सौ. राधिका भांडारकर
☆ जीवनरंग ☆ दाखला – भाग – 1 ☆ सौ. राधिका भांडारकर ☆
…….सकाळपासून तानीबाईची लगबग चालू होती…
“लवकर लवकर आवराया हवं.”
नळाला पाणी आलं, तसं पटकन् अंग तोंड धुतलं.
रात्रीची खरकटी भांडी घासली. लुगडं धुतलं. झाडपूस केली. रात्रीचं कोरडं बेसन ऊरलं होतं. एक भाकर थापली अन् खाऊन घेतलं. एकटा जीव. शरीर थकलंय्. पण जगणं आहेच ना?
कालच तांबड्या येऊन गेला. म्हणत होता, “म्हातारे काळजी नको करू. रेशनकार्ड हायना तुझ्याकडे?
मग ग्रामपंचायतीत जा… तिथे दाखव. तू निराधार आहेस.
म्हातारी आहेस.. तुला महिन्याच्या महिन्याला पैकं मिळेल.
नवं सरकार चांगलं आहे. गरीबांचं वाली हाय. निराधार, म्हातार्यांसाठी कसलीसी योजना हाय म्हणे… तुला महिन्याला सहाशे रुपये मिळतील… रग्गड हाय की.. तुला रोजचा घास मिळेल. औषधपाण्यालाही दिडक्या राहतील….. ग्रामपंचायत फार लांब नव्हती.. तरी पायीपायी जायाचं.. म्हणून ऊन्हं चढायच्या आत निघाया हवं… रात्रीच तिनं झोपण्यापूर्वी रेशनकार्ड शोधून ठेवलं होतं
तिला ना लिहीता येत होतं ना वाचता….
खूप वर्षापूर्वी कधीतरी असंच, कुणा पक्ष्याच्या कार्यकर्त्याने काढून दिलं होतं. त्यांत काय लिहीलं होतं, तेही तानीबाईला माहीत नव्हतं… त्या कार्यकर्त्याने तिला विचारले होते,
“म्हातारे, कोणकोण राहातं घरात?”
तानीबाईने सांगितले होते, “मी अन् मोतीराम…..”
निघताना लुगड्याच्या केळ्यात तिनं एक छोटंसं कापडी पाकीट ठेवलं. त्यात काही सुटी नाणी होती.
चहापाण्यापुरती…… एका कापडी पिशवीत तिनं रेशनकार्ड गुंडाळलं आणि ते हातात घट्ट धरुन ती निघाली…
रस्त्यांत एक दोन जण भेटले.
“कुठं निघालीस गं म्हातारे…?” म्हणून चौकशीही केली. ऊत्तर न देता ती चालतच राह्यली.
ग्रामपंचायतीत ती पोहचली तेव्हां तिला तिथे गर्दी दिसली. बरीच रांग होती. एकदोन डोकी ओळखीचीही होती. पण तानी बाईला कुणाशीच बोलायचं नव्हतं….
एक छोटं टेबल होतं… भींतीवर गांधीजींचा फोटो होता.
आणखीही कुणाकुणाचे फोटो होते. काहीबाही लिहीलेलंही होतं… टेबलापाशी दोन माणसंही बसली होती. आणि ते समोरच्या चोपडीत काही लिहुन घेत होते.
रांगेतला एकेक माणूस पुढे सरकत होता… प्रत्येकाचं वेगळं काम… वेगळी कागदपत्रं…
तानीबाई गपगुमान रांगेत उभी राहिली. तिचा नंबर आल्यावर टेबलाजवळच्या माणसानं विचारलं,
“बोला आजी…..”
क्रमश:….
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈