सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ दत्त दर्शना जायाचं,जायाचं… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
एखादी जखम वा पुटकुळी ही लगेचच ईलाज केला तर बरी होते अन्यथा ती वाढली, चिघळली तर ब-याच कालावधीनंतर बरी होऊन मागे काही तरी खूण वा व्रण ठेऊनच जाते. थोडक्यात काय तर तिचं अस्तित्व हे मागे शिल्लक उरतचं.
तसचं काहीसं मनाचं. मनाच्या तारा जुळल्या की जुळल्या,विचार पटले की पटले. ह्यावरून एक गोष्ट आठवली. दोन भाऊ वा दोन मित्र ह्या तश्या वेगवेगळ्या विचारसरणीच्या दोन व्यक्ती असतात. आता सुरवातीपासूनच भिन्न विचारसरणी,वेगवेगळे पंथ,निरनिराळ्या चुली असल्या की ही सुरवातीची भिन्न मतं ही टोकांच्या भुमिकेकडून मार्गक्रमण करत करत दोन ध्रुवांवर जाऊन पोहोचतात. आता ह्यापैकी कुणीही एकजण मऊमातीचा,नरमाईचा असला तर प्रकरण न चिघळता आपापल्या मार्गाने शांत वाटचाल सुरू राहाते. परंतु जर दोघंही टोकांच्या विरोधी विचारणीसरणीचे,वेगवेगळ्या चुली मांडणारे असले तर मग अगदी सहजसाध्या एखाद्या वाक्याचा पण विपर्यास करण्याची संधी दोघांपैकी एकही जण सोडतं नसतं. कधीकधी माघारं घेणं,नमतं घेणं पण खूप फायद्याचं वा सुखाचं असतं हे त्या दोघांच्या गावीही नसतं. बरं हे करतांना ह्या भावांच्या कुटूंबियांचं वा ह्या मित्रांच्या जवळच्या लोकांच नुकसान होतयं ह्याच्याशी जणू ह्यांना काही देणघेणचं नसतं, म्हणजेच काय तर परतपरत हे चक्र स्वार्थासाठी ईगोपाशी येऊनच ठेपतं.
आता जवळजवळ ह्यांच्या स्वभावांची आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची सगळ्यांना मुळी सवयच झाली असते. परंतु ही परिस्थिती जेव्हा हितचिंतकांना डोईजड होते तेव्हा मग कुठे जरा फटफटतं आणि ती यंत्रणा खडबडून जागी होते. मग नेहमीप्रमाणेच दिलजमाई करणाऱ्या मंडळींना तडकाफडकी पाचारण करुन त्यावर तोडगा काढण्यासाठी सांगितल् जातं. अर्थातच ही तोडगा काढणारी मंडळी, दिलजमाई करुन देणारी मंडळी ही कोणाच्या तरी आदेशानुसार, कुठल्या तरी विशिष्ट हेतू मनात धरुनच कामाला लागतात. त्यांना संपूर्ण विचाराधारा बदलवून कायमची दिलजमाई करायची नसते तर तात्पुरत्या डागडुजी सारखा सध्याचे संकट टाळण्यासाठी, आपलं गाडं निर्वेधपणे,सुरळीत चालण्यासाठी तात्पुरती का होईना पण तातडीनं बायपास करायची असते. ह्या दिलजमाई चा अर्थ अजिबातच स्वतःची मतं,विचार बदलविणे असा नसतोच ती एक तत्कालीन आपद्स्थितीतील तडजोड असते. असो एका छोट्या जखमेवरुन ही गोष्ट आठवली. अशी ही दिलजमाई!
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈