श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ४७ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र – ‘आपला… समीर… परत… आलाय… ‘ आरतीचा हा चार शब्दांचा निरोप निखळ समाधान देणारा असला तरीही हे आक्रीत घडलं असं यांची उकल मात्र झालेली नाहीय हे माझ्या गावीच नव्हतं. पंधरा वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर अगदी अकल्पितपणे ही उकल झाली आणि त्या क्षणीचा थरार अनुभवताना माझ्या मनातल्या ‘त्या’च्या पुढे मी मनोमन नतमस्तक झालो.. !!)
तो थरार कधी विसरुच शकणार नाही असाच होता! समीर नवीन बाळाच्या रुपात परत आलाय याच्यावर ध्यानीमनी नसताना पंधरा वर्षांनंतर अचानक शिक्कामोर्तब व्हावं आणि तेही तोवर मला पूर्णत: अनोळखी असणाऱ्या एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून हे अतर्क्यच होतं माझ्यासाठी.. !
ते सगळं जसं घडलं तसं आजही जिवंत आहे माझ्या मनात.. !
नकळतच बाळाचं नाव ठेवलं गेलं ते ‘समीर’ची सावली वाटावी असंच. ‘सलिल’! सलिलचा जन्म ऑगस्ट १९८० चा. आणि पुढे बराच काळ उलटून गेल्यानंतर जुलै १९९४ मधे एका अगदीच वेगळ्या अशा अस्थिरतेत माझ्या मनाची ओढाताण चालू असताना ‘समीर’ आणि ‘सलिल’ या दोघांमधील एक अतिशय घट्ट असा रेशीमधागा स्पष्टपणे जाणवून देणारा तो प्रसंग अगदी सहज योगायोगाने घडावा तसाच घडत गेला होता. तो जन्म आणि मृत्यू यांच्यामधल्या परस्परसंबंधांची उकल करणारा जसा, तसाच समीर आणि सलिल या दोघांमधल्या अलौकिक संबंधांची प्रचिती देत सप्टे. १९७३ मधे आम्हाला सोडून गेलेल्या आमच्या बाबांनी आम्हा मुलांवर धरलेल्या मायेच्या सावलीचा शांतवणारा स्पर्श करणाराही!!
ही गोष्ट आहे जून-जुलै १९९४ दरम्यानची. सलिल तेव्हा १४ वर्षांचा होता. सांगली(मुख्य) शाखेत ब्रॅंच मॅनेजर म्हणून मी कार्यरत होतो. इथे माझी तीन वर्षे पूर्ण होताहोताच नेमकं पुढच्या प्रमोशनचं प्रोसेस सुरु झालं. माझा इंटरव्ह्यू झाला आणि हायर ग्रेड प्रमोशनसाठी मी सिलेक्टही झालो. सुखद स्वप्नच वाटावं असं हे सगळं अचानक फारफार तर महिन्याभरांत घडून गेलं आणि सगळं सुरळीत होतंय असं वाटेपर्यंत अचानक ठेच लागावी तसा तो सगळा आनंद एकदम मलूलच होऊन गेला!
कारण पोस्टींग कुठे होईल ही उत्सुकता असली तरी माझ्या पौर्णिमेच्या नित्यनेमात अडसर येईल असं कांही घडणार नाही हा मनोमन विश्वास होता खरा, पण अनपेक्षितपणे तो विश्वास अनाठायीच ठरावा अशी कलाटणी मिळाली. प्रमोशनची आॅफर आली की ती आधी स्वीकारायची आणि तसं स्वीकारपत्र हेड ऑफिसला पाठवलं की मग पोस्टिंगची ऑर्डर यायची असंच प्रोसिजर असे. मला प्रमोशनचं ऑफर लेटर आलं आणि पाठोपाठ
‘ यावेळी प्रमोशन मिळालेल्या सर्वांचं ‘आऊट ऑफ स्टेट’ पोस्टिंग होणार ‘ अशी अनपेक्षित बातमीही. मेरीट लिस्ट मधे असणाऱ्यांची प्रमोशन पोस्टींग्ज प्रत्येकवेळी त्याच रिजनमधे आणि इतरांची मात्र ‘आऊट आॅफ स्टेट’ अशीच आजवरची प्रथा होती. त्याप्रमाणे आधीची माझी प्रमोशन पोस्टींग्ज सुदैवाने कोल्हापूर रिजनमधेच झालेली होती. पण यावेळी धोरणात्मक बदल होऊन सर्वच प्रमोशन पोस्टींग्ज ‘आऊट ऑफ स्टेट’ होतील असं ठरलं आणि त्यानुसार माझं पोस्टींग लखनौला होणार असल्याची बातमी आली!!
नोकरी म्हंटलं कीं आज ना उद्या असं होणारंच हे मनोमन स्वीकारण्याशिवाय पर्याय होताच कुठं? मी हे स्वीकारलं तरी माझे स्टाफ मेंबर्स मात्र ते स्वीकारु शकले नाहीत. मला आता प्रमोशन नाकारावे लागणार असं वाटून ते कांहीसे अस्वस्थ झाले.
तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी कस्टमर्सची गर्दी ओसरली तसे त्यातले कांहीजण माझ्या केबिनमधे आले. सर्वांच्या चेहऱ्यावरची नाराजी मला स्पष्ट दिसत होती. दर तीन वर्षांनी होणारी अधिकाऱ्यांची बदली हे खरंतर ठरुनच गेलेलं. पण निरोप देणाऱ्या न् घेणाऱ्या दोघांच्याही मनातलं दुःख हा आजवर अनेकदा घेतलेला अपरिहार्य अनुभव माझ्यासाठी अतिशय क्लेशकारकच असायचा. यावेळी तरी तो वेगळा कुठून असायला?
” साहेब,तुम्ही प्रमोशन अॅक्सेप्ट करणार नाहीये का?” एकानं विचारलं. वातावरणातलं गांभीर्य कमी करण्यासाठी मी हसलो.
” अॅक्सेप्ट करायला हवंच ना? नाकारायचं कशासाठी?” मी हसतंच विचारलं. पण त्या सर्वांना वेगळाच प्रश्न त्रास देत होता.
” पण तुम्ही लखनौला गेलात तर दर पौर्णिमेला नृ. वाडीला कसे येऊ शकणार?”
हा प्रश्न मलाच कसा नव्हता पडला? लखनौच्या पोस्टींगची बातमी आली न् पहिला विचार आला होता तो पुन्हा घरापासून इतक्या दूर जाण्याचाच. तोच विचार मनात ठाण मांडून बसलेला. आरतीच्याही मनाची आधीपासून तयारी व्हायला हवी म्हणून मी हे घरी फक्त तिलाच सांगितलं होतं. सलिलला आत्ताच नको सांगायला असंच आमचं ठरलं. पण मग त्यानंतर पुढचं सगळं नियोजन कसं करायचं यावरच आमचं बोलणं होतं राहिलं. जायचं हे जसं कांही आम्ही गृहितच धरलं होतं. खरंतर मी स्वीकारलेला नित्यनेम निर्विघ्नपणे पूर्ण व्हावा असं मलाही वाटायचंच कीं. असं असताना माझ्या सहकाऱ्यांना पडलेला हा प्रश्न माझ्या मनात कसा निर्माण झाला नाही? माझं एक मन या प्रश्नाचं शांतपणे उत्तर शोधत राहिलं. सारासार विचार केल्यानंतर त्याला गवसलेलं नेमकं उत्तर.. ‘जे होईल ते शांतपणे स्वीकारायचं!’.. हेच होतं!
मी त्या सर्वांना समोर बसवलं. मनात हळूहळू आकार घेऊ लागलेले विचार जमेल तसे त्यांच्यापर्यंत पोचवत राहिलो.
” मी प्रमोशन नाकारलं समजा, तरीही मॅनेजमेंट नियमानुसार आहे त्या
पोस्टवरही माझी ‘आऊट ऑफ स्टेट’ ट्रान्स्फर कधीही करू शकतेच की. जे व्हायचं तेच होणार असेल तर जे होईल ते नाकारुन कसं चालेल? मी नित्यनेमाचा संकल्प केला तेव्हा ‘आपली कुठेही,कधीही दूर बदली होऊ शकते हा विचार मनात माझ्या मनात आलाच नव्हता. तो नंतर आईने मला बोलून दाखवला, तेव्हा तिला मी जे सांगितलं होतं तेच आत्ताही सांगेन….
“माझा हा नित्यनेम म्हणजे मी केलेला नवस नाहीये. तो अतिशय श्रद्धेने केलेला एक संकल्प आहे. हातून सेवा घडावी एवढ्याच एका उद्देशाने केलेला एक संकल्प! माझ्याकडून दत्तमहाराजांना सेवा करून घ्यायची असेल तितकेच दिवस हा नित्यनेम निर्विघ्नपणे सुरू राहिल. त्यासाठी समजा मी प्रमोशन नाकारलं तरीही एखाद्या पौर्णिमेला आजारपणामुळे मी अंथरुणाला खिळून राहिलो किंवा इतरही कुठल्यातरी कारणाने अडसर येऊ शकतोच ना? त्यामुळे समोर येईल ते स्वीकारून पुढे जाणं हेच मला योग्य वाटतं. शेवटी ‘तो’ म्हणेल तसंच होईल हेच खरं!”
यात नाकारण्यासारखं कांही नव्हतं तरीही त्यापैकी कुणालाच ते स्वीकारताही येईना.
त्यांच्यापैकी अशोक जोशी न रहावून म्हणाले,
” साहेब, या रविवारी तुम्ही मिरजेला आमच्या घरी याल? “
” मी? येईन.. पण.. कां?कशाकरता?”
” साहेब, माझे काका पत्रिका बघतात. त्यांना मी आज घरी गेल्यावर सांगून ठेवतो. तुम्ही या नक्की.. “
मी विचारात पडलो. अशोक जोशींचा उद्देश प्रामाणिक असला तरी मला ते योग्य वाटेना.
” खरं सांगू कां जोशी? तुमच्या भावना मला समजतायत. पण यामुळे प्रश्न सुटणाराय कां? प्रमोशन आणि ट्रान्स्फर याबाबतची सेंट्रल ऑफिसची पॉलिसी माझ्या एकट्याच्या जन्मपत्रिकेवरुन ठरणार नाहीये ना? मग या वाटेने जायचंच कशाला? म्हणून नको. “
अशोक जोशी कांहीसे नाराज झाले.
” साहेब, माझे काका व्यवसाय म्हणून हे करत नाहीयेत. त्यांचा सखोल अभ्यास आहे. व्यासंगही. ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रिटायर झालेत. तेही दत्तभक्त आहेत. ते गरजूंना योग्य तो मार्ग दाखवतात फक्त. सल्ला देतात. त्याबद्दल कुणाकडूनही पैसे घेत नाहीत. तुम्हाला नाही पटलं, तर त्यांचं नका ऐकू. पण एकदा भेटायला काय हरकत आहे?”
जोशींच्या बोलण्यातली तळमळ मला जाणवली. त्यांना दुखवावंसं वाटेना.
” ठीक आहे. येईन मी. पण तुम्ही कशासाठी मला बोलवलंयत ते त्यांना सांगू मात्र नका. ते आपणहोऊन जे सांगायचं ते सांगू देत. ” मी म्हणालो. ऐकलं आणि जोशी कावरेबावरेच झाले. त्यांना काय बोलावं समजेचना.
” साहेब, मी.. त्यांना तुमची बदली लखनौला होणाराय हे आधीच सांगितलंय. पण म्हणून काय झालं? पत्रिका बघून त्यांचं ते ठरवू देत ना काय ते. ” जोशी म्हणाले.
मी जायचं ठरवलं. लखनौला होणाऱ्या बदलीपेक्षा अधिक धक्कादायक माझ्या पत्रिकेत दुसरं कांही नसणारंच आहे याबद्दल मला खात्री होतीच. पण…. ?
माझं तिथं जाणं हे ‘त्या’नंच ठरवून ठेवलेलं होतं हे मला लवकरच लख्खपणे जाणवणार होतं आणि मला तिथवर न्यायला अशोक जोशी हे फक्त एक निमित्त होते याचा प्रत्ययही येणार होता.. पण ते सगळं मी तिथे गेल्यानंतर.. ! तोवर मी स्वत:ही त्याबद्दल अनभिज्ञच होतो!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈