श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग २९ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- खूप दिवस वाट पाहून त्या दोघांनी घरच्या विरोधाला न जुमानता नुकतंच परस्पर रजिस्टर लग्न करून टाकलं होतं. दोन्ही घरच्यांनी या लग्नाला ठाम विरोध होताच. प्रतिष्ठेचा प्रश्न बनवून या दोघांनाही त्यांनी बेदखल केलं. त्यामुळे सुजाता नेहमीच दडपणाखाली असायची. तिने नवऱ्याच्या शिक्षणाची आणि घरखर्चाची सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊन वेगळं बि-हाड केलं आणि तिची तारेवरची कसरत सुरू झाली. मी जॉईन झालो त्याच दिवशी तिचा मॅटर्निटी लिव्हचा अर्ज माझ्या टेबलवर होता!)
हीच सुजाता बोबडे मला लवकरच येणाऱ्या त्या अतर्क्य आणि गूढ अशा अनुभवाला निमित्त ठरणार होती याची त्या क्षणी मला कल्पना कुठून असायला?)
ब्रँचचा चार्ज घेऊन झाल्यानंतर लगेचच मी महत्वपूर्ण ग्राहकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. घरापासून ब्रॅंचपर्यंतच्या रस्त्याला लागून थोड्याच अंतरावर असलेल्या ‘लिटिल् फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल’ चा मी मनोमन तयार केलेल्या आमच्या महत्त्वपूर्ण ग्राहकांच्या यादीत खूप वरचा नंबर होता. मिशनऱ्यांनी चालवलेल्या या संस्थेच्या बचतखात्यांत बरीच मोठी रक्कम शिल्लक असायची. शिवाय आठवड्यातून दोन-तीनदा तरी थोड्याफार रकमेचा भरणा नियमित होत असेच.
विशेषतः सोलापूर कॅम्पसारख्या लहान ब्रॅंचसाठी खास करुन अशा ग्राहकांना सांभाळणं गरजेचं असायचं. त्या दिवशी सकाळी थोडं लवकर निघून मी मिस् डिसोझांना भेटण्यासाठी प्रथमच त्या संस्थेत गेलो. मिस् डिसोझा ‘लिटिल् फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल’ च्या प्रिन्सिपल कम व्यवस्थापक होत्या. अतिशय शांत, हसतमुख चेहरा. प्रसन्न आणि आदबशीर वागणं. कॉन्व्हेंटमधील स्टाफ नन्सची कार्यतत्पर लगबग आणि लक्षात यावी, रहावी अशी काटेकोर शिस्त मी प्रथमच अनुभवत होतो. प्रकर्षाने जाणवणारी प्रसन्न शांतता आणि मेणबत्तीच्या प्रकाशात अधिकच तेजोमय भासणारी येशूची मूर्ती माझ्या मनावर गारुड करतेय असं मला वाटू लागलं!
मी स्वतःची ओळख करून दिली. मिस् डिसोझांनी माझं हसतमुखानं स्वागत केलं. गप्पांच्या ओघात मी चांगलं सहकार्य आणि सेवेबद्दल त्यांना आश्वस्त करून त्यांच्याकडूनही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली तेव्हा मात्र त्या थोड्या गंभीर झाल्यासारख्या वाटल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा प्रसन्नपणा लोपला. नजरेतलं हसरेपणही अलगद विरून गेलं. पण क्षणभरच. लगेचच त्यांनी स्वतःला सावरलं.
“सी मिस्टर लिमये.. ” त्या बोलू लागल्या.
आमच्या ब्रॅंचमधील सेवेबद्दल त्या फारशा समाधानी नव्हत्या. आक्रस्तळेपणा किंवा आदळआपट न करता त्यांच्या मनातली ती नाराजी त्यांनी अतिशय सौम्य पण स्पष्ट शब्दात आणि तेवढ्याच डिसेंटली माझ्यासमोर व्यक्त केली.
हाकेच्या अंतरावरच्या आमच्या ब्रॅंचमधे आठवड्यातून दोन दिवस हातातली कामं बाजूला ठेवून त्यांची स्टाफ नन् पैसे भरायला बँकेत यायची. साधारण वीस-पंचवीस हजारांची रक्कम बँकेत भरून परत जायला तिला किमान दोन तास तरी लागायचे. घाईगडबडीच्या कामांमुळे, एवढा अनावश्यक दीर्घकाळ एका स्टाफला स्पेअर करणं त्यांना शक्य नव्हतं. त्यांची तत्पर सेवेची सरळसाधी अपेक्षा होती आणि त्यात मी लक्ष घालावं अशी त्यांनी विनंती केली. ‘बँकेतला एखादा कॅशियर इथे पाठवून आठवड्यातले दोन दिवस इथून कॅश कलेक्ट करणं शक्य होईल का?’ असंही त्यांनी मला मोकळेपणानं विचारलं. यातून मार्ग काढायचं आश्वासन देऊन मी त्यांचा निरोप घेतला.
त्यांच्या विनंतीचा विचार करायचा तर दोन कॅश-काऊंटर्सपैकी एक काऊंटर थोडा वेळ बंद ठेवून तो कॅशिअर स्पेअर करणं मला प्रॅक्टिकल वाटत नव्हतं. दोघांपैकी हेडकॅशियरना या छोट्याशा कामासाठी पाठवणं योग्यही नव्हतं. रहाता राहिली सुजाता बोबडे. पण तिच्या सध्याच्या अवस्थेत तिला हे काम सांगणं रास्त नव्हतं.
‘खरंतर ब्रॅंचमधे नेहमी येणारी पेट्रोलपंपाची कॅश वगळता रिसिव्हि़ंग कॅशकाऊंटरला फारशी गर्दी नसायचीच. तरीही स्टाफ ननला बँकेत पैसे भरून बाहेर पडायला इतका उशीर का व्हावा?’ मला प्रश्न पडला.
मी सुजाताला केबिनमधे बोलावलं. ‘लिटिल् फ्लाॅवर’चा विषय काढताच ती चपापली.
“.. त्यांची कॅश.. मी नाही सर, सुहास गर्देच घेतात. “
“कां? रिसीव्हिंग काउंटरला आहात ना तुम्ही?मग तुम्ही कां घेत नाही?” माझा आवाज मलाच चढल्यासारखा वाटला.
मान खाली घालून ती गप्प उभी होती.
“कांही प्रॉब्लेम?”
तिचे डोळे भरून आले.
“ठीक आहे. तुम्ही जा. सुहासना पाठवा. मी त्यांच्याशीच बोलेन. “
ती केबिनबाहेर गेली. त्या क्षणी मला तिचा भयंकर रागही आला आणि तिची
कीवही वाटली.
पण जेव्हा सुहास गर्दे केबिनमधे आले आणि त्यांनी सर्व पार्श्वभूमी मला समजावून सांगितली तेव्हा मात्र ते ऐकून मला आश्चर्य तर वाटलंच आणि हसूही आलं. प्रश्न मी समजत होतो तेवढा गंभीर नव्हताच. गंमत म्हणजे एरवी स्ट्रिक्ट डिसिप्लिन असणाऱ्या मिशनरी सिस्टीममधल्या ‘लिटिल् फ्लॉवर’ मधील स्टाफ ननज् आणि मिस् डिसोझानाही बँकेमधे रोख रक्कम भरण्याच्या साध्या साध्या प्राथमिक नियमांचीही काहीच जाण नव्हती. रोख भरणा करायच्या रकमेतल्या नोटा कशाही उलट सुलट लावलेल्या असायच्या. शिवाय पैसे भरण्याच्या स्लिपमधे नोटांचं विवरणही, किती रुपयांच्या किती नोटा वगैरे.. , भरलेलंच नसायचं. त्यामुळे या सगळ्या दुरुस्त्या आणि त्रुटी प्रत्येकवेळी स्वतः दूर करून त्या स्टाफ ननसमोर पैसे मोजून घेण्यात खूप वेळ जायचा. तिला थांबावं तर लागायचंच शिवाय या एकाच कामात गुंतून पडल्यामुळे सुजाताच्या काऊंटरसमोर ग्राहकांची गर्दी वाढत गेली की सुजाता भांबावून जायची. आत्मविश्वास गमावून बसायची. त्यामुळे सहजसोपा आणि सोयीचा मार्ग म्हणून सुहास गर्देनी ‘लिटिल् फ्लॉवर’ची कॅश स्वीकारायचं काम स्वतःकडेच घेतलं होतं. यामुळे सुजातापुरता प्रश्न सुटला तरी ‘लिटिल् फ्लावर’ चा प्रश्न मात्र अधांतरीच राहिला होता. आता मात्र स्वतः पुढाकार घेऊन तो मलाच सोडवायला हवा होता.
खरंतर त्यांचं काय चुकतंय हे त्यांना भेटून कुणी आवर्जून समजून सांगितलेलंच नव्हतं. बँकेकडून चांगल्या आणि तत्पर सेवेची अपेक्षा करणाऱ्या त्यांना ते सांगणं मला त्याक्षणी आवश्यक वाटलं.
पूर्वनियोजित वेळ ठरवून मी पुन्हा मिस् डिसोझांची भेट घेतली. त्यांना संबंधित सगळे नियम, पध्दती व्यवस्थित समजावून सांगितल्या. त्याचं महत्त्व विशद केलं. त्या दिवशीची भरणा करायची रोख रक्कम आणि त्यांचं स्लिपबुक मागून घेतलं. त्यांनी स्टाफ-ननलाही बोलावून समोर बसवून घेतलं. हे सगळं नीट समजून शिकून घ्यायला सांगितलं. नोटा कशा अॅरेंज करायच्या, त्यांचं विवरण स्लिपमधे कसं भरायचं हे सगळं मी त्यांना समजून सांगितलं. त्याबरहुकूम स्वतःच करूनही दाखवलं.
“मी आज बॅंकेत जाताजाताच आलोय. तुमची हरकत नसेल तर आज हे स्लिपबुक आणि पैसे मी स्वतः बरोबर घेऊन जातो. वेळ मिळेल तेव्हा स्टाफ ननला स्लीपबुक घेण्यासाठी नंतर पाठवून द्या”असं सांगून मी त्यांचा निरोप घेतला. ब्रँचमधे पोचताच कॅश न् स्लीपबुक सुजाताच्या ताब्यात दिलं. थोड्या वेळानं नन् आली. स्लीपबुक घेऊन दोन मिनिटात परतही गेली. एका गंभीर बनू पहाणाऱ्या साध्या प्रश्नाचं हे सोपं उत्तर सर्वांसाठीच सोयीचं होणाराय हे लक्षात आलं आणि आठवड्यातून ठरलेले दोन दिवस बँकेत येतानाच त्यांच्याकडे जाऊन, कॅश व्यवस्थित मोजून घेऊन मी ती बँकेत घेऊन येऊ लागलो. सर्व ग्राहकांच्या बाबतीत ही अशी सेवा देणं शक्यही नसतं आणि ग्राहकांची तशी अपेक्षाही नसते. पण कधीकधी अशा अपवादात्मक प्रसंगी प्रश्न लगोलग सुटावा व महत्त्वपूर्ण ग्राहकाचं समाधान व्हावं यासाठी असे निर्णय घ्यावेच लागतात. कायदा आणि व्यवहार यांची अशी सांगड परिस्थितीनुसार घालावीच लागते.
‘ब्रँच मॅनेजर’ हे पद दुरून पहाताना कितीही मानाचं आणि आकर्षक वाटत असलं तरी खरं तर ते जबाबदारीचंच जास्त असतं. ग्राहक, कर्मचारी आणि वरिष्ठ या परस्परविरोधी पातळ्यांमधला महत्त्वाचा दुवा म्हणून काम करताना सन्मानाची झूल अशी बऱ्याचदा स्वतःचा आब राखून उतरवून बाजूला ठेवावी लागते. मी तेच केलं होतं!
काही दिवस हे असंच सुरळीत सुरू राहिलं. पण अचानक एक दिवस कांही घटनांना अनपेक्षितपणे वेगळं वळण लागलं आणि एका अनपेक्षित क्षणी या सगळ्या चांगल्यात मिठाचा खडा पडला आणि पुढे मला मुळापासून हादरवून सोडणारी ती एक नाट्यपूर्ण कलाटणी ठरली जी क्षणकाळापुरतं कां असेना मला हतबल करून गेली होती!
पुढे मला येऊ पहाणाऱ्या एका अतर्क्य आणि गूढ अशा अनुभवाची हीच पार्श्वभूमी ठरणार होती आणि सुरुवात सुद्धा!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈