते.पण तरीही..
” तिथं तुमच्या जेवणाचं काय ?तब्येतीची हेळसांड होईल ती वेगळीच.नकोच ते.”
“माझं काय करायचं ते तिथं गेल्यानंतर परिस्थिती पाहून ठरवता येईल.आणि तसंही तिथल्या धुवांधार पावसाचा विचार करता पावसाळा संपेपर्यंत तरी आपल्याला कोल्हापूरहून शिफ्टिंग करता येणार नाहीच. तोवर तुझी पहिली टर्म पूर्ण होत आलेली असेल.मग दुसऱ्या टर्मपुरताच तर प्रश्न राहील.थोडा त्रास होईल पण निभेल सगळं.”
ठामपणे निर्णय घेतला खरा पण तो निभवायचा कसा हा यक्षप्रश्न माझ्यापुढे ‘आ’ वासून उभा होताच.हेच उलटसुलट विचार मनात घेऊन ४ जुलैला जुजबी सामान सोबत घेऊन मी पहाटेच्या महाबळेश्वर बसमधे चढलो.बस सुरु झाली,घराबरोबर गावही मागं पडलं.तेच एकटेपण मनात घेऊन श्रांतपणे मान मागे टेकवून अलगद डोळे मिटणार तेवढ्यात कंडक्टर तिकिटासाठी आलाच.मी खिशातून पाकीट काढून पैसे दिले.त्यानं दिलेलं तिकीट न् सुटे पैसे पाकीटात ठेवत असतानाच आत निगुतीने ठेवलेला,बाबांनी मला कधीकाळी दिलेला ‘तो’ दत्ताचा फोटो मला दिसला न् मी दचकून भानावर आलो.गेले दोन -तीन दिवस मला गुंतवून ठेवणाऱ्या सगळ्या व्यवधानांत मी माझ्या दर पौर्णिमेला दत्तदर्शनासाठी नृ.वाडीला जायच्या संकल्पाचा विचार कुठंतरी हरवूनच बसलो होतो याची आठवण त्या फोटोनेच करुन दिली आणि त्याच संकल्पाचा विचार एक प्रश्न बनून मनाला टोचणी देत राहीला. खरंतर हा प्रश्न तातडीचा नव्हता. जुलैमधल्या पौर्णिमेला अजून किमान तीन आठवडे बाकी होते.पण तरीही..? हे दर महिन्याला नित्यनेमाने तिथून नृ.वाडीला येणं आपल्याला जमेल? मनातले इतर सगळे प्रश्न,सगळ्या विवंचना,नवीन ब्रॅंच कशी असेल,तिथला स्टाफ कसा असेल या विचारांचं उत्सुकतेत लपलेलं दडपण हे सगळं दूर सारत पौर्णिमेच्या नित्यनेमाबद्दलचा ‘हे निर्विघ्नपणे पार पडेल?’ हाच प्रश्न मनात ठाण मांडून बसला.मग पूर्ण प्रवासभर मनात त्यासंबंधीचेच विचार.
महाबळेश्वरपासून नृ.वाडी पर्यंतचं अंतर (त्याकाळी) साधारण सात-साडेसात तासांचं होतं.जातायेताचे पंधरा तास लागणार असतील,तर पौर्णिमेलाच जायचा अट्टाहास चालणार कसा? पौर्णिमा कांही रविवारीच नसणाराय.मग? असू दे.जमेल तितके दिवस यायचंच हे पक्कं ठरवूनच टाकलं.त्याच क्षणी ते कसं जमवायचं याचे विचार सुरु झाले.त्यासाठी ‘जे जे करावं लागेल ते ते कर्तव्य न् जबाबदाऱ्या यांच्याबाबतीत कोणतीही तडजोड न करता करायचं ‘ हा निर्धार पक्का झाला.ते कसं करायचं ते पुढचं पुढं.अशा मगळ्या उलटसुलट विचारांच्या गुंत्यात महाबळेश्वर स्टॅन्ड कधी आलं ते मलाच समजलं नाही. सगळं सामान कसंबसं एका हातात घेऊन आणि दुसऱ्या हातात लहान बॅगेसोबतच जमेल तशी छत्री धरायचा प्रयत्न करीत मी बसच्या पायऱ्या उतरू लागणार तेवढ्यात तिथेच थबकलो.कारण समोर माझ्या स्वागतालाच आल्यासारखा प्रपाताप्रमाणे कोसळणारा अखंड पाऊस माझ्याकडे पाहून जणू विकट हास्य करीत माझी वाट अडवून ओसंडत होता. माझ्याइतकीच हतबल झालेली सोबतची छत्री न् सामान कसंबसं सावरत मी त्या भयावह धुवांधार प्रपाताला सामोरा गेलो ते मनातल्या ‘त्या’च्या विचाराचं बोट घट्ट धरुनच!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈