सौ ज्योती विलास जोशी
☆विविधा ☆ तमसो मा ज्योतिर्गमय… ☆ सौ ज्योती विलास जोशी☆
तमसो मा ज्योतिर्गमय
ज्योत दिव्याची मंद तेवते
देवघरातील देवापाशी.
सात्विक ज्योतीचं हे आल्हाददायक असं रूप! दीप हे त्यातल्या ज्योतीसह अग्निचं एक मोहक असं रूप आहे. तितकच ते सुबकही आहे. तृप्ती देणारं आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गेला तेजोमय करण्याचं पावित्र्य या ज्योतीत आहे. इंद्रधनुषी रंगाने काढलेल्या रांगोळ्या अधिक प्रकाशमय होतात ते त्यावर ठेवलेल्या पणत्या आणि त्यातील ज्योतीने !हा त्या पणती सह ज्योतीचा सन्मान आहे.
सर्वांना एकाच धाग्यात बांधून ठेवणारा दीपोत्सव अशा असंख्य ज्योतीने प्रकाशमय होतो.हा दीपोत्सव हातात जणू उद्दिष्टांचे दिवे घेऊन येतो आणि सर्वांना स्वप्नपूर्तीचा ध्यास देतो.
लक्ष्मीपूजनादिवशी असंख्य दीपज्योतीनी लक्ष्मीदेवीची अर्चना होते .असं म्हणतात की जिथे ज्योती तिथे लक्ष्मी!
आज झाले मी बिजली ,
घरे मंदिरे लखलखली!
असंच जणू ही दिव्याची ज्योत सांगते.
कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी, मंगल प्रसंगी दीपप्रज्वलन हे गृहीतच आहे. कौटुंबिक आनंदाच्या प्रसंगी औक्षण ओघानं आलंच. ज्योतीचं अस्तित्व सर्व प्रसंग उजळून टाकतात.
मंत्र, अभंग, ओव्या, भारुडं ,निरूपणं यांचे दीपही या ज्योतीने उजळले आहेत आणि भक्तीचे तेज पसरवलं आहे. ही ज्योती ज्वाला होऊ शकते.फुंकरीने विझवू पाहणाऱ्यांसाठी ती आव्हान देखील आहे.
शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या सावित्रीबाई यांना ‘क्रांतीज्योती’हा बहुमान दिला आहे. या क्रांतीज्योतीने ज्ञानाची ज्योत तेवत ठेवली.
शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मशालीची ज्योत पेटवून वीरश्री मिळवली.
आज घरोघरी हंड्या, झुंबरे एलईडी बल्बने सुशोभित झाली आहेत.हा काळाचा महिमा आहे, टेक्नॉलॉजी चा चमत्कार आहे.कालाय तस्मै नमः!
ज्योतीचे हे दिव्य स्वरूप आज स्वतःची परंपरा टिकवून आहे. दिवाळीच्या या निमित्ताने आपणही हा अनमोल दुवा राखायचा प्रयत्न करूया. हा परंपरेचा एक नाजूक धागा संभाळून ठेवूया.दिवटी पासून ते पंचारती ,निरंजन , समई , कंदील ,पलीते ,पणती या सर्वातून ती आपल्या भेटीला आली. तेजःपुंज ज्योत बनून राहिली.
औक्षण करताना तेजाळणारा भावाचा चेहरा, जसा काही ‘ज्योतीने तेजाची आरती’ म्हणावा असाच! सुवासिनींचे औक्षण करताना सौभाग्य कुमकुमाचा रक्तवर्ण जसा लक्ष्मीच्या पाऊलखुणा!! लक्ष्मीची अनेक रूपे जशी धान्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी गृहलक्ष्मी राजलक्ष्मी वीरलक्ष्मी …..या सर्वांचं औक्षण या ज्योतीने होते. या सर्व लक्ष्मीची प्रसन्नता ही मानवाला सुख-समृद्धी देणारी आहे.धन्वंतरीची ज्योतीने आरती उत्तमआरोग्यधनसंपदा देते.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याजागी दिवा ठेवतात.आत्म्याचे प्रतीक, आत्मज्योत म्हणून पणती मधे ती ज्योत दहा दिवस तेवत ठेवतात, कारण दहा दिवस आत्मा घराबाहेरच्या अश्म्यावर असतो आणि दहा दिवसा नंतरच त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. आत्म्याला पुढील वाट दाखवावी असंही या ज्योतीचे उद्दिष्ट असतं असं म्हणतात.
ज्योत से ज्योत जगाते चलो
प्रेम की गंगा बहाते चलो
इवलुश्या मिणमिणत्या ज्योतीच्या केवढ्या विधायक संदेश देणाऱ्या या ओळी!! ज्योतीचा महिमा सुंदर आनंदी आणि तृप्ती देणारा आहे. त्याचा अर्थ आत्मसात करूया .तेव्हाच या आत्ताच्या बेचैन आणि अस्वस्थ परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल…..
गतिमान काळात अंधारक्षण येणारच! म्हणूनच तर ही तेजस्विनी सांभाळायची…..समाज बांधणीची समाज उभारणीची एकात्मतेची ज्योत तेवत ठेवायची. कारण ही ज्योत मानवाचे भविष्य तेजाळणारी आहे.
ही ज्योती नक्कीच एक तेजस्वी साफल्य आपल्या हाती पडण्यास मदत करेल असा विश्वास बाळगूया.
ज्योतीचा महिमा इतका सुरेख आणि आनंदी की तिच्या पुढे नतमस्तक होऊन म्हणावेसे वाटते,
दीपज्योती नमोस्तुते!
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
मो 9822553857
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈