☆ विविधा ☆ दृष्टीकोन ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆
दृष्टिकोन ही एक अशी गोष्ट आहे की, जी प्रत्येक माणसागणिक बदलत जाते. पण ती सकारात्मक असण फार आवश्यक आहे. मग ती एखाद्या माणसाकडे बघण्याची असो किंवा घटनेकडे. प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघण्याचा दृष्टीकोन असला पाहिजे. एखादे संकट जरी आले, तरी तेही आपल्याला खूप काही शिकवून गेले असा दृष्टीकोन पाहिजे, नाहीतर त्यावर रडत कुढत बसुन काहीच साध्य होत नाही. काहीजण प्रत्येक गोष्ट सकारात्मकपणे घेऊन पुढे जातात तर काही प्रत्येक गोष्टीतच रडत बसतात. काहीजणांना अर्धा ग्लास भरलेला दिसेतो तर तोच काहींना अर्धा रिकामा.
तिर्हाईत माणसांकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा प्रत्येकाचा वेगवेगळा. एखाद्याला एखादी व्यक्ति खूप आवडते, दुसर्याला तीच व्यक्ति आजिबात आवडत नसते. मला एक कळत नाही की, एखाद्याशी चार वाक्य बोलली की लगेच आपण त्याच्या बद्दल मनात एक चित्र म्हणजेच आपला त्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टीकोन तयार करून टाकतो. आपल्याला सर्वसाधारण पणे अस वाटत असत की I’m the best judge आणि आपण कोणत्याही व्यक्तीला आगदी पंधरा वीस मिनटात पूर्ण ओळखू शकू. पंधरा वीस वर्ष संसार करूनही जिथे आपण आपल्या जोडीदारला ओळखू शकत नाही तिथे तिर्हाईत माणसाला आपण पंधरा मिनटात ओळखू शकतो असं आपण ठामपणे कसं काय सांगू शकतो ह्याच मला नवल वाटते.
मी एवढेच म्हणेन की पटकन कोणाबद्दल दृष्टिकोन बनवू नका मग तो चांगला असेल किंवा वाईट त्याच्या मनात खोल शिरा, काही वेळा जे वर दिसत नाही, ते खोल दडलेले असते. जिभेवर साखर पेरून बोलणारा माणूस आतून कारल्या सारख्या कडू असू शकतो किंवा तलवारी सारखी जिभेला धार असणारा माणूस आतून मृदू.
माणूस सोडा एखाद्या निर्जीव वस्तूकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा वेगवेगळा असतो. एकच वस्तू एखाद्याला विलक्षण आवडते, मोहून जाते हवीहवीशी वाटते तर तीच वस्तू दुसर्याला नको नकोशी, कुरूप तिटकारा आणणारी वाटू शकते.
एखाद्या फुलाची सुंदरता एखाद्याला मोहरून टाकेल तर दुसर्याला नाही. पहाटेच्या रम्य वेळी पक्ष्यांची किलबिलाट काहीजणांचा सुखकर वाटेल तर काहींना त्याच किलबिलाटीची कटकट वाटेल.
दृष्टिकोन दृष्टीकोन म्हणजे काय हो? आपणच आपल्या विचारांना दाखवलेली दिशा. आपल्याच मनाचे विचार एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे. काही वेळा आपण ज्याचा वेग इतका ठेवतो की आपल्या नकळत समोरच्या बद्दल, एक आपले मत बनवून बसतो.
प्रेक्षकांना सर्कशीत काम करणारा जोकर हा केवळ विदुषक असतो, सगळ्यांना हसवणारा पण त्याच्या दृष्टीकोनातून मात्र तो एक कलाकार असतो आणि आपला प्रत्येक कार्यक्रम उत्तम झाला पाहिजे असा असतो त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. लोक तुमच्या बद्दल काय विचार करतात याचा विचार करू नका सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे जात रहा.
शेवटी एवढचं म्हणेन की कदाचित माझा हा लेख वाचून तुमचा प्रत्येकाचा माझ्याकडे बघण्याचा किंवा माझ्या लिखाण बद्दलचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो हे नक्की?
© सौ. श्रेया सुनील दिवेकर
मो 9423566278
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈