श्री अरविंद लिमये
विविधा
☆ दुरंगी… ☆ श्री अरविंद लिमये ☆
माणूस सहज दिसतो, जाणवतो तसाच असतो असं नाही.तो खऱ्या अर्थाने समजतो ते दीर्घ सहवासानंतरच.माणसाचं हे वैशिष्ट्य कांही अपवादात्मक शब्दांमधेही जाणवतं.दाद हा असाच एक शब्द.हा शब्द ऐकताच त्याचा ‘उत्स्फुर्त प्रतिक्रिया ‘ हा आपल्या मनाला भावलेला अर्थच चटकन् जाणवतो.पण ‘दाद’ या शब्दाचा पैस असा एका अर्थाच्या मर्यादेत मावणारा नाहीय.
एखादी चांगली गोष्ट मनाला स्पर्शून गेली की त्या स्पर्शाची नकळत उमटणारी प्रतिक्रिया म्हणजे ‘दाद’ ! ही उस्फुर्त प्रतिक्रिया व्यक्त करणे म्हणजे ‘दाद’ देणे.ही दाद म्हणजे ‘ग्रेट’,’मस्तच’,’वाह..क्या बात है..’ यासारखे मनाच्या तळातून उमटलेले तत्पर उद्गार असतील,किंवा नकळत वाजलेल्या टाळ्याही असतील.
क्वचित कधी एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दलची आपली सकारात्मक प्रतिक्रिया उघडपणे सहज व्यक्त न करणारेच बरेच जण असतात.त्यांची अंत:प्रेरणा तेवढी सशक्त नसल्यामुळेही असेल कदाचित,पण त्यांना व्यक्त होण्यासाठी बाह्यप्रेरणेची गरज लागते.एखादं भाषण ऐकताना किंवा नाटक बघताना मनाला स्पर्शून गेलेल्या एखाद्या वाक्यानंतर किंवा उत्कट प्रसंगादरम्यान क्षणिक कां होईना शांतता पसरते.लगेच टाळ्यांचा आवाज येत नाही.मग क्षणार्धात कुणी दोन चार जणांनी टाळ्या वाजवल्याचा आवाज येताक्षणी त्याने प्रेरित झालेल्या असंख्य प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट सुरु होतो.’ दाद ‘ या शब्दाला ती देण्यासाठी अशी ‘प्रतिक्षा’ अपेक्षित नाहीय. ‘उत्फुर्तपणा’ हा या शब्दात मुरलेला अविभाज्य घटकच आहे.
‘दाद’ हा कांही कौतुक किंवा शाबासकी या शब्दांचा समानार्थी, पर्यायी शब्द नाहीय.तरीही कौतुकाने पाठीवर दिलेली शाबासकी जसा ती मिळवणाऱ्याला आनंद, प्रोत्साहन,समाधान देते तसाच आनंद,समाधान न् प्रोत्साहन उत्फुर्तपणे दिली गेलेली दादही देते.आणि देणारा आणि घेणारा दोघांनाही सकारात्मक उर्जा देणारी दादतर दाद या शब्दाला अधिकच अर्थपूर्ण बनवते. ‘कौतुक’ आणि ‘दाद’ या दोन्ही शब्दा़ंत आणखी एक साम्य आहे. सतत होणाऱ्या कौतुकाची जशी चटक लागते,तशीच एखाद्या कलाकाराला ठराविक वेळी मिळणारी ‘दाद’ इतकी सवयीची होऊन गेलेली असते की एखाद्या प्रयोगांत ‘त्या’ क्षणी, त्या ठराविक प्रसंगात किंवा त्या ठराविक वाक्याला टाळ्या मिळाल्या नाहीत तर कांहीतरी हरवल्यासारखा तो कलाकार अस्वस्थ होऊन त्या भूमिकेतला ताल न् तोल हरवून बसल्याची उदाहरणेही आहेत.
मोकळेपणाने एखाद्याचे कौतुक करण्यासाठी मन मोठे असावे लागते हे खरे,पण दाद देण्यासाठी फक्त त्या क्षणकाळापुरता स्वत:चाच विसर पडणे हेच अपेक्षित असते.आपलं ‘मी’पण त्या क्षणापुरतं कां होईना गळून जातं तेव्हाच आपल्याकडून उमटणारी प्रतिक्रिया ‘उत्स्फुर्त’ असू शकते. आणि हेच ‘दाद’ या शब्दाला अपेक्षित असते.
‘दाद’ या शब्दाला मी ‘दुरंगी’ म्हणतो ते एका वेगळ्याच कारणाने.या शब्दाचं परस्पर विरुद्ध असं दुसरंही एक रुप आहे.आत्तापर्यंत वर उल्लेखित विवेचन वाचले की ‘दाद’ ही द्यायची असते असेच वाटेल.पण कांहीबाबतीत ‘दाद’ ही मागावीही लागते.स्वत:वर अन्याय होतो तेव्हा त्याविरुध्द तक्रार केली जाते ते एक प्रकारचे ‘दाद’ मागणेच असते.दाद मागितली तरी न्याय मिळतोच असे नाही पण न्याय मिळण्यासाठी दाद मागावीच लागते असं विरोधाभासी वास्तव ‘दाद’ या शब्दांत सामावलेलं आहे.
दाद’ या शब्दाचे हे पूर्णत: वेगळे दोन्ही अर्थरंग मात्र अर्थपूर्ण आहेत एवढे खरे.अशा विविधरंगी अर्थपूर्ण शब्दांमुळे अधिकच खुलणाऱ्या भाषासौंदर्याला म्हणूनच मनापासून दाद द्यावीशी वाटते.
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
[…] Source link […]