श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ४४ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- हॉस्पिटल येताच मी पटकन् उतरून निघालो. सोबत घोरपडेसाहेबही होतेच. आम्ही आत गेलो तेव्हा आरती, माझी आई आणि भाऊ केबिनच्या बाहेर बसलेले दिसले. मी आरती जवळ गेलो. मला पहाताच तिचे डोळे भरून आले.
“समीर सिरीयस आहे. डॉक्टर तुझीच वाट बघतायत. जा लगेच. बोल त्यांच्याशी. ” आईचाही आवाज बोलताना भरून येत होताच.
आज माझ्यापुढे काय वाढून ठेवलं असेल या आशंकेनेच मी कसंबसं स्वतःला सावरत डॉक्टरांच्या केबिनकडे धाव घेतली… !!)
पाठोपाठ घोरपडे साहेब होतेच.
भूतकाळातला चटका लावून गेलेला इथवरचा प्रसंग आरतीला सांगण्याची आवश्यकता नव्हती आणि पुढचं सगळं सांगायचं मला धाडस होत नव्हतं.
” मी शांतपणे ऐकून घेईन.. त्रास करुन घेणार नाही.. पण सांगा लवकर.. काय सांगणार होतात?… “
” त्यादिवशी डॉक्टरांच्या केबिनमधून आम्ही बाहेर आलो तेव्हाच डॉक्टर काय म्हणाले ते तुला जाणून घ्यायचं होतं. पण मोघम कांहीतरी तुला दिलासा देणारं सांगून मी वेळ मारून नेली होती. खरी परिस्थिती वेगळीच होती….. “
“वेगळीच म्हणजे.. ?”
” ऍलोपॅथिक औषधांच्या सततच्या टाळता न येणाऱ्या उपचारांमुळेच त्यादिवशी त्याला मॅनेन्जायटीसचा अॅटॅक आला होता. म्हणूनच त्याची घुसमट होऊन त्या दिवशी संध्याकाळी त्याच्या तोंडाला फेस आला होता आणि तो काळा निळा पडत चालला होता. मला हे सगळं सांगून शांतपणे डॉक्टरांनी मला समजावलं होतं आणि मी कधी कल्पनाही केली नव्हती असा एक प्रस्ताव माझ्यापुढे ठेवला होता… “
” कसला प्रस्ताव.. ?”
मी धीर गोळा करून तिच्या नजरेला नजर देत अंदाज घेत असतानाच माझ्याही नकळत माझ्याच तोंडून स्वतःशीच बोलावं तसे शब्द निसटलेच…..
“समीरला या यातनांतून सोडवण्याचा… “
ती अविश्वासाने माझ्याकडे पहात राहिली. आता सगळं सांगण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हता.
” डाॅक्टर म्हणाले होते,
‘मॅनेन्जायटीसच्या अटॅकमुळे तो यापुढचं त्याचं संपूर्ण आयुष्य अंथरुणाला खिळून रहात मतिमंद म्हणूनच जगणार आहे. ते आयुष्य त्याच्यासाठी फक्त यातनामय असं असह्य दु:खच असेल. या अवस्थेतून त्याच्या अशा दयनीय अवस्थेमुळे तो कधीच बाहेर पडू शकणार नाही. जितकी वर्षं तो जगेल तोपर्यंत अंथरुणावर पडल्या अवस्थेत पूर्णत: परावलंबी आयुष्य ओढत राहील. किती दिवस, किती वर्षं हे सांगता येणार नाही. आणि तोवर त्याची देखभाल आणि सर्व प्रकारची सेवा त्याच्या आयुष्यभर तुम्हाला करावी लागेल. त्याला या सगळ्या यातनांमधून मुक्त करायची हीच वेळ आहे. पण त्यासाठी जन्मदाते पालक म्हणून तुमची संमती गरजेची असणार आहे. “
असं म्हणून त्यांनी माझ्यापुढे सहीसाठी एक फाॅर्म ठेवला. त्याकडे नजर जाण्यापूर्वीच हे सगळं ऐकून मी गोठून गेलो होतो. शून्यात पहात क्षणभरच तसाच उभा असेन तेवढ्यात घोरपडे साहेबांनी मला थोपटलं.. आणि मी भानावर आलो…
“आजपर्यंत खूप सोसलंय बाळानं आणि तुम्ही सगळ्यांनीही. जे जे करायचंय ते ते सगळं केलंयत. आता जे करायचं ते त्या बाळाच्या हितासाठी, डाॅक्टर म्हणाले तसं करणं गरजेचं आणि योग्यही आहे. ऐक माझं… ” असं म्हणून घोरपडे साहेबांनी स्वतःच्या खिशातलं पेन माझ्या हातात दिलं. त्यांचे सगळे शब्द माझ्या कानाला स्पर्शून विरून गेले. कारण मी काय करायला हवं ते मी डॉक्टरांचं बोलणं ऐकलं तेव्हाच मनोमन ठरवलंच होतं जसंकांही. मी ते पेन घेतलं. शांतपणे डॉक्टरांकडे पाहिलं. त्यांनी जे सुचवलं होतं त्यात त्यांचा कणभरही स्वार्थ नाहीय हे मला समजत होतं, पण तरीही.. ?
“डॉक्टर, तुम्ही म्हणताय त्यातलं तथ्य मी नाकारत नाही. पण निर्णय घेण्यापूर्वी एकच प्रश्न विचारायचाय. “
“कोणता प्रश्न?”
“विज्ञानाने लावलेल्या शोधांमुळे हे आपण सहज सुलभ पद्धतीने करू शकतो हे खरं आहे, पण समजा आत्ता मी बाळाला या पद्धतीने यातनामुक्त करायला परवानगी दिली, तर आमच्या संसारात पुढे येणारं आमचं अपत्य त्याच्या आयुष्यभर पूर्णतः निरोगी राहील याची खात्री हेच विज्ञान देऊ शकणाराय कां?”
डॉक्टर माझ्याकडे थक्क होऊन पहात राहीले.
“हे कसं शक्य आहे?अशी खात्री कुणीच देऊ शकणार नाही. ” ते म्हणाले.
“असं असेल तर बाळाचे जे कांही भोग असतील ते तो पूर्णपणे भोगूनच संपवू दे. मी अखेरच्या क्षणापर्यंत त्याची सोबत करेन. जन्म आणि मृत्यू हे देवाचे अधिकार आपण आपल्या हातात नको घ्यायला. तो जिवंत असेल तितके दिवस त्याची सगळी सेवा मनापासून करणं हेच माझं सुख समजेन मी. आपण शक्य असेल ते सगळे उपचार सुरू ठेवूया डॉक्टर… “
माझं बोलणं संपलं तरी आरती त्यातच हरवल्यासारखी क्षणभर गप्प बसलीय असं वाटलं पण ते तसं नव्हतं. आतून येणारे दु:खाचे कढ ती महत्प्रयासाने थोपवू पहातेय हे मला जाणवलं तोवर तिनं स्वतःला कसंबसं सावरलं. आपले भरून येणारे डोळे पुसून कोरडे केले पण ते आतून ओलावतच राहिले.
“आणि.. हे.. हे सगळं आज सांगताय तुम्ही? इतके दिवस स्वतः एकटेच सहन करत राहिलात? मला विश्वासात घेऊन कां नाही सांगितलंत सगळं.. ?”
दोघांनीही दडपणात राहून काय केलं असतं आम्ही? कुणातरी एकाच्या मनातला आशेचा किरण तरी विझून चालणार नव्हता ना? आणि ती हे सगळं सहन नाही करु शकणार असंही वाटत होतं हेही खरं.
“तुला मुद्दाम सांगावं अशी ती वेळ नव्हती. आणि ते तुला सांगायलाच हवं अशी हीच वेळ आहे म्हणून आत्ता सांगितलं. आता मी बोलतो ते नीट समजून घे. माझ्या मनात अनेक प्रश्न गर्दी करतायत. लिलाताईच्या पत्रानं मला सावरलंय, दिलासा दिलाय, म्हणूनच या परिस्थितीतही मी सर्व बाजूंनी या घटनेचा शांतपणे विचार करु शकतोय. समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधांनी बरा होण्याच्या पलीकडे गेलाय ही आपल्यापैकी डॉक्टर, मी आणि घोरपडे साहेब याखेरीज बाकी कुणालाच माहित नसलेली गोष्ट लिलाताईपर्यंत पोचणं शक्य तरी आहे कां?आणि तरीही… ? तरीही ते तसं ती तिच्या पत्रात अगदी सहजपणे लिहितेय. हो ना? शिवाय समीर बरा होण्यासाठी देवाघरी गेलाय आणि पूर्ण बरा होऊन तो परत येणार आहे हेही आपल्याला सांगतेय. यावर आपला विश्वास बसावा, आपण सावरावं म्हणूनच जणू मला आज तिच्या आईना भेटायला जायची बुद्धी होते, तिथे जाण्यापूर्वीचं तुझ्या अस्वस्थतेमुळं मनात निर्माण झालेलं त्यांच्याबद्दलचं अनाठायी किल्मिष त्यांना अंतर्ज्ञानाने समजले असावे इतक्या सहजपणे त्या आपुलकीच्या शब्दांनी अलगद दूर करतात काय आणि आपल्याला निश्चिंत केल्यासाठीच बोलल्यासारखं लिलाताईच्या वाचासिध्दिबद्दल उत्स्फूर्तपणे सांगतात काय… सगळंच अतर्क्य आहे असं नाही तुला वाटत?”
सगळं ऐकलं आणि खऱ्याखोट्याच्या सीमारेषेवर घुटमळत असावी तशी ती विचारात पडली. पण क्षणार्धात तिने स्वत:ला सावरलं आणि ठामपणे म्हणाली, ” तुम्ही समजता आहात तसं सगळं घडलं तरी तेवढ्याने माझं समाधान होणार नाहीs….. “
“म्हणजे.. ?”
“म्हणजे आपल्याला पुन्हा मुलगाच झाला तर आपला समीरच परत आलाय असं तुम्ही म्हणालही, पण मी…. ? तुम्हाला कसं सांगू… ? रात्री अंथरुणाला पाठ टेकली, अलगद डोळे मिटले की केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पहात दोन्ही हात पुढे पसरत झेपावत असतो हो तो मी जवळ घ्यावं म्हणून, आहे माहित?आणि मग मनात रुतून बसलेल्या त्याच्या सगळ्या आठवणी खूप त्रास देत रहातात मलाs… तो गेल्यापासून रात्रभर डोळ्याला डोळा लागलेला नाहीय हो माझ्याs. त्याचे टपोरे डोळे,.. गोरा रंग,.. लांबसडक बोटं,.. दाट जावळ.. सगळं सगळं मनात अलगद जपून ठेवलंय मी. मुलगा झालाच तर तो आपला ‘समीर’च आहे की नाही हे फक्त मीच सांगू शकेन… बाकी कुणीही नाहीss.. ” भावनावेगाने स्वतःलाच बजावावं तसं ती बोलली न् उठून आत निघून गेली… !
तिच्या बोलण्यात नाकारण्यासारखं काही नव्हतंच. माझ्यासाठी हा प्रश्न तिच्या भावना आणि माझी श्रद्धा अशा दोन टोकांमधे तरंगत राहिला… ! यातून बाहेर पडायला ‘लिलाताई’ हे एकच उत्तर होतं आणि या महिन्यातली पौर्णिमाही लगेचच तर होती. जावं कां तिच्याकडे?भेटावं तिला?बोलावं तिच्याशी? हो. जायला हवंच. या विचाराच्या स्पर्शाने दडपण निघूनच गेलं सगळं. मन शांत झालं.. !
मी पौर्णिमेची आतुरतेने वाट पहात राहिलो खरा पण? गूढ.. उकलणार.. नव्हतंच. ते अधिकच गहिरं होत जाणार होतं.. !!
त्याक्षणी मला त्याची कल्पना नव्हती एवढंच!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
हृदयस्पर्शी