सौ. सुजाता काळे
त्यादिवशी संध्याकाळी नेहमी प्रमाणे 6.10 ची ट्रेन पकडली. एकाद तासात मी माझ्या डेस्टीनेशन पोहचणार होते. हा माझा नित्यक्रम. सकाळी 8.05 च्या ट्रेनने निघायचे व संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर 6.10 ची ट्रेन गाठायची. स्टेशनवरून घरी तासाभरात पोहोचायचे. जवळपासच्या स्टेशनवर उतरायचे म्हणून टी. सी. कधीच आमची अडवणूक करत नसे. जिथे जागा मिळेल तिथे बसायचे.
हे गेलं 25 वर्षे सुरू आहे.
गेल्या 25 वर्षात जाता येता कित्येक माणसे पाहिली. वेगवेगळ्या धर्माची, जातीची, आचार -विचाराची, पेहरावाची, संस्कृतीची व रंगाची…..
आजही मी गडबडीत एस-4 डब्यात शिरले. मधल्या एका बर्थवर बसले. माझ्या समोरच्या बर्थवर एक जोडपे बसले होते. तिच्या मांडीवर एक 5-6 महिन्याचे बाळ होते. बाळ झोपलेले होते. त्याच्या अंगावर पांघरून घेतले होते.
त्यांच्याकडे बघून जरा आश्चर्यच वाटले.
तो गोरापान. कपड्यांच्या निवडीवरून शिकलेला वाटत होता. भाषा थोडी फार गावाची. ती थोडी काळी, म्हणजे जरा जास्तच काळी. कपाळावर भली मोठी टिकली. पुढचे दात किचिंतसे बाहेर. मुलाकडे स्वतःकडे तिचे लक्ष नसेल. केसांचा भला मोठा आंबाडा. चेह-यावर केसांच्या बटा. बाळाला थोपटत थोपटत कोणतं तरी गाणं बडबडत होती. भाषा अगदीचं गावंढळ. .. ‘ दुदु गाईच्या गोट्यामंदी, दुदु बाळाच्या वाटीमंदी….’ पण तो तिच्या या गाणं गाण्याने भयंकर चिडला होता. तिच्यापासून लांब बसला होता. त्याच्या चेह-यावरचा भाव पाहून मला थोडे विचित्र वाटले. त्याने तिला गप्प बसायची खूण केली पण तिचं पालुपद चालूच राहीले. मग त्याने न राहवून तिला बडबड करायला सुरुवात केली….. तुला केव्हांच सांगतोय गप्प बस म्हणून. कशाला एवढ्या भसाड्या आवाजात गातीस? डब्यातले लोक बघतायेत. तुझ्या बरोबर कुठं पण जायची लाज वाटते. कुठं कसं वागायचं ते कळतंच नाही. तरीच हजारदा आण्णांना म्हणालो होतो की नका लावू हिच्याशी लग्न. पण त्यांनी नाही ऐकलं. मला मरण्याची धमकी दिली. मित्राला दिलेला शब्द, लेकापेक्षा जास्त मोठा होता. लेकाचा विचारच केला नाही. ना रंग ना रूप… ना शिक्षण ना, ना वागायचं भान. उचलली जीभ अन् लावली टाळ्याला.
शिक्षण म्हणे काय तर पाचवी पास..!! त्याची बडबड सुरु तर हिची गाणं सुरू. मी न राहवून त्याला सांगितले की ती बाळाला झोपतेय. आम्हाला काहीही त्रास होत नाही. त्याच्याशी बोलताना कळलं की तो पदवीधर आहे. चांगली नोकरी आहे. वडिलांनी जोर धरून त्याचे लग्न त्यांच्या मित्रांच्या मुलीबरोबर लावून दिले. तो म्हणाला, अहो मॅडम हिला चार चौघात घेवून जायला आवडत नाही. शिक्षणाचे राहू द्या, पण कमीत कमी दिसायला तरी बरी हवी. माझे मित्र माझ्यावर हसतात. माझी मस्करी करतात. हिला कुठे काय करावे ते कळतं नाही. त्याच्या बोलण्यात खंत होती.
मी पण नकळत कधी दोघांची तुलना करू लागले, मला कळालेच नाही. खरंच तो दिसायला देखना. गोरा, नाकी डोळी छान. शिकलेला. शिष्टाचार पाळणारा. आणि ती काळी, दात पुढे असणारी , कमी शिकलेली. गावात वाढलेली. मला तिचे एक कौतुक वाटले की तो तिला चार चौघात टोचून बोलला पण तिने तोंडातून अवाक्षर ही काढला नाही. निमूटपणे ऐकून घेत होती. प्रत्युत्तर दिले नाही. मी नकळत त्याच्या बाजूने विचार करत होते. मी पण मनाला समजावले की ही मलाही आवडली नाही. मी उगाचचं रागाने तिच्याकडे पाहिले.
एवढ्यात तिच्या मांडीवर झोपलेले तिचे बाळ रडत उठले. मी पाहिले की तिचे बाळं वडिलांसारखे सुंदर आहे. गोंडस आहे. रडण्या-या बाळाला त्याने पटकन उचलले. तो शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. पण बाळ काही शांत होईना.
त्याने उगी उगी करत चार इंग्रजी शब्द पण झाडले. माय डियर, कीप क्वायट. बेबी… बेबी… बी क्वायट… तरीही बाळ रडायचे थांबेना. तिने चार पाच वेळा बाळाला घेण्याच्या प्रयत्न केला पण त्याने दुर्लक्ष केले. थोड्या वेळानं कंटाळून त्याने बाळ तिच्याकडे दिले.
बाळ जवळ घेताना तिला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. तिने बाळाला जवळ घेतले. आपला पदर त्याच्या डोक्यावर पांघरून ती दूध पाजू लागली. बाळाला दूध पाजताना तिच्या चेह-यावर मातृत्वाच जे भाव होते, जे समाधान होते ते पाहून मला माझी लाज वाटली. कारण हिच्यावर थोड्या वेळा पूर्वी तिच्या बद्दल मनात राग धरला होता.
तिच्या चेह-यावर अप्रतिम आनंद होता. आई आपल्या मुलाला अमृतपान करवते हे दृश्य माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर दृश्य होते. याची तुलना मी कशाशीही करू शकत नव्हते. त्यावेळी ती विश्वातील सर्वात सुंदर स्त्री असते…!!
आई गोरी आहे की काळी! आई शिक्षित की अशिक्षीत! ती…. ती सुंदर आहे की असुंदर ! आई ती आईच असते….नऊ महिने त्रास सोसून, वेदना सोसून बाळाला जन्म देणारी आई सगळयात सुंदर असते…. स्वतःच्या बाळाची भूक शमवणारी आई…!! त्यादिवशी ते जगातील सर्वात सुंदर दृश्य मी पाहिले….!!
पाचगणी, महाराष्ट्र, मोबाईल 9975577684
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈