श्री महेश कराडकर
विविधा
☆ ताराबाई नावाचं लोकगारूड… ☆ श्री महेश कराडकर ☆
कपाळावर भलं मोठं कुंकू. रेखीव चेहरा. त्यावर पेरलेलं एक मार्दवशील, कणखरपणाची झाक असलेलं आणि सौम्य असं हसू. आवाज हळुवार पण भाषा ठाम. संवाद म्हणजे एकाच वेळी समोरच्यांशी आणि त्यांनी जाणिवेने अभ्यासलेल्या जोपासलेल्या लोकसंस्कृतीच्या संदर्भांशी चाललेलं ऐकतच राहावं असं हितगुज. अनेक विचार प्रवाह, चळवळी, मत-मतांतरं यामध्ये भांबावून गेलेल्या आजच्या आमच्या पिढीला कुठलाही अट्टाहास न करता विवेकवाद पेरणार सांगणं. त्यांच्या साधेपणात, त्यांच्या व्यासंगात, त्यांच्या ठामपणात, त्यांच्या सहवासात भेटणार्या प्रत्येकाला एक वेगळीच अनुभूती येते. हजारो वर्षं सोसत आलेल्या स्त्रीमनाचं सुसंस्कृत, तितकच पुरोगामी आणि प्रगल्भ अशा विचारांचं अलौकिक शिल्पच जिवंत झाल्याची ती अनुभूती असते. त्यातही दुधात साखर मिसळावी तशी सर्वांच्या हृदयात आपलं आईपण जिव्हाळ्यानं नोंदवणारी आपुलकीही असते.
… बाईंबद्दल असा विचार करायची फुरसत कधीच मिळाली नाही. जशी आपल्याला आईबद्दल विचार करायला सवड नसते, तशी! इतका जवळचा त्यांचा सहवास त्यांच्या शेजारी म्हणजे एक घर पलीकडेच राहत असल्याने मला गेली ३५-४० वर्ष मिळालाय… आणि माझ्या इतकाच तो साहित्य, नाटक, लोककला, शिक्षण, प्रबोधन अशा अनेक क्षेत्रात चळवळेपणानं काम करत असलेल्या आजूबाजूच्याच नव्हे, तर कोसो योजने दूर असणाऱ्या अनेक सृजनशील स्नेहीजनांनाही त्यांनी जाणीवा जपत दिला आहे.
मराठी मुलखातूनच नव्हे तर राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरून सांगलीत येणारी अशी ही मंडळी पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला एखाद्या वारकऱ्यांनं ज्या श्रद्धा भावनेनं जावं; त्या आचेनंच नाट्यपंढरी, सहकारपंढरी, संगीतपंढरी, आरोग्यपंढरी अशा अनेक नामाभिदानांनी सालंकृत झालेल्या सांगली मिरजेत आली, की डॉ. तारा भवाळकरांना भेटायला हमखास येतात. अशी माणसे कधी सांगून येतात. तर कधी अगंतुकपणे येतात. तेव्हा त्यांची ओळख करून देण्यासाठी… त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी बाईंचा हमखास,
‘लगेच ये!’, म्हणून मला आणि माझ्या पत्नीला आशाला एक घर पलीकडून फोन येतो. आणि आपलं गणगोत भेटल्याचा पुनःप्रत्यय आपलेपणानं समृद्ध करून जातो.
लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती यांचा आयुष्यभर मागोवा घेत आलेल्या बाईंच्या साहित्य क्षेत्रातील अनमोल कामगिरीची दखल आजवर अनेक संस्थांनी घेतली आहे. मात्र त्यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळावं असं गेली अनेक वर्ष मराठी साहित्यप्रेमींना आवर्जून वाटत आलेलं आहे.
परवा मराठी भाषेचं आणि तिच्या भाषाभगिनींचं विश्व व्यापणाऱ्या; कर्मयोगाने सांगलीच्या, जन्मानं नाशिकच्या आणि बालपण व किशोरवयातील वास्तव्याने काही काळासाठी पुण्याच्या असलेल्या ताराबाईंना ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं. आणि अवघं मराठमोळं जग हरखून गेले. गेला आठवडाभर त्यांचा मोबाईल, घरातला फोन शुभेच्छांचा फुलगंध घेऊन आनंद आणि उत्साहाने अविरतपणे खणखणतो आहे. साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि कार्यकर्त्यांबरोबरच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, विधानसभेच्या अध्यक्षा, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील संघटना व संस्थांतील माणसांची त्यांच्या छोट्याशा निवासस्थानी रीघ लागलेली आहे.
सतत गजबजलेल्या डॉ. आंबेडकर रोडवरच्या ताराबाईंच्या घरासमोर २५-३० छोट्यामोठ्या व्यावसायिकांच्या दुकानांची एक रांग आहे. या व्यावसायिक मित्रांना देखील ताराबाई अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या या गोष्टीचा आनंद झाला. या साध्यासुध्या माणसांनीदेखील त्यांना भेटून त्यांचं अभिनंदन केलं. हे मराठी भाषेवरचं त्यांचं प्रेम खरंतर मराठीला अभिजाततेचा दर्जा देण्याइतकंच मोलाचं नाही काय?
☆
© श्री महेश कराडकर
मो. ९४२३०३६००७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈