श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग २२ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- ही अचानक मिळालेली एवढी रक्कम फॅमिली शिफ्ट होईपर्यंतचे वर्षभर माझी जमाखर्चातली तूट भरून काढायला पुरेशी ठरणार होती. नेमक्या गरजेच्या क्षणी जादूची कांडी फिरावी तसा घडलेला हा योगायोग श्रद्धेबरोबरच ‘त्या’च्याबद्दलची कृतज्ञता दृढ करणारा जसा होता तसाच यापुढे दर पौर्णिमेला
दत्तदर्शनाच्या बाबतीत कधीच कसलीच अडचण येणार नाही असा विश्वास निर्माण करणाराही! पण पुढच्याच पौर्णिमेच्यावेळी एक वेगळंच आक्रित माझी खऱ्या अर्थाने कसोटी पहायला समोर उभं ठाकणाराय याची मला या क्षणी कल्पना कुठून असायला?)
पुढची पौर्णिमा मंगळवारी होती. यावेळी ब्रॅंचमधील कांही महत्त्वाच्या कमिटमेंट्समुळे रजा न घेता मला नृ. वाडीला देवदर्शन घेऊन परस्पर महाबळेश्वरला परत यावं लागणार होतं. कोल्हापूरला घरी आधीच तशी कल्पना देऊन ठेवली तेव्हा ‘ रात्री उशीर झाला तर सांगलीला मुक्काम करून सकाळच्या पहिल्या बसने महाबळेश्वरला जा’ असं मिसेसने मला आवर्जून सुचवलं. सांगलीला म्हणजे तिच्या माहेरघरी. ‘तुम्ही पौर्णिमेला नृ. वाडीहून उशीरा तिथे घरी पोचाल असं मी आईबाबांना कळवून ठेवतेय’ असंही ती म्हणाली होती. पुरेशा विश्रांतीसाठी मलाही तेच सोयीचं होणार होतं.
एरवी निघायच्या दिवशी नेहमी या ना त्या कारणाने शेवटच्या क्षणापर्यंत माझी खूप धावपळ होत असे. प्रत्येकवेळी घाईघाईत बस पकडायची म्हणजे एक दिव्यच असायचं. पण यावेळी कसं कुणास ठाऊक पण बाहेरचा धुवांधार पाऊस सोडला तर बाकी सगळं रुटीन अनपेक्षितरित्या खूपच सुरळीत सुरु होतं. त्या दिवशी ब्रॅंचमधेही कामाची फारशी दडपणं नव्हती. दिवसभरातली माझी सगळी कामं व्यवस्थित आवरून, कॅश क्लोज करुन दुपारच्या सव्वातीनच्या सांगली बससाठी मी स्टॅण्डवर पोचलो तेव्हा बस नुकतीच लागत होती. घाईगडबड न करताही बसायला चांगली जागा मिळाली. इथवर सगळं सुरळीत झालं तरी घाटरस्त्यातून मात्र प्रचंड पावसामुळे बस मुंगीच्या गतीनेच पुढे जात होती. त्यामुळे नेहमीच्या वेळेपेक्षा बस सातारा स्टॅंडला थोडी उशीराच पोचली. सांगलीला बस बदलून नृ. वाडीला पोहोचेपर्यंत रात्रीचे नऊ वाजून गेले होते. बसमधून उतरलो तेव्हा नृ. वाडी स्टॅण्डवर शुकशुकाट होता. पौर्णिमेच्या रात्री एरवी स्टॅण्डवर बऱ्यापैकी गर्दी असे. त्यामुळे आजची ही सामसूम अनाकलनीयच वाटत राहिली. मंदिरात पोहोचेपर्यंत पालखी संपून शेजारतीची तयारीही सुरु झालेली होती. तरीही देवासमोर फारशी गर्दीच नव्हती. खूप वर्षांनंतर इतकं छान, व्यवस्थित दर्शन झाल्याचं समाधान मिळालं खरं पण पौर्णिमा असूनही देवासमोर भाविकांची कांहीच गर्दी नसण्यामागचं कारण मात्र उमगलं नव्हतं. सांगलीला सासुरवाडीच्या घरी पोचलो तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले होते. तोवर सकाळपासून क्षणभरही विश्रांती नसल्याने आणि सलगच्या दीर्घ प्रवासामुळे कांहीसा थकवाही जाणवत होताच. आतले लाईट बंद असल्याचे जाणवले. कदाचित मी येणार असल्याचा निरोप त्यांना मिळालेल्या नसायची शक्यता पुसटशी जाणवताच मला संकोचल्यसारखं वाटत राहिलं. त्याच अनिश्चिततेत दारावरची बेल वाजवली. पण अपेक्षित असणारा तात्काळ प्रतिसाद मिळालाच नाही. क्षणभर वाट पाहून मी पुन्हा बेल वाजवली. एकदा. दोनदा. आत कुजबूज झाल्याचं न् मग लाईट लागल्याचं अंधुक जाणवलं. दार उघडण्याआधी सासऱ्यांचा ‘कोण आहे?’ हा प्रश्न आणि पाठोपाठ त्यांनी दाराऐवजी जवळची खिडकी उघडल्याचा आवाज या दोन्ही गोष्टी मला बुचकळ्यात टाकून गेल्या. खिडकीतून मला पहाताच सासऱ्यांनी घाईघाईनी दार उघडलं. ते कांहीसे ओशाळवाणे झाले. तरीही “या.. या.. ” म्हणत त्यांनी हसतमुखाने स्वागत केले
“फार उशीर झाला ना मला?” मी विचारलं.
“छे छे… उशीर कसला?पण रात्री दहापर्यंत सगळं आवरतं ना, मग उगीच जागरण करत करायला बसायचं, म्हणून रोज लवकर झोपतो एवढंच. पौर्णिमा उद्या आहे, म्हणून तुम्ही उद्या रात्री येणार असंच आम्ही गृहीत धरलं होतं. पण हरकत नाही. या”
त्यांचं बोलणं ऐकून मी विचारात पडलो. हे असं कां म्हणाले कळेनाच. पौर्णिमा आजच तर आहे. उद्या कशी?’ मला प्रश्न पडला. तोवर सासुबाईही बाहेर आल्या. “हातपाय धुऊन धुवून कपडे बदला न् या लगेच. तोवर मी पान वाढते” त्या अगत्याने म्हणाल्या.
मी जेवायला बसलो पण मन मात्र कांहीतरी चुकल्यासारखं अस्वस्थच होतं. शिळोप्याच्या गप्पात जेवण आवरलं. हात धुवून समोरचा नॅपकीन घेत असतानाच भिंतीवर लटकणाऱ्या ‘कालनिर्णय’नं माझं लक्ष वेधून घेतलं. जवळ जाऊन मी कॅलेंडरचं पान लक्षपूर्वक पाहिलं. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मला गाढ झोपेतून कुणीतरी हलवून जागं करावं तसा मी भानावर आलो. नृ. वाडी स्टॅंडवर आणि देवळात देवासमोरही भाविकांची गर्दी नसण्यामागचं कारण आज पौर्णिमा नसणं हेच होतं हे ‘कालनिर्णय’ मला स्पष्टपणे सांगत होतंच. पण… असं होईलच कसं? आमच्याकडे घरी कालनिर्णयच तर होतं. आपण नेहमीसारखं व्यवस्थित कॅलेंडर बघूनच सगळं प्लॅनिंग केलं होतं मग असं कसं शक्य आहे हे क्षणभर मला समजेचना. मी सहज म्हणून पुढचं पान पाहिलं न् मनातली साशंकता नाहिशी झाली.
का, कसं माहित नाही पण तिकडं घरी कॅलेंडर बघताना माझीच चूक झाली होती!यावेळची पौर्णिमा आज नव्हतीच. उद्याच होती!! सकाळपासूनची माझी धावपळ आठवून मला स्वतःचाच राग आला आणि कींवही वाटत राहिली. वरवर शांत रहात मी स्वत:ला सावरलं.
“खरंच. कॅलेंडर बघताना माझीच गफलत झालीय. तुमची मात्र विनाकारण झोपमोड”
“अहो असू दे. झोपमोड कसली?आज काय न् उद्या काय तुम्ही आलात याचाच आनंद आहे” सासरे मनापासून म्हणाले.
“तर काय?वाईटातून चांगलं शोधायचं बघा” सासुबाई म्हणाल्या. “या महिन्यात तुम्हाला दोनदा दत्तदर्शनाचा योग आलाय. चांगलंच आहे की. “
“म्हणजे.. ?” मी न समजून विचारलं.
” आता आलात तसं उद्याचा दिवस रहा सकाळी आंघोळ, नाश्ता सगळं आवरुन मग वाडीला पौर्णिमेचं दर्शन घेऊन या. जेवण करुन दिवसभर आराम करा. मग दुसऱ्या दिवशी पहाटे जा हवंतर. एरवी तुमचं येणं रहाणं होतंय कुठं?” त्या आग्रहाने म्हणाल्या.
मी कसनुसा हसलो. रहाणं तर मला शक्य नव्हतंच. कारण कॅशची दुसरी किल्ली माझ्याजवळ होती. आणि तसंही इतर महत्त्वाच्या कमिटमेंटस् होत्याच. त्यात तडजोड करणं मला शक्यही नव्हतंच आणि योग्यही. कोणत्याही परिस्थितीत कॅशअवर्स सुरू होण्यापूर्वी ब्रॅंचला पोचण्यासाठी मला उद्या पहाटेच्या बसने महाबळेश्वरसाठी निघणं आवश्यकच होतं. हे सगळं त्या दोघांना मी मोकळेपणानं समजून सांगितलं आणि तेवढ्यापुरता विषय तिथंच थांबवला.
या महिन्यात आपला पौर्णिमेचा नेम आपल्याच चुकीमुळे अंतरणार असल्याची खंत मनात घेऊन मी अंथरुणाला पाठ टेकवली. दिवसभराची धावपळ, दगदग, थकवा सगळं क्षणात विरुन जात मनातली ती खंतच मला त्रास देत राहिली. शांत झोप लागलीच नाही. पहाटे उठून सगळं आवरलं. निघताना दोघांना वाकून नमस्कार केला. बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात सासऱ्यांनी थांबवलं.
“जपून जा. तुम्ही कर्तव्याला प्राधान्य देताय हेच योग्य आहे. देवधर्म, सेवा, श्रद्धा हेही महत्त्वाचं आहेच. पण त्यासाठी विनाकारण ओढ करुन घेऊ नका. तब्येत सांभाळून रहा. “
ते बोलले त्यात वावगं काहीच नव्हतं. त्या बोलण्या-सांगण्यात वयाच्या अधिकाराचा तर लवलेशही नव्हता. माझ्यावरील प्रेमापोटीच ते मायेने, आपुलकीनेच हे सगळं सांगत होते. मी मनापासून ‘हो’ म्हणालो.
“आणखी एक. मनात आलंय ते बोललो नाही तर मलाच चैन पडणार नाही म्हणून सांगतो. तुम्ही काल एवढा त्रास सहन करून दत्तदर्शनासाठी वाडीला गेलात तेव्हाच तुमच्या मनातल्या भावना महाराजांना पोचल्यात आणि त्याच महत्त्वाच्या. त्यामुळे आता परत जाऊन, दिवसभर काम करुन, तुम्ही पुन्हा पौर्णिमेच्या दर्शनासाठी आज दुपारच्या बसने नृ. वाडीला यायची धडपड कराल म्हणून मुद्दाम हे सांगतोय. उगीच दगदग नका करु. “
मी आज्ञाधारकपणे मान हलवली. निरोप घेऊन पाठ वळवली. पण मन स्वस्थ नव्हतं. नकळत घडलेल्या का होईना पण आपल्याच चुकीमुळे आपला संकल्प सिद्धीस जाण्यात अडथळा निर्माण झाल्याची खंत मनात घर करून राहिली होती. अशा मन:स्थितीत सासऱ्यांच्या मार्फत दत्त महाराजांनीच मला दिलेला माझ्या संकल्पपूर्तीस पूरक ठरणारा संकेत मात्र मला त्याक्षणी जाणवलाच नव्हता.. !हातातून कांहीतरी अलगद निसटून जात असल्याच्या भावनेने मन उदास झालं होतं. तीच उदासी सोबत घेऊन माझा परतीचा प्रवास सुरु झाला !!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈