☆ विविधा ☆ दानयज्ञ ☆ सौ. वीणा रारावीकर ☆ 

अधिक “अश्विन” सुरू झाला आहे. अधिक महिन्यात दानधर्म करावा असे सांगितले जाते. इतकेच नव्हे, तर अधिक महिन्यातील कोणत्या तिथीला काय दान करावे, याचे नियमही असल्याचे सांगितले जाते. या कालावधीत दान केलेल्या एका रुपायाचे पुण्यफळ दसपटीने मिळते, असेही सांगितले जाते.

संस्कृतमधील एक श्लोक सर्वांनाच परिचित आहे.

शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पण्डितः ।

वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वा न वा ॥

शूर माणूस शंभरात एक, पण्डित हजार मध्ये एक, वक्ता दहा हजार मध्ये एक परंतु दाता मिळणे मुश्किल असते.

भारतीय संस्कृती, परंपरा, संस्कार यांमध्ये दानाला अधिक महत्त्व आहे. अगदी रामायण, महाभारत काळापासून दानाचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे. आजही आपण “दानशूर असावे ते  कर्णासारखे” असेच म्हणत असतो.

दान हे सत्पात्री सुध्दा असले पाहिजे. सत्पात्री दान म्हणजे जे दान आपण देत आहोत ते योग्य व्यक्तीला दिले गेले पाहिजे. जी गोष्ट देत आहोत ती गोष्ट घेण्याची त्याची पात्रता पाहिजे. ज्या वस्तूची ज्या माणसाला गरज आहे, त्याचवेळी ती दिली गेली पाहिजे.

म्हणून दान म्हणजे धन किंवा संपत्ती या स्वरुपातच दिले गेले पाहिजे असे काही नाही. श्रीमंतांकडे देण्यासाठी धनदौलत असेल, तर एखाद्या कलाकाराकडे त्याची कला तर गरीब शिक्षकाकडे त्याचे ज्ञान. रुग्णसेवेला समर्पित डाॅक्टर आणि देशसेवेला अर्पण झालेला सैनिक आपल्या जीवाची आहुती या “दान” यज्ञात करतच असतात. सध्याच्या कोव्हीडच्या महामारीत अनेक लोक आपापल्या परिने दान करत आहेत. एकमेकांना मदत करत आहेत.

आपल्यासारखे सामान्य लोक रक्तदान करतात. मरणोत्तर नेत्रदान करतात. यापेक्षा पुढे जाऊन काही लोक अवयवदान किंवा देहदान करतात. देहदान आपल्याकडे सर्वात प्रथम कोणी केले असेल तर दधीची ऋषींनी. गीतेतील श्लोकाप्रमाणे आत्मा अमर, अविनाशी  असतो.

“नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।। ”

आत्म्याचे कोणत्याही शस्त्राने टुकडे करता येत नाहीत. अग्निने तो जळत नाही किंवा पाणी त्याला ओला करू शकत नाही. वायू त्याला शोषून घेऊ शकत नाही. माणसाचा मृत्यू झाला की आत्मा एक शरिर सोडून दुसऱ्या शरिरात प्रवेश करतो. मग हे मृत शरिर सुध्दा कोणाच्यातरी उपयोगी पडलं तर किती चांगली गोष्ट आहे.

आपले लाडके कवीवर्य विं.दा. करंदीकर यांनी दानाचे महत्व सांगणारी कविता लिहिली.

“देणार्‍याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणार्‍याचे हात घ्यावे”

त्यांनी स्वतःसुध्दा देहदान करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. नवीन चांगले डाॅक्टर आपल्याला हवे असतील तर त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक अशी ही गोष्ट आहे. तसेच अवयवदान, त्वचादान यांनी आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो.

आपल्याकडे धार्मिक कार्यातदेखील दान करतात. स्वतःच्या लग्नाच्या पत्रिकेत “अवयवदान, नेत्रदान फाॅर्म भरा, हाच तुमचा आहेर” असे एक-दोन लोकांनी छापले होते. आणि त्याप्रमाणे लग्नसमांरभात संध्याकाळी येणाऱ्या मंडळींना फाॅर्म भरण्यासाठी सोय केली केली होती.

अशा दानयज्ञात आपण आपले नेत्रदान, देहदान, अवयवदान याचे फाॅर्म भरून आहुती टाकली, तर याचे पुण्यफळ हजार पटींनी जास्त मिळेल, असे मला वाटते.

 

© सौ. वीणा आशुतोष रारावीकर

लोअर परेल, मुंबई

(ता.क. – माझ्या आई-वडील दोघांचेही २०१२ साली देहदान केले आहे.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

एक अनोखा दानयज्ञ.देहदानाचा निर्णय कौतुकास्पद.