श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग २० ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- मनातले इतर सगळे प्रश्न,सगळ्या विवंचना,नवीन ब्रॅंच कशी असेल, तिथला स्टाफ कसा असेल या विचारांचं उत्सुकतेत लपलेलं दडपण हे सगळं दूर सारत पौर्णिमेच्या नित्यनेमाबद्दलचा ‘ते निर्विघ्नपणे पार पडेल ना?’ हाच प्रश्न मनात ठाण मांडून बसला. मग पूर्ण प्रवासात ते कसं साध्य करायचं याच्या उलटसुलट विचारांच्या गुंत्यात महाबळेश्वर स्टॅण्ड कधी आलं ते समजलंच नाही. सगळं सामान एका हातात कसंबसं घेऊन आणि दुसऱ्या हातात लहान बॅगेसोबतच जमेल तशी धरलेली छत्री सावरत मी बसच्या पायऱ्या उतरु लागणार तेवढ्यात तिथेच थबकलो. कारण समोर माझ्या स्वागताला विकट हास्य केल्यागत प्रपातासारखा कोसळणारा अखंड पाऊस माझी वाट अडवून ओसंडत होता! माझ्याइतकीच हतबल झालेली हातातली छत्री न् सामान जमेल तसं सावरत मी त्या भयावह, धुवांधार प्रपाताला सामोरं गेलो ते मनातल्या ‘त्या’च्या विचाराचं बोट घट्ट धरूनच!)
बसमधून उतरून धावत स्टॅंडवर आत आडोशाला जाऊन थांबेपर्यंतच मी चिंब भिजून गेलो होतो.त्याच अवस्थेत हात करुन टॅक्सी बोलावली.आधी मेन रोडवरचं जवळचं लाॅज गाठलं आणि मग पुढचे सगळे सोपस्कार!
आयुष्यातलं माझं हे पहिलंच ‘महाबळेश्वरदर्शन’! पण ते स्वप्नवत वगैरे नव्हे तर असं भयावह होतं!!तिथं बऱ्यापैकी सावरण्यातच पहिले दहा दिवस सरले ते पावलोपावली येणाऱ्या नित्यनव्या तडजोडी नाईलाजाने जमेल तितक्या अंगी मुरवतच. त्याही परिस्थितीत मी बऱ्यापैकी सावरु शकलो ते ब्रॅंचजवळच पाहिलेली दोन रुम्सची तात्पुरती छोटीशी भाड्याची जागा,घरगुती जेवणाची सोय आणि ब्रॅंचमधले माझे चांगले सहकारी यामुळेच!
रिपोर्टींगच्या पहिल्याच दिवशी श्री.रांजणे,आमचे हेडकॅशिअर यांनी आपुलकीने मला दिलेल्या आग्रहपूर्वक सल्ल्यामुळे त्यांनाच सोबत घेऊन मी आधी जवळच्याच दुकानातून रेनकोट,फुल स्वेटर आणि गमबूट यांची तातडीने खरेदी केली.या वस्तू ही तिथली दोन वेळच्या जेवणाइतकीच जीवनावश्यक गरज होती याबाबत तोवर मी अनभिज्ञच होतो.त्या नव्या पेहरावात मी प्रथम आरशात पाहिलं तेव्हा मी स्वत:लाच ओळखता न येण्याइतका कुणीतरी ति-हाईतच वाटलो होतो!
या जीवननाट्यातल्या माझ्या या नव्या भूमिकेचा सराव माझ्यासाठी खूप त्रासदायकच नाही तर आव्हानात्मकही होता.प्रतिकूल परिस्थितीतल्या अखंड व्यवधानांमुळे माझा होम सिकनेस मलूल होऊन मनातल्या एका कोपऱ्यात मान वर न करता पडून असायचा.घरगुती जेवणाची सोय घरापासून एरवी पाच मिनिटं चालत जाता येईल एवढ्याच अंतरावर.त्या काकूही स्वैपाक सुग्रास करायच्या,आग्रहानं वाढायच्या, पण कडकडीत भूक लागलेली असूनही घराबाहेर पडायलाच नको असं वाटायचं. कारण गमबूटाचं ओझं घेऊन छत्री सावरत चालताना भर दिवसाही पावसाच्या प्रचंड संततधारेत समोरचं कणभरही दिसायचं नाही.दोन वेळचं जेवण हे या अर्थानेही यज्ञकर्मच वाटायचं.थकून भागून रात्री अंथरुणावर पाठ टेकली की पहिला विचार यायचा तो जुलै महिन्याची पौर्णिमा जवळ येत असल्याचाच.अर्थात बदलीनंतर तिथं रिपोर्ट केल्यानंतर आम्हाला आठवडाभराची ट्रान्झिटलिव्ह मिळायची. कोल्हापूर रिजनल आॅफिसकडून पौर्णिमेच्या दरम्यानची आठ दिवसांची ती रजा मी नुकतीच मंजूरही करुन घेतली होती. त्यामुळे चारसहा दिवसांच्या घरपणाबरोबरच या पौर्णिमेचं नृ.वाडीचं दत्तदर्शनही विनाविघ्न होणार होतं हे खरं,पण त्यानंतरचं काय हा प्रश्न होताच. सगळंच अस्थिर, अशुध्द न् अवघडच वाटत राहिलं. महाबळेश्वरपासून नृ.वाडीपर्यंत जातायेता पंधरा तास जर लागणार असतील तर पौर्णिमेला जायचा अट्टाहास चालणार कसा? प्रत्येक पोर्णिमा काही रविवारीच नसणाराय.नसू दे. कांही झालं तरी यात खंड पडू द्यायचा नाही हे पक्कं ठरवूनच टाकलं. मग ते कसं जमवायचं याचे विचार सुरू झाले. त्यासाठी जे जे करावं लागेल ते ते कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या यांच्याबाबतीत कोणतीही तडजोड न करता करायचं हा निर्धार पक्का झाला. त्यासाठी वर्षातल्या बारा कॅज्युअल लिव्हज् दर पौर्णिमेसाठीच राखून ठेवायच्या हे ठरलं.पण इथला हा धुवांधार पाऊस आणि नंतर लगेचच येणाऱ्या हिवाळ्यातली कडक थंडी यांचं काय ? तब्येत बिघडली,आजारपण आलं,ते रेंगाळलं तर? हा विचार मनात येताक्षणीच झटकून टाकला.’आपण कांहीही झालं तरी आजारी पडून रजा फुकट घालवायची नाही’ हे मनाला बजावून सांगितलं. प्रश्न मलाच पडत होते आणि त्याची अशी ठाम उत्तरंही मीच मला देत होतो.पण तरीही ‘दत्तमहाराज आपल्या श्रद्धेची कसोटी पहातात’ असं आईबाबा नेहमी म्हणायचे ती ‘कसोटी’ म्हणजे नेमकं काय याचा प्रत्यय मलाही येणार होताच. त्याला खऱ्या अर्थाने निमित्त ठरलं ते माझं हे महाबळेश्वरचं पोस्टींगच. कारण महाबळेश्वरचा अखंड धुवांधार पाऊस हा माझ्या नित्यनेमात मुख्य अडसर ठरणाराय असंच वाटतं रहायचं.कारण छत्री, रेनकोट, गमबूट हे सगळं असूनही हाकेच्या अंतरावरचं स्टॅन्ड गाठेपर्यंतही मी चिंब भिजृन जायचो. संपूर्ण प्रवासात ते ओले कपडे अंगावरच थोडे सुकत आले तरी नृ.वाडीला पोचल्यानंतरही त्यातला दमटपणा रेंगाळतच असायचाच.
या सगळ्या कसोट्या पार करीत पावसाळा कूर्मगतीने संपत चालला.आता सगळं सुरळीत सुरु राहील असं वाटत असतानाच प्रत्येक पौर्णिमेच्यावेळी नवीनच कसोटीचे क्षण अचानक माझ्यासमोर ‘आ’ वासून उभे राहायचे…!!
क्रमश:.. (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈