श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ३७ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- किर्लोस्करवाडी येथील आमच्या आठ वर्षांच्या वास्तव्यात आम्हा कुटुंबियांशी मनाने जोडले गेलेले हे पाटील कुटुंब. १९६७ मधे आम्ही कि. वाडी सोडल्यानंतर त्या कुणाशीच भेटी सोडाच आमचा संपर्कही रहाणे शक्य नव्हतेच. पण याला लिलाताई मात्र अपवाद ठरली होती!)
लिलाताईचं हे असं अपवाद ठरणं खूप वर्षांनंतर पुढं कधीतरी माझ्या संसारात घडणार असलेल्या दु:खद घटनेतून मला सावरुन जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म या संकल्पनांमधे लपलेलं गूढ ओझरतं तरी मला जाणवून देण्यास ती निमित्त ठरावी अशी ‘त्या’चीच योजना होती! ‘त्या’च्या या नियोजनाचे धागेदोरे लिलाताईशी आधीपासूनच असे जोडले गेलेले होते हे त्या आश्चर्यकारक घटनाक्रमानंतर मला मनोमन जाणवलंही होतं! आज या लेखनाच्या निमित्तानं हे सगळं पुन्हा जगताना दत्त महाराजांच्या माझ्यावरील कृपालोभाचं मला खरंच खूप अप्रूप वाटतंय!
या सगळ्यातली लिलाताईची भूमिका समजून घेण्यासाठी भूतकाळातल्या पाटील कुटुंबियांच्या आणि विशेषत: लिलाताईसंबंधीच्या आठवणींचा मागोवा घेणं आवश्यक आहे.
हे पाटील कुटुंब आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ स्तरापेक्षाही खालच्या स्तरातलं. तरीही कष्ट करीत मानानं जगणारं. लिलाताईच्या आईबाबांचा त्यांच्या लहानपणी सर्रास रुढ असलेल्या बालविवाहाच्या प्रथेनुसार नकळत्या वयातच लग्न झालेलं होतं. लिलाताई मोठ्या भावाच्या पाठीवरची आणि बहिणींमधे मोठी. एकूण पाच बहिणी आणि सहा भाऊ असं ते तेरा जणांचं कुटुंब. वडील किर्लोस्कर कारखान्यात कामगार. जेमतेम पगार. आर्थिक ओढाताण कधीच न संपणारी. सततच्या बाळंतपणांमुळे आई नेहमी आजारी. त्यामुळे घरची सगळी कामं लिलाताई आणि तिच्या पाठची बेबीताई दोघी शाळकरी वयाच्या असल्यापासूनच त्यांच्यावर येऊन पडली होती. हे सगळं सांभाळून अभ्यासही करणं झेपेना म्हणून बेबीताईने सातवी नापास झाल्यावर शाळा सोडलेली. लिलाताई मात्र अभ्यासात अतिशय हुशार. वर्गात नेहमीच पहिला नंबर. फक्त अभ्यासच नाही तर गाणं, वक्तृत्त्व, चित्रकला सगळ्याच स्पर्धांमधे तिचा पहिला नंबर ठरलेला. अतिशय शांत, सोशिक, हसतमुख, सात्विक वृत्तीची आणि स्वाभिमानी. मराठा कुटुंबात लहानाची मोठी होऊनही पूर्ण शाकाहारी. इंग्रजी, गणित, मराठी सगळ्याच विषयांवर तिचं प्रभुत्त्व! त्यामुळे शाळेतले मुख्याध्यापक आणि शिक्षक सर्वांचीच ती आवडती होती!
पण म्हणून अभ्यासाचं निमित्त करून तिने घरची कामं कधीही टाळली नाहीत. पाठच्या बहिणीच्या बरोबरीने पुढाकार घेऊन सगळ्या भावंडांची आणि घरकामाची जबाबदारी ती समर्थपणे आणि तेही हसतमुखाने पार पाडत राहिली. ती नववी पास होऊन दहावीत गेली तेव्हा दहावीत नापास झालेला तिचा मोठा भाऊ तिच्याच वर्गात आलेला. पुढे अकरावीत गेल्यावर (त्या वेळची मॅट्रिक) स्वतःबरोबरच त्यालाही अभ्यासात मदत करीत ती ते वर्ष पूर्णतः अभ्यासात व्यस्त राहिली. खूप शिकून मोठ्ठं व्हायचं आणि आपल्या घराला गरिबीच्या खाईतून बाहेर काढायचं हे तिचं एकमेव स्वप्न होतं! पण तसं व्हायचं नव्हतं. उलट त्या गरिबीच्याच एका अनपेक्षित फटक्याने तिचं स्वप्न चुरगाळून टाकलं. याला त्याच्याही नकळत निमित्त झाला होता तो तिच्याच वर्गात शिकणारा हाच तिचा मोठा भाऊ आणि रूढी-परंपरा न् सामाजिक रितीरिवाजांचा पगडा असणारे, सरळरेषेत विचार करीत आयुष्य ओढणारे तिचे कष्टकरी वडील! कारण मॅट्रिकच्या परीक्षेसाठी बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस जवळ येत चालला तरीही दोघांच्या फाॅर्म फीच्या पैशांची सोय झालेली नव्हती. खरंतर वडील त्याच चिंतेत आतल्या आत कुढत बसलेले. अखेर फॉर्म भरायचा शेवटचा दिवस उजाडला तेव्हा सकाळी सात वाजता कारखान्यांत कामाला निघालेल्या वडिलांना लीलाताईने आज फॉर्म भरायची शेवटची तारीख असल्याची आठवण करुन दिली. “दुपारच्या जेवायच्या सुट्टीपर्यंत मी कांहीतरी व्यवस्था करतो” असं सांगून त्याच विवंचनेत असलेले वडील खाल मानेने निघून गेले.
पण पैशाची कशीबशी सोय झाली ती फक्त एका फाॅर्मपुरतीच. मुलीपेक्षा मुलाचं शिक्षण महत्त्वाचं म्हणून वडिलांनी तिच्या मोठ्या भावाचा फॉर्म भरायला प्राधान्य दिलं. ‘ तू हवं तर पुढच्या वर्षी परीक्षेला बस’ असं हिला सांगितलं.
ती आतल्या आत कुढत राहिली. अभ्यास, परीक्षा या सगळ्यावरचं तिचं मनच उडालं.
मुख्याध्यापकांना सगळं समजलं तोवर खूप उशीर झाला होता. ते
तिच्यावर चिडलेच. ‘तू लगेच माझ्याकडे कां नाही आलीस? मला कां नाही सांगितलंस? मी फाॅर्मचे पैसे भरले असते’ म्हणाले. पण तोवर वेळ निघून गेलेली होती. नशिबाला दोष देत तिने तेही दुःख गिळलं. आपले वडील वाईट नाहीयेत, दुष्ट नाहीयेत हे स्वतःच्याच मनाला परोपरीने समजावून सांगितलं. नंतरच्या वर्षी मॅट्रीकची परीक्षा पास झाली पण परिस्थितीचा विचार करून नाईलाजाने तिने तिथेच आपलं शिक्षण थांबवलं!
शिक्षण थांबलं तरी स्वत: पूर्णवेळ गरजवंत घरासाठीच नाही फक्त तर स्वत:चा आनंद शोधत ती स्वत:साठीही जगत राहिली. भल्या पहाटे उठून घरासमोरच्या अंगणात सडा रांगोळी घालणं हे तिचं ठरलेलं काम. अंगणात रोज रेखाटलेल्या नवनव्या रांगोळ्या हे संपूर्ण कि. वाडीत वाखाणलं जाणारं तिचं खास वैशिष्ट्य होतं. तिच्या चिमटीतून अलगदपणे झरझर झिरपणाऱ्या रांगोळीच्या रेखीव अशा वळणदार रेखाकृतींमधले आकर्षक आकृतीबंध दृष्ट लागण्याइतके सुंदर असत. काॅलनीतले सगळेच ओळखीचे. त्यामुळे रस्त्यावरुन येणाजाणाऱ्या सर्वांच्याच नजरा आणि पाऊले पाटलांच्या अंगणाकडे हमखास वळायचीच!शिवणकला तर तिने निदान प्राथमिक तंत्र शिकून घेण्याची संधी मिळालेली नसतानाही सरावाने शिकून घेत त्याला कल्पकतेची जोड देऊन त्यात प्राविण्य मिळवलं होतं. त्याकाळी ‘फॅशन डिझाईन’ या संकल्पनेचा जन्मही झालेला नव्हता तेव्हाची ही गोष्ट. तिच्या कल्पनेतून साकारलेल्या विविध आकर्षक फॅशन डिझाईन्सवर तिच्या रांगोळ्यांतल्या आकृतीबंधांवर असायचा तसाच खास तिचा असा ठळक ठसा उमटलेला असे!
गणित हा विषयतर तिच्या आवडीचाच. त्याकाळी शिकवण्यांचं प्रस्थ रुढ नव्हतं झालेलं. तरीही अगदीच कुणी गळ घातली तर ‘मी माझं काम करता करता शिकवणार’ या अटीवर ती दरवर्षी अकरावीतल्या एक-दोन मुलांसाठी गणिताची स्पेशल ट्युशन घ्यायची. याखेरीज आपल्या सर्व भावंडांचा ती स्वत: अभ्यास घ्यायची तो वेगळाच. यातून महिन्याभरांत होणारी तिची कमाई वडिलांच्या तुटपुंज्या पगाराच्या जवळपास असायची जी घरासाठीच खर्चही व्हायची.
लिलाताईचीही दत्तावर अतिशय श्रध्दा होतीच. तिच्या रोजच्या कामांच्या धबगडयांत नित्यनेमांना कुठून वेळ असायला? मात्र आमच्या अंगणात दत्तपादुकांची
प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून अंत:प्रेरणेनेच असेल पण कांही विशिष्ट संकल्प न सोडताही अगदी साधेपणाने लीलाताईचा नित्यनेम सुरु झाला होता. रोजचं सडासंमर्जन होताच ती आधी स्नान आवरुन पादुकांची पूजा संपण्यापूर्वीच बाहेर येऊन उभी रहायची आणि माझ्या बाबांनी तिला तीर्थप्रसाद देताच प्रदक्षिणा घालून एकाग्रतेने हात जोडून नमस्कार करायची. तिचा हा नित्यनेम पुढे अनेक दिवस न चुकता निर्विघ्नपणे सुरूही होता. पण एक दिवस अचानक याच पाटील कुटुंबाचं स्वास्थ्य नाहीसं करणारी ‘ती’ विचित्र घटना घडली.. ! म्हटलं तर एरवी तशी साधीच पण लिलाताईचं आत्मभान जागं करीत त्या घरालाच हादरा देऊन गेलेली!!
तो प्रसंग तिच्या दत्तगुरुंवरील श्रद्धेची कसोटी पहाणारा ठरला होता आणि माझ्या बाबांकडून तिच्या विचारांना अकल्पित मिळालेल्या योग्य दिशेमुळे ती त्या कसोटीला उतरलीही!
तो दिवस न् ती घटना दोन्हीही माझ्या मनातील लिलाताईच्या आठवणींचा अविभाज्य भाग बनून गेलेले आहेत!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈