सौ.अंजली दिलिप गोखले
☆ विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-1☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆
नमस्कार.
ओळखलं का मला? इंग्रजांना ज्यांनी ठणकावून सांगितलं,” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच”
त्या सूर्यपुत्राची मी पत्नी. सत्यभामा .
आमच्या काळामध्ये पतीला आम्ही इकडची स्वारी असेच म्हणत होतो. इ.स. १८७१च्या वैशाख महिन्यात लग्न होऊन मी टिळकांच्या घरी आले. त्यावेळी ३कडची स्वारी होती पंधरा वर्षाचीआणि मी तर त्याहूनही लहान. गंगाधर पंतांच्या पत्नी, म्हणजे बाळ टिळकांची आई म्हणजेच माझ्या सासुबाई जाऊन पाच वर्षे झाली होती. त्यामुळे दापोली तालुक्यातून मी टिळकांच्या घरी लग्न करून आले आणि सत्यभामा झाले.
माझ्या माहेरची एक आठवणीतली गोष्ट सांगते.आमचं घर पैशाने खूप श्रीमंत नसलं तरी मनाची खूप श्रीमंती होती. एके दिवशी सकाळी दारावर एक भिक्षेकरी आला. कणगी तुन ओंजळभर तांदूळ घेऊन मी ते भिक्षेकऱ्याला घातले. त्याने तांदूळ घालताना खणकन आवाज ऐकला. म्हणून त्यांनी हात घालून पाहिले तो सोन्याची बांगडी. त्याने ती बाहेर काढली आणि म्हणाला, “अहो, ही सोन्याची बांगडी चुकून भिक्षेत पडली पहा. हे घ्या. नीट ठेवा.” ही गडबड एकू न माझे वडील आले आणि म्हणाले, “जे एकदा दिले ते परत घेण्याची आमची, आमच्या घराण्याची रीत नाही. तू ती घेऊन जा आणि सुखाने तिचा काय वाटेल तो उपयोग कर.”
तिकडे टिळकांकडे ही राहणी साधी होती. मी साधं लुगडं आणि साध्या कापडाचे झंपर वापरी. मी काही शिकले-सवरले नव्हते बरं !मला साधी अक्षरओळखही नव्हती.पण इकडची स्वारी खूप हुशार आहे,मोठी मोठी पुस्तके वाचते, एवढे मला माहिती होते. कॉलेज का काय म्हणतात, तिथे जाऊन ते वकील झाले, एवढे माझ्या कानावर आले होते.
आमच्या घरी भरपूर काम असे. उसंत म्हणून मिळायची नाही. तुम्हाला सांगते, मरेपर्यंत क्वचितच घराचा उंबरठा मी ओलांडला असेल. आमच्या घरातलं जेवण ही साध होतं. सकाळ संध्याकाळ होणारा चहा हीच तेवढी श्रीमंती होती.
इकडच्या स्वारीचे स्वतःचं सामान म्हणजे ड्रॉवर असलेलं डेस्क, दोन खुर्च्या आणि पुस्तकाचं कपाट. नाही म्हणायला त्यांची आराम खुर्ची त्यांना खूप प्रिय होती. आलेल्या लोकांशी बोलणं या आराम खुर्चीतच होई. वर्तमान पत्रांचा मजकूर ते स्वतः लिहीत नसत, तर ते या आराम खुर्चीतच लेख नीकाला सांगत. सांगताना मधून मधून सुपारी कातरून खात. फक्त महत्त्वाची पत्र ते स्वतः लिहीत.
आडकी त्यानं सुपारी कातरण्यात ही त्यांचं कौशल्य होत बर का!.. आत्ताच्या पिढीला अडकीता म्हणजे काय हाच प्रश्न पडायचा !
एकदा सुपारी हातात घेतली, की इतक्या सुबकपणे कातरत, ती पूर्ण कातरून झाल्यावर ही अख्ख्या सुपारी प्रमाणे त्यांच्या हातात असे.
आम्हाला दोघांनाही मधुमेहाची व्याधी जडली होती. त्यांना करावा लागणारा प्रवास, दगदग, मानसिक त्रास, तुरुंगवास यामुळे माझे मन सतत चिंतेने ग्रासलेले असे. तुरुंगामध्ये त्यांना करावे लागणारे कष्ट, निकृष्ट दर्जाचे अन्न याबद्दल कोणी माझ्यासमोर बोलत नसत पण मला न सांगता हि ते समजत असे.
टिळक अत्यंत बुद्धिमान, तेजस्वी विचारांचे आणि शब्दाला जागणारे होते. इतके की मित्राला दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी कारण नसताना त्यांना तुरुंगवास भोगावा लागला त्यांनी अपार कष्ट झेलले. किती पैसा, वेळ, दगदग, धावपळ, मानहानी आणि अपमान झाले त्याला काही गणतीच नव्हती.
आमची मुले ही टिळकां प्रमाणेच बुद्धिमान आणि प्रखर विचारांची होती. मुले आपल्या वडिलांबरोबर धिटपणे बोलत. एकदा मुलीने इतर मुलींप्रमाणे झगझगीत कापडाच्या परकराचा हट्ट धरला.मात्र टिळकांनी ठामपणे नकार दिला.एकदा मुलांना त्यांनी संध्या केली का म्हणून विचारले.त्यांचाच मुलगा! त्याने विचारले, “तुम्ही कुठे करता रोज संध्या?”तेव्हा टिळक त्याला म्हणाले,” मी वेद पठण करतो. त्यामुळे संधेची जरूरी नाही.”.
© सौ.अंजली दिलिप गोखले
मो 8482939011
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈