सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ दान… दृष्टीचे 👁️ ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
(१० जून..आंतरराष्ट्रीय दृष्टीदान दिनानिमित्त)
नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या माध्यमातून लोकांमध्ये नेत्रदानाची जनजागृती केली जाते.
नेत्रदानाचे महत्व या बद्दलची जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे, हे दृष्टीदिनाचे उद्दिष्ट आहे. विकासशील देशांमध्ये प्रमुख सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी अंधत्व ही मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि आणि अंधत्वच्या मुख्य कारणांपैकी आहे.
कुठलही दानं हे उत्स्फूर्तपणे करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यांना काही देऊ करतो त्या गोष्टींची आवश्यकता, गरज ही समोरील व्यक्तीला हवी. तुमच्याकडे अतिरिक्त असणाऱ्या गोष्टी दुसऱ्या ला फारशी गरज नसतांना देऊ करणे हे दान ह्या परिभाषे खाली नक्कीच येत नाही हे देणा-यांनी आवर्जून लक्षात ठेवावे.
नुकत्याच उमलू लागलेल्या आमच्या वयात “धनवान”ह्या चित्रपटातील “ये आँखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते है”हे गाणे किंवा “आँखोंही आँखोमे ईशारा हो गया,बैठे बैठे जिने का सहारा हो गया”ह्यासारखी अवीट गोडीची अविस्मरणीय गाणी दिसण्याच्याही पलीकडील नजरेच,दृष्टी चं महत्व आम्हाला सांगू लागली. खरचं सगळ्या जगाची,ज्ञानाची, माहिताची ओळख पटविण्याचं काम हे डोळेच तर करतात. लहानसं इटुकलं पिटुकलं बाळ सुद्धा जन्म झाल्याबरोबर आपल्या मिचमिच्या डोळ्यांनी उजेडाचा क्षणभर त्रास सहन करीत अवतीभवतिच हे जग बघायला सुरवात करतं. मग हळुहळू हे डोळे आपल्याला नुसतीच नजर, दृष्टी देतात असं नाही तर सभोवतालचे ज्ञान मिळवित एक नवा दृष्टिकोन पण देतात.
हे डोळेच तर आपल्याला नवनवीन संकल्पना सहज समजवायला मदत करतात , हे डोळेच आपल्याला नवनवीन क्षेत्रात प्रगती करायला मदत करतात, हे डोळेच आपल्याला ह्या आणाभाका, कस्मेवादे निभवायला शिकवितात. हे डोळेच आपल्याला परस्परांची ओळख पटवायला शिकवितात. त्याचबरोबर ह्या डोळ्यांनी स्वतःला कसं ओळखावं हे पण शिकवितात. ह्या डोळ्यांमध्येच आपल्याला माया,ममता,प्रेम दिसून येतं,जीवन खूप सुंदर आहे ह्याची ग्वाही पटते, तर कधीकधी ह्या डोळ्यांमध्येच आपल्याला चीड, राग,संताप दिसून आल्याने आपलं नेमकं कुठं, काय, किती चुकलं ते आपण शोधायला लागतो. ह्य डोळ्यां मध्येच कधी आपल्याला वासनेची झलक आढळून आल्यास आपण लगेच सतर्क होतो. खरोखरच हे डोळे आपल्याला सगळी ओळखं पटवून देऊन जगात सक्षमपणे जगणं शिकवितातं.
आपल्याला निरामय, अव्यंग,सुदृढ शरीर नशीबाने देवाने दिले तर आपल्याला त्या अवयवांच्या किंमतीचा अंदाजच लागत नाही. ज्या कुणाजवळ ह्यातील एखाद्या अवयवाचा जरी अभाव असेल तर त्यालाच त्याच्या खरी किंमत ही कळते.आजकाल बरीच जनजागृती झाल्याने, त्याचं महत्त्व पटल्याने लोक आजकाल अवयवदानाचा त्यातल्यात्यात नेत्रदानाचा संकल्प सोडतात.
मी माझ्यापुरती तरी नेत्रदानाची व्याख्या बदलली आहे. मी ह्याला नेत्रदान न म्हणता नेत्रभेट म्हणते. “दान दिले” ह्या संकल्पनेपेक्षा “भेट दिली”ही संकल्पना वापरल्याने माणसासाठी जास्त घातक असलेल्या “मी”पणा किंवा “अंह”चा स्पर्श होत नाही, शिवाय दान ह्याचा अर्थ तुम्हाला कामी असतांना, गरज असतांना सुद्धा तुम्ही ते दुस-याला दिले तर त्या त्यागाला दान म्हणणं उचित ठरेल. परंतु नेत्रदान तर आपण आपला शेवटला श्वास सोडल्यावर, त्यांची आपल्याला गरज संपल्यावर दुसऱ्या ला देतो म्हणून नेत्रभेट हे नाव जास्त समर्पक असं मला वाटतं.
त्या ईश्ववराची लीला पण अगाध असते बरं का,
एखादा अवयव नसलेल्या व्यक्तीत त्याची उणीव,कमतरता भरून काढायला पर्यायी ईश्वराने दुसरी एखादी शक्ती त्याला खास म्हणून दिलेली असते. त्यामुळे डोळे नसून सुद्धा दया, प्रेम,कणव, संस्कार, कृतज्ञता,समजूतदारपणा, सुसंस्कृतपणा ह्या बाबतीत अग्रेसर असलेल्या अंध व्यक्ती आपल्या सभोवती सहजतेने, विनातक्रार वावरतांना आढळतात.
आजच्या दिनी जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदानाचा संकल्प सोडून अंधांना दृष्टी देण्याचं मोलाचं कार्य करावं एवढचं मी म्हणेन.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈