श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ४५ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- आरती खऱ्या खोट्याच्या सीमारेषेवर घुटमळत होती… “समीरच्या सगळ्या आठवणी मनात रुतून बसल्यात हो माझ्याs. रात्री अंथरुणाला पाठ टेकली तरी मिटल्या डोळ्यांसमोर हात पुढे पसरुन माझ्याकडे येण्यासाठी झेपावत असतो तोss! आपल्याला मुलगा झाला तर तो समीरच आहे कां हे फक्त मीच सांगू शकेन.. तुम्ही कुणीही नाहीss.. ” भावनावेगाने स्वतःलाच बजावावं तसं ती बोलली आणि ऊठून आत निघून गेली.. !!
आता या सगळ्यातून बाहेर पडायला ‘लिलाताई’ हे एकच उत्तर होतं! जावं कां तिच्याकडे?भेटावं तिला? बोलावं तिच्याशी?.. हो.. जायला हवंच…!…
मी पौर्णिमेची आतुरतेने वाट पाहू लागलो…!)
तिच्याकडे जायचं. तिला भेटायचं. तिच्याशी मोकळेपणाने बोलायचं. समीरबाळाच्या जाण्यानंतरचं पुत्रवियोगाच्या दु:खानं झाकोळून गेलेलं माझं मन:स्वास्थ्य आणि नंतर तिच्या पत्रातील माझं सांत्वन करणाऱ्या आशेच्या किरणस्पर्शाने स्थिरावलेलं माझं मन.. हे सगळं कोणताही आडपडदा न ठेवता सांगून टाकायचं… असं सगळं मनाशी ठरवूनच मी त्या पौर्णिमेच्या दिवशी घराबाहेर पडलो. नृसिंहवाडीला जाऊन आधी दत्तदर्शन घेऊन थेट कुरुंदवाडची वाट धरली. तिच्या घराबाहेर उभा राहिलो आणि मनात चलबिचल सुरु झाली. तिचेही वडील नुकतेच तर गेलेत. तीसुध्दा त्या दु:खातच तर असणाराय. तिला आपलं दुःख सांगून त्रास कां द्यायचा असंच वाटू लागलं. मग तिला कांही सांगणं, विचारणं मनातच दडपून टाकलं. तेवढ्यांत दार उघडून दारात तीच उभी. आनंदाश्चर्याने पहातच राहिली क्षणभर….
“तू.. ! असा अचानक?.. ये.. बैस.. ”
ती मोकळेपणाने म्हणाली. आतून पाण्याचं तांब्याभांडं आणून माझ्यापुढे ठेवलंन्.
“लिलाताई, मी आज आधी न कळवता तुला भेटायला आलो ते दोन कारणांसाठी.. ” मी मुद्द्यालाच हात घातला.
“होय? म्हणजे रे.. ?”
“समीरचं आजारपण, त्याचं जाणं.. हे सगळं घडलं नसतं तरी मी तुमचे नाना गेल्याचं समजल्यावर तुला भेटायला आलो असतोच हे एक आणि समीर गेल्याचं तुला माझ्या आईकडून समजल्यानंतर तू सांत्वनाचं जे पत्र पाठवलं होतंस ते वाचताच क्षणी मला जो दिलासा मिळालाय त्याबद्दल तुझ्याशी समक्ष भेटून बोलल्याशिवाय मला चैनच पडत नव्हतं म्हणूनही आलोय. “
“नाना गेल्याचं समजलं तेव्हा तू न् आरती दोघेही माझ्या आईला भेटायलाही गेला होतात ना? आईनं सांगितलंय मला. “
“हो. त्यावेळी खूप कांही सांगत होत्या त्या मला. विशेषत: तुझ्याबद्दलच बरंचसं… “
“आईपण ना… ! माझ्याबद्दल काय सांगत होती?”
“माझ्या बाबांसारखी
तुलाही वाचासिद्धी प्राप्त झालीय असं त्या म्हणत होत्या. “
ती स्वत:शीच हसली. मग क्षणभर गंभीर झाली.
“माझी आई भोळीभाबडी आहे रे. तिला आपलं वाटतं तसं. बोलाफुलाला गाठ पडावी असेच योगायोग रे हे. बाकी कांही नाही… “
“माझे बाबाही असंच म्हणायचे. पण ते तेव्हढंच नव्हतं हे तू स्वत:ही अनुभवलंयस”
तिने चमकून माझ्याकडं पाहिलं. काय बोलावं तिला समजेना. मग विचारपूर्वक स्वतःशी कांही एक ठरवल्यासारखं ती शांतपणे म्हणाली,
“आईनं तुला जे सांगितलं ते योगायोगाने घडावं तसंच तर होतं सगळं. ते ज्यांच्या बाबतीत घडलं ते आमचे नाना आणि माझा मोठा भाऊ आण्णा यांच्यासंबंधातलं. जायच्या आधी नाना आठ दिवस खूप आजारी होते. तब्येतीच्या बाबतीत चढउतार सुरूच असायचे. मुद्दाम सवड काढून असंच एकदा आम्ही दोघेही त्यांना भेटायला गेलो होतो. पण तेव्हा ते पूर्णतः ग्लानीतच होते. आम्ही येऊन भेटून गेलोय हे त्यांना समजलंही नाहीये ही रुखरुख तिथून परत येताना माझ्या मनात रुतूनच बसली होती जशीकांही. मला स्वस्थता कशी ती नव्हतीच. अंथरुणाला पाठ टेकली की मनात विचार यायचे ते नानांचेच. ते कसे असतील? ते बरे होतील ना? हे असेच सगळे. त्यादिवशी रात्री डोळा लागला होता तोही याच मानसिक अस्वस्थतेत. आणि खूप वेळाने जाग आली ती डोअरबेल वाजल्याच्या आवाजाने. हे घरी नव्हते. कांही कामासाठी परगावी गेले होते. ते परत यायला अद्याप एक दोन दिवस अवकाश होता. तरीही तेच आले असतील कां असं मला वाटलं न् बेल दुसऱ्यांदा वाजली तशी मी पटकन् उठलेच. दार उघडून पाहिलं तर दारात नाना उभे. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना…
“नानाs, तुम्ही.. ? असे एकटेच.. ? बरे आहात ना?.. “
“हो अगं. काल वाडीला दर्शनाला आलो होतो. आज परत जायचंय. जाण्यापूर्वी तुला भेटून जावं असं वाटलं म्हणून आलोय. “
“बरं झालं आलात. बसा हं. मी पाणी देते न् चहा करते लगेच. “
“एs.. तू बस इथं. मी तुला भेटायला आलोय. चहा प्यायला नाही. मला जायचंय लगेच.. “
मी थोडावेळ बसले. बोलले त्यांच्याशी. मग चहा करायला म्हणून उठले. आत जाऊन पाण्याचं तांब्याभांडं घेऊन बाहेर आले तर नाना तिथं नव्हतेच. दार सताड उघडंच. मला भास झाला कीं स्वप्नच हे?.. असा विचार मनात आला तेवढ्यांत फोनची रिंग वाजली. फोन आण्णाचा.. मोठ्या भावाचा होता. नाना नुकतेच गेलेत हे सांगणारा.. !!
पहाटेचे पाच वाजले होते. ऐकलं आणि सरसरुन काटाच आला अंगावर.. ! सोफ्याचा आधार घेत कशीबशी खुर्चीवर टेकले.
ते स्वप्न नव्हतं. तो भासही नव्हता. नाना खरंच आले होते. त्यांची भेट न झाल्याची त्या दिवशीची माझ्या मनातली रूखरुख कमी करण्यासाठी ते जाण्यापूर्वी खरंच इथे येऊन मला भेटून गेले होते. हे एरवी कितीही अशक्य, असंभव, अविश्वसनीय वाटेल असं असलं तरी माझ्यापुरतं हेच सत्य होतं! नाना जाताना मला भेटून लाख मोलाचं समाधान देऊन गेले होते हेच माझ्यासाठी ते गेल्याच्या दु:खावर फु़ंकर घालणारं होतं.. !!”
मी भारावल्या सारखा ऐकत होतो.
“आणि.. तू आण्णाच्या दीर्घ आजारपणात त्याला दिलेल्या औषधाने तो झटक्यात बरा झाला असं तुझ्या आई सांगत होत्या त्याचं काय?तो चमत्कार नव्हता?”
“नाना गेले त्याआधीच्या चार-पाच महिन्यांपूर्वीची ती गोष्ट. मी अशीच नानांनाच भेटायला माहेरी गेले होते. तेव्हाच्या गप्पांत आईनेच आण्णाच्या आजारपणाबद्दल सांगितलं होतं. ते आजारपण वरवर साधं वाटलं तरी आण्णासाठी मात्र असह्य वेदनादायी होतं. दुखणं म्हणजे एक दिवस त्याच्या हातापायांची आग व्हायला सुरुवात झाली आणि हळूहळू ती अंगभर पसरली. डॉक्टरांची औषधं, इतर वेगवेगळे उपाय सगळं होऊनही गुण येत नव्हता. तो रात्रंदिवस असह्य वेदनांनी तळमळत रहायचा. आईकडून हे ऐकलं त्याक्षणी मी थक्कच झाले. कारण कालच मला एक स्वप्न पडलं होतं. ते असंबध्दच वाटलं होतं तेव्हा पण ते तसं नव्हतं जाणवताच मला आश्चर्याचा धक्काच बसला.
“आई, तुला खरं नाही वाटणार पण कालच मला एक स्वप्न पडलं होतं. स्वप्नांत आण्णा माझ्या घरी आला होता. त्याला काय त्रास होतोय ते सगळं अगदी काकुळतीने मला सांगत होता. ‘कांहीही कर पण मला यातून बरं कर’ असं विनवीत होता. मी त्याला दिलासा दिला. ‘माझ्याकडे औषध आहे ते लावते. तुला लगेच बरं वाटेल’ असंही मी म्हटलं. परसदारी जाऊन कसला तरी झाडपाला घेऊन आले. तो पाट्यावर बारीक वाटून त्याचा लेप त्याच्या सगळ्या अंगाला लावून घ्यायला सांगितलं आणि तो लेप लावताच आण्णा लगेच बराही झाला… ” मी हे सगळं आईला सांगितलं खरं पण तो झाडपाला कसला हे मात्र मला आठवेना. त्यांना काटेही होते. ती पानं चिंचेच्या पानासारखी होती पण चिंचेची पानं नव्हती कारण चिंचेच्या झाडाला काटे नसतात. तिथून परत आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि हे दोघेही नेहमीप्रमाणे सकाळी नित्यदर्शनासाठी नृ. वाडीला जाऊन परतीच्या वाटेवर आम्ही नेहमी पाच मिनिटं एका पारावर बसायचो तसे बसलो. बोलता बोलता हाताला चाळा म्हणून त्या पारावर पडलेल्या वाळक्या काड्या उचलून मी मोडत रहायचे. त्यादिवशीही तसं करत असताना बोटाला एक काटा टोचला. पाहिलं तर त्या काडीवरचा वाळलेला पाला चिंचेच्या पानांसारखाच दिसला. मी नजर वर करून त्या झाडाकडे पाहिलं. ते शमीचं झाड होतं. शमी औषधी असते हे ऐकून माहित होतं म्हणून मी आण्णाच्या घरी फोन करून वहिनीशी बोलले. रोज शमीचा पाला वाटून त्याचा लेप लावायला सांगितलं. ती रोज तो लेप आण्णाला लावू लागली आणि तीन दिवसांत त्याचा दाह पूर्ण नाहीसा झाला. ” लिलाताई म्हणाली.
सगळं ऐकून मी पूर्णत: निश्चिंत झालो.
“लिलाताई, मला दिलासा देणारा असाच एक चमत्कार माझ्याही बाबतीत घडलाय. “
“कसला चमत्कार?” तिने आश्चर्याने विचारलं.
“तू मला पाठवलेलं ते सांत्वनपर पत्र हा चमत्कारच आहे माझ्यासाठी. ” मी म्हंटलं. तो कसा ते तिला सविस्तर समजावून सांगितलं.
” समीरचा आजार असा बरा होण्याच्या पलिकडे गेला होता. ते आमच्या घरीही माझ्या खेरीज कुणालाच माहित नसताना तुला नेमकं कसं समजलं? याचं आश्चर्य वाटतंय मला. कारण ‘समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेलेला असल्याने तो बरा होऊन परत येण्यासाठी देवाघरी गेलाय यावर विश्वास ठेव’ असं तू लिहिलं होतंस. आठवतंय? हे अशाच शब्दात लिहिण्याची बुद्धी तुला कशी झाली ही उत्सुकता आहे माझ्या मनात. “
हे सगळं ती भान हरपून ऐकत होती. मी बोलायचं थांबलो तशी ती भानावर आली. शांतपणे उठली आणि आत गेली. ती येईल म्हणून मी वाट पहात राहिलो. मग उठून उत्सुकतेने आत डोकावून पाहिलं तर ती देवापुढे हात जोडून बसलेली आणि तिच्या मिटल्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. काय करावं ते न समजून मी खाल मानेनं बाहेर आलो. तिची वाट पहात बसून राहिलो. कांही क्षणात ती बाहेर आली. अंगाऱ्याचं बोट माझ्या कपाळावर टेकवलंन.
“तुझ्या डोळ्यांत पाणी का गं? माझं कांही चुकलं कां?”.
“नाही रे. तुझं कांहीही चुकलेलं नाहीय. मी रडत नाहीय अरे, हे समाधानाचे, कृतार्थतेचे अश्रू आहेत. “
“म्हणजे?”
“तुझ्या आईकडून समीर गेल्याचं मला समजलं त्या क्षणापासून खूप अस्वस्थ होते रे मी. तू हे सगळं कसं सहन करत असशील याच विचाराने व्याकुळ होते. घरी येताच सुचतील तसे चार शब्द लिहून पत्र पोस्टात टाकलं तेव्हा कुठे थोडी शांत झाले होते. खरं सांगू? मी काय लिहिलं होतं ते विसरूनही गेले होते. आज तू आलास, मनातलं सगळं बोललास तेव्हा ते मला नव्यानं समजलं. समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरे होण्याच्या पलीकडे गेलेला असल्याचं शप्पथ सांगते मला नव्हतं माहित. ते सगळं ‘मी’ लिहिलेलं नव्हतंच तर. ते दत्तगुरुंनी माझ्याकडून लिहून घेतलं होतं हे आज मला समजतंय. त्यांना दिलासा द्यायचा होता तुला आणि त्यासाठी मध्यस्थ म्हणून मी त्यांना योग्य वाटले हे लक्षात आलं आणि मी भरून पावले. सगळं कसं झालं मला खरंच माहित नाही. पण हा दत्तगुरुंचाच सांगावा आहे असं समज आणि निश्चिंत रहा.. !”
सगळं ऐकलं आणि मी पूर्णत: निश्चिंत झालो.
तिचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. मन शांत होतं पण… या सगळ्या अघटीतामागचं गूढ मात्र उकललं नव्हतंच. ते माझ्या मनातल्या दत्तमूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यात लपून अधिकच गहिरं होत चाललं होतं!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈