सौ ज्योती विलास जोशी
☆ विविधा ☆ दोन क्षण ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆
(कवी कुसुमाग्रजांच्या दोन चारोळयांवर आधारित ललितबंध)
गतकाळाच्या काही कटू काही गोड आठवणींचं स्मरण वारंवार होणं हे स्वाभाविकच आहे. गेला क्षण पुन्हा येत नाही ही गोष्ट शाश्वत असली तरी गोड क्षणांच्या स्मरणाने मन मोहरून जातं हे नक्की !
कटू क्षणांच्या आठवणी पुन्हा एकवार काळीज हेलावून सोडतात, पण त्या क्षणांसोबतच आपण आपल्या अनुभवाची शिदोरी बांधलेली असते, हे आपण विसरत नाही.
प्रत्येकाचं आयुष्य कधी इंद्रधनुष्यासारखं अनेकविध रंगांनी रंगून जातं तर कधी त्याच आयुष्यावर काळया मेघांचं सावट येतं.सुखाला दुःखाची झालर असते आणि दुःखाला सुखाची आस !
‘प्रेझेंट इज प्रेझेंट’ हे स्वीकारत चाललेलं आयुष्य एकाएकी ढवळून निघतं.एखादा दिवस असा उभा ठाकतो की आपण भूतकाळाचा चलत चित्रपटच पाहतो आहोत की काय अशी शंका यायला लागते. स्वतःच स्वतःला चिमटा काढून जागं करावं लागतं. हे खरंच घडतंय का? अशी शंका येत असतानाच….
वास्तव एखाद्या प्रेझेंट सारखं प्रेझेंट मध्ये आलेलं असतं.त्या स्वप्नवत घटनेला स्वीकारायला लागतं. प्रियजनांच्या याच भावनेतून कुसुमाग्रजांना हया दोन चारोळ्या सुचल्या असाव्यात….
सहज जाता जाता मला गवसलेल्या त्यांच्या या दोन चारोळ्या म्हणजे दोन क्षण आहेत असं मला जाणवलं.
पहिली चारोळी….
भेट जाहली पहिली तेव्हा
सांज पेटली होती
रिमझिम वर्षेतून लालसा
लाल दाटली होती.
पहिला क्षण पहिल्या भेटीचा! निरव, सुंदर, शांत अशी सांज ! या सांजवेळी झालेली ही पहिली भेट. ‘दोनो तरफ आग बराबर लगी है!’ असं वर्णन व्हावं असा तो क्षण…त्या क्षणाची आठवण तितकीच धगधगीत!
रिमझिम बरसणाऱ्या वर्षेच्या आगमनानंतर तर त्या दोघांमधील एका अनामिक ओढीने ही भावना अधिकच दाटून आली. कुसुमाग्रजांनी ‘लाल लालसा’ या शब्दद्वयीतून ती व्यक्त केली आहे.केवळ अप्रतिम!!
स्वप्नात रंगलेला क्षण होता तो!
दुसरा क्षण दुसऱ्या चारोळीतला…
काळ लोटला आज भेटता
नदी आटली होती
ओठावर उपचाराची
सभा दाटली होती
हा क्षण होता….पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतरचा, वर्तमानातला, आजचा, आत्ताचा…..
अकस्मात दोघेही एकमेकांसमोर आले पण….
आंतरिक सुखाच्या अपूर्णतेची अस्पष्टशी एकही हाक त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यातून आल्याचा गंध या वातावरणात नव्हता. तेव्हाचा तो भावनांचा आवेग दोघांनाही जाणवला नाही. ‘नदी आटली होती’ या ओळीतून तो उद्धृत झाला आहे.
त्यांची स्मरण भेट त्यांना वास्तवाचं भान देत होती. ‘काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही अशी दोघांचीही अवस्था ! नीरव शांततेत दोघेही निशब्द!!
ओळख असूनही अनोळखी असल्याचा भास होत होता त्यांना !उपचार म्हणून बोलणं इतकंच उरलं होतं. औपचारिक शब्दच दोघांच्या तोंडून येत होते.
वास्तवाचं भान असणारा क्षण होता तो!
माझ्या वाचन प्रवासाच्या सुरम्य वाटेवर स्वप्न आणि वास्तवाचं भान देणाऱ्या या चारोळ्या सांडल्या होत्या.
प्राजक्ता सारख्या त्या मी वेचल्या आणि माझी रिती ओंजळ मी भरुन घेतली. फुलं सांडून रितं होणाऱ्या त्या प्राजक्ताचे मी आभार मानले. तो प्राजक्त म्हणजे अर्थात कवी ‘कुसुमाग्रज’ पुन्हा फुलांनी डवरुन पुन्हा माझी ओंजळ भरायला तयार असणारा असा तो प्राजक्त!….
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
मो 9822553857
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈