☆ मनमंजुषेतून ☆ तिळगुळ घ्या, गोड बोला ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

तिळगुळ घ्या, गोड बोला, संक्रांतीच्या सणाला तिळगुळ एकमेकांना देताना म्हणायचे गोड गोड शब्द!  वर्षभरातील कटू आठवणींना विसरून जाऊन एकमेकात गोडी निर्माण करणारा सण!  नवीन लग्न झालेल्या लेकीचा संक्रांतसण करण्यास मातेची केवढी धावपळ. जामातांना सणाला बोलवून त्यांना संक्रांतीचे दान करणे यात परंपरेचा भाग आलाच. बालगोपाळांचा बोरनहाण हा केलेला संस्कार, परंपरेचा व हौसेने करायचा सोहळा! उत्सवप्रियतेमुळे चारजणांनी एकत्र जमावे हेच खरे त्यामागील उद्दिष्ट.

असे आपले अनेक सण. त्यामागील संस्कार, काहीवेळा पौराणिक कथा आणि बहुतांशी आपल्या थोर भारतीय संकृतीतील विचार, आचार आणि परंपरा यांचा सुरेख संगम म्हणजे संक्रांतीसारखे सण होय. सणांनी आपले जीवन इतके व्यापून टाकलयं की त्यांची आपण आतुरतेने वाट पहात असतो. सणामुळे आपल्या जीवनात उत्साह, आनंद आणि क्रियाशीलता येते.

प्रत्येक सणामागे आणि धार्मिक कृत्यात दानाची अजोड अशी कल्पना असते. आपली संस्कृती त्यावरच आधारित असल्याने आपल्याजवळचे जे चांगले आहे, उत्तम आहे ते योग्य ठिकाणी देणे, यातून दात्यास सात्विक समाधान लाभते.

मकर संक्रणापासून देवांची रात्र संपून दिवस सुरु होतो. दिवस म्हणजे प्रकाश. इतके दिवस असलेली रात्र सरून सूर्यदेवाची स्वच्छ किरणे पृथ्वीतलावर आल्याने सर्वकडे तेजाचे वातावरण निर्माण होते. पौराणिक कालापासून देव व राक्षस असे दोन परस्पर विरुद्ध पक्ष आपण पाहतो. देवांचे ते ते आचरणीय, चांगले, राक्षस म्हणजे क्रूर, कुटील, कारस्थानी अशी माणसे, प्रवृत्ती! म्हणून अंधाराचा काळ म्हणजे वाईट प्र्रुवृतीचा काळ. तो मागे पडून स्वच्छ प्रकाशाचा काळ येतो आहे. त्यालाच संक्रमण म्हणतात. अनिष्टातून चांगल्या सुष्ट विचारांकडे वळणे म्हणजे संक्रमण, बदल! ते विचारांचे,  आचारांचे आणि कृतीचेही हवे.

कालचक्रानुसार सूर्याची दोन आयने मानली जातात. १) दक्षिणायन २) उतारायण. मकरसंक्रमण म्हणजे दक्षिणायनाचा अस्त आणि उत्तरायणाचा उदय.

संक्रातीला तिळाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्राचीन काळापासून तिळ आपल्या स्निग्ध गुणांमुळे, आपल्या आहारात महत्वाचे स्थान व्यापून आहे.

महर्षे गोत्र संभूता:काश्यपस्य तिलामृता:

तस्मादेषां प्रदानेन मम पाप व्यतोहतु||

महर्षी कश्यपांच्या कुळातील तीळ अमृत मानला गेला आहे. म्हणून तिळाला काश्यपहि म्हणतात. अशा अमृतमय तिळाच्या दानाने माझ्या पापांचा नाश होवो.

प्राचीन काळापासून तीळ हे, दोन्ही कर्मासाठी म्हणजे देवनाकृत व पितृकृत्य यासाठी शास्त्रकारांनी शुद्ध मानले आहे. विधीपूर्वक जर, होम,  दान, तिलमिश्रित उदक, तिलाक्षता अर्पण केल्या, तर त्याचे फळ दात्यास प्राप्त होते. तिळाचा गुणधर्म उष्ण असल्याने त्याच्या सेवनाने आपल्या शरीरात उष्णता निर्माण होऊन शक्ती वाढते.

तिलस्नायी, तीलोद्वती, तिलहोमी,  तिलोदकी|

तीलभूक तिलदात्रीच षटतिला:पापनाशका||

तिळाच्या स्नानाने, तीळयुक्त उदक घेतल्याने तिळाच्या सेवनाने व तिळाच्या दानाने पापांचा नाश होतो. म्हणजेच दक्षिणायनात घडलेल्या चुकांचे, पापांचे परिमार्जन तिलसेवनाने होऊ दे. आपल्या पुर्वज्यांनी निसर्ग आणि अनुरूप असा आहार, यांची सांगड घालून जनसामान्यांना आहारविहाराचे महत्व पटवून दिले आहे.

या सणाला सुवासिनी सुगडाचे दान करतात. सुगड मृतिकेचे असते. त्यात शेतात पिकलेले धान्य, ऊस गाजर, हरभरा आदी घालून ऐकमेकींना दान करतात. या दानाला सुवर्णदानाचे महत्व आहे. सुवर्णाचा पिवळा रंग आणि त्याचे स्थान दुसरा धातू घेऊ शकत नाही. पृथ्वीतलावर पिकलेले हे काळ्यामातीतील सोने सुवर्णाइतकेच, किंबहुना त्याहून अधिक मोलाचेच आहे. या भूमीतील सोन्यामुळेच तर आपले भरण पोषण होते. पृथ्वीतलावरील जीवन त्याविना अशक्यप्राय आहे. म्हणून मृत्तीकेचे सुगड. हे भूमीचे द्योतक,  तर धान्य हे त्यातून निर्माण झालले सोने,  म्हणजे सुवर्णच! मृत्तिका आपली माता.

पूर्वजांनी पुजिलेल्या अशा अनेक उच्चतम कल्पनांना आजच्या आधुनिक काळात कितपत महत्वाचे स्थान उरलयं ही शंका आहे. त्यागाचा असलेला महान संस्कृतीचा पाया आत्मकेंद्री, स्वार्थी विचारांनी डळमळा यला  लागला आहे. माझे स्थान, मी आणि मीच मला शोधत फिरतो आहे. या वृत्तीमुळे आपण एकमेकांना दुरावत आहोत. तंत्रज्ञानामुळे जग क्षणाच्या अंतरावर आले आहे. पण पूर्वीचा स्नेहभाव, आपुलकी या गुणांना या नव संस्कृतीने दूर लोटले आहे. सहनशीलता आणि त्यागीवृती आपल्यापासून दूर पळते आहे.  पाश्चीमात्यांचा भोगवाद आपण अंगिकारला आहे त्यामुळे तिळातिळाने गोड बोलण्यापेक्षा तिळा-तिळाने कटू बोलणे आणि तिळा-तिळाने एकमेकात वैमनस्य वाढत आहे.  तिळाच्या उष्ण प्रव्रुतीमुळे व पौष्टीक्तेमुळे आपले बल वर्धन होते आपण शरीराने व मनानेही बलवर्धक होऊन या अनिष्ट काळाचा नाश करण्यास सज्ज होणे उचित आहे. धन गेले तर कोणतेही नुकसान नाही आरोग्य बिघडले थोडे नुकसान होते,  परंतु चारित्र्य बिघडले तर सर्वस्वाचाच नाश होतो. शुद्ध आचरण हेच या संक्रांतीच्या काळाचा नेम करूया म्हणून या संक्रमणाच्या कार्यास सर्वांनी हातभार लावूया.  जुन्या नव्याची सांगड घालून नवं विचारांची,  आचारांची वाट अनुसरणे हेच आधुनिक काळात उचित उत्तरायण होईल.

एक दुजांना तिळगुळ देऊ

गोड बोलण्या शप्पथ घेऊ

 भांडण-तंटा विसरून जाऊ

 आपण सारे स्नेह वाढवू !

 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments