श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- ” इथे तुझी भरभराट होणाराय. बघशील तू. माझे आशीर्वाद आहेत तुला”

 सरांनी‌ मनापासून दिलेल्या आशिर्वादांचे हे शब्द सरांच्या मनातल्या तत्क्षणीच्या भावना व्यक्त करीत होते हे खरेच. पण त्याच शब्दांत नजीकच्या भविष्यकाळात घडून येणाऱ्या अनेक उत्साहवर्धक घटनांचे भविष्यसूचनही लपलेले होते याचा प्रत्ययही मला लवकरच येणार होता याची मात्र मला त्याक्षणी पुसटशीही कल्पना नव्हती! )

माधवनगरला अतिशय प्रशस्त अशा ब्रॅंच-मॅनेजर क्वार्टर्स होत्या. त्याही ब्रॅंचला जोडून. मधे फक्त एक काॅमन दरवाजा. त्यामुळे येण्याजाण्याचा वेळ तर वाचायचाच शिवाय एरवीच्या मोकळ्या वेळेत किंवा सुट्टीच्या दिवशीही महत्त्वाचा पत्रव्यवहार विचारपूर्वक हातावेगळा करायला मला भरपूर निवांतपणाही मिळायचा. असे सौख्य मला ना पूर्वी कधी अनुभवायला मिळालं होतं आणि ना नंतरही. त्यामुळे माधवनगर ब्रॅंचमधलं प्रचंड वर्कलोडही मला सुसह्य झालं होतं. माझ्यासाठी आणखी एक अतिशय समाधानाची बाब म्हणजे नाईकसरांचं घर आमच्या बॅंकेच्या अगदी जवळ म्हणजे समोरचा रस्ता ओलांडला की त्याला लागूनच होतं. त्यामुळे आमची रोजच भेट व्हायची. त्यांच्या नित्य भेटी, विविध विषयांवरील गप्पा हा माझ्यासाठी विरंगुळाच नव्हे तर एक प्रकारचा सत्संगच असायचा. सरांची ‘आध्यात्मिक आणि साहित्यक्षेत्रातली अधिकारी व्यक्ती’ ही ओळख माझ्यासाठी नवीन होती. त्यांचं बोलणं अतिशय शांत, लाघवी आणि ओघवतं असे. त्यांच्याशी अल्पकाळाचं मोजकं बोलणंही एक वेगळीच ऊर्जा देऊन जात असे. माझ्या मनातल्या कितीतरी शंकांचं निरसन अनेकदा त्यांना नेमकं कांही न विचारताही त्यांच्याकडून नकळत आपोआपच केलं जातं असे. तो अतिशय विलक्षण अनुभव असायचा!

माझ्या सासुरवाडीच्या सर्वांशीही नाईक-कुटुंबियांचा परिचय आणि जवळीक होतीच. त्यामुळे मी महाबळ कुटुंबाचा जावई असणं ही सरांसाठी विशेष कौतुकाची बाब असे. त्यामुळे पहिल्या भेटीनंतरच्या लगेचच्या निवांत भेटीतच सरांनी आरती/सलिलची आवर्जून चौकशी केली होती. तिची नोकरी, राजीनामा, जूनमधलं फॅमिली शिफ्टिंग हे सगळं त्यांना सांगितलं तेव्हा ते विचारात पडले.

“हे बघ, इथलं नवीन शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होईल. अनेक शाळांमधल्या नवीन भरतीबद्दलच्या जाहिराती यायला सुरुवात होईल. आपल्या सांगली शिक्षण संस्थेच्या शाळांमधेही नवीन जागा भरायच्यात. अशा जाहिरातींकडे लक्ष ठेवून आरतीला तिथूनच तुझा इथला पत्ता देऊन ताबडतोब अर्ज करायला सांग. कारण ती इथे आल्यानंतर अर्ज करायचा म्हणशील तर मुदत संपून गेलेली असेल. अनुदानित शाळेतली नोकरी सोडल्यानंतर सहा महिन्याच्या आत जर दुसऱ्या अनुदानित शाळेत पुन्हा नोकरी मिळाली तरच पहिल्या नोकरीतली सिनिऑरिटी आणि इतर फायदे सुरक्षित राहू शकतात. त्यामुळे ही संधी सोडू नको म्हणावं. “

पुढे एकदोन दिवसांत ते म्हणाले तशी सांगली शिक्षण संस्थेची आणि सांगलीच्याच वुईमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या रा. स. कन्याशाळेची अशा दोन जाहिराती माझ्या वाचनात आल्या तेव्हा त्याची कटिंग्ज महाबळेश्वरला आरतीकडे पाठवून मी तिला सरांचा निरोपही कळवला. दोन्हीकडे आरतीने लगेच अर्जही केले. जूनच्या पहिल्या आठवड्यात ती इकडे येण्यापूर्वीच दोन दिवस आधी तिची दोन्हीकडची इंटरव्ह्यूची काॅललेटर्स माझ्या पत्यावर येऊन पडली होती!’देता घेशील किती दो कराने’ ही उक्ती कृतीत दृश्यरुप होणं म्हणजे नेमकं काय याचा सुखद अनुभव मला आला तो दोन्हीकडे आरतीची सिलेक्शन झाल्याची बातमी आली तेव्हा!

महाबळेश्वरहून परतल्यावर लगेचच वेध लागले ते दोन्हीपैकी एक प्रस्ताव विचारपूर्वक निवडून नवीन रुटीनला सामोरं जायच्या तयारीचे. सांगली शिक्षण संस्थेत पहिलं पोस्टींग सांगलीतल्या शाळेतच होणार होतं. तरीही पुढे कधीही जिल्हाभर विखुरलेल्या संस्थेच्या कोणत्याही शाळेत होऊ शकणाऱ्या बदल्या गृहित धरुन सांगलीतल्या कायमच्या वास्तव्याची खात्री असणारी रा. स. कन्याशाळेची आॅफर आम्ही पूर्ण विचारांती स्विकारायचं ठरवलं आणि आम्हा तिघांचीही नव्या रुटीनला सामोरं जायची तयारी सुरु झाली.

सलिलची ‘बापट बाल शिक्षण मंदिर’या शाळेतली दुसरीतली अॅडमिशन, आरतीची एक जूलैपासून सुरु होणारी नवीन नोकरी, दोघांचंही सांगलीला जाण्यायेण्यातलं धावपळीचं रुटीन आणि अशा जाण्यायेण्याच्या त्रासापासून पूर्णत: मुक्त असणारं माझं निवांत, स्वस्थ वेळापत्रक हे सगळं मला पुढे कितीतरी दिवस स्वप्नवतच वाटत राहिलं होतं! पण या स्वप्नातून अचानक दचकून जाग यावी तसा मी भानावर आलो ते केवळ हे असं कौटुंबिक स्थैर्य मिळणं सोयीचं व्हायला निमित्त व्हावं एवढ्यापुरत्या अगदी अल्पकाळासाठीच माझी इथे माधवनगरला बदली झाली असावी असं वाटायला लावणारी एक बातमी अचानक ब्रॅंचमधे येऊन धडकली तेव्हा! इथं येऊन मला चारसहा महिनेही झाले नव्हते आणि पुढच्या प्रमोशन प्रोसेसच्या हालचाली सुरु झाल्याची ती बातमी होती! 

सगळं प्रोसेस पूर्ण व्हायला चार एक महिनेच लागणार होते. प्रमोशनची संधी हा आनंदाचा भाग असला तरी माझ्यापुरता विचार करायचा तर प्रमोशन नंतरची ‘आऊट ऑफ स्टेट पोस्टींग’ ची टांगती तलवार माझ्या संकल्पसिध्दीत फार मोठा अडसर निर्माण करणारी ठरणार होती आणि हेच माझ्या मनात डोकावू लागलेल्या अस्वस्थतेचं मुख्य कारण होतं. घरचं हसरं वातावरण पाहिलं कीं हे सगळं घरी सांगायचं मी टाळतंच होतो. जे व्हायचं तेच होणार असेल तर आत्तापासूनच सगळ्यांना याचा त्रास कशाला असा विचार करुन मी स्वतःचीच समजूत काढत रहायचो.

ब्रॅंचमधल्या दिवसभराच्या कामांमधली व्यस्तता सोडली तर एरवी मनात नजीकच्या काळात निर्माण होऊ शकणाऱ्या अस्थिरतेचा विचार ठाण मांडून असायचाच. एक दिवस न रहावून मी नाईकसरांना माझ्या मनातली ही बोच बोलून दाखवली. त्यांनी नेहमीच्या शांतपणे हसतमुखाने सगळं ऐकून घेतलं. म्हणाले, “यालाच तर आयुष्य म्हणायचं. ते येईल तसं आनंदाने स्विकारायचं. जिथे जाशील तिथे दत्तमहाराज आहेतच ना पाठीशी?मग काळजी कसली? ते असणारच आहेत. आणि म्हणूनच तुझ्या उत्कर्षाची वाट वळणावळणांची असणाराय. खाचखळग्यांची नाही हे लक्षात ठेव”

त्यांचे हे नेमकी दिशा दाखवत मला निश्चिंत करणारे आश्वासक शब्द त्याक्षणी माझ्यासाठी अतिशय दिलासा देणारे होते! 

माझी यापुढची उत्कर्षाची वाट वळणावळणाची असणाराय असं सर म्हणाले ते अनेक अर्थांनी खरं ठरणार होतं आणि त्या वाटेवरचं पहिलं वळण हाकेच्याच अंतरावर माझी वाट पहात तिष्ठत थांबलेलं. पण आता मी निश्चिंत होतो. मनात उत्सुकता होतीच पण ना कसलं दडपण ना अस्वस्थता. कारण सर म्हणाले तसं ‘तो’ होताच माझ्या सोबत आणि समोरच्या त्या वळणवाटेवरही तो असणारच होता सोबतीला.. !

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments