सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ विविधा ☆ दीप -पूजन… ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
आज आषाढ अमावस्या! दीपपूजन! हिंदू धर्मात आपल्या परंपरा निसर्गाशी इतक्या छान जोडलेल्या आहेत की आपण आपोआपच निसर्गाशी एकरूप होतो! मृग नक्षत्रापासून सुरू झालेला पाऊस आषाढ महिन्यात स्थिरावलेला असतो. सगळीकडे सस्यशामल धरती नजरेस दिसत असते, त्यामुळे वातावरणात एक प्रकारचा उल्हास निर्माण होतो. काळोखाच्या रात्री जाऊन श्रावणाची झिमझिमणारी पहाट उद्यापासून सुरू होईल! कोरोनाच्या काळ्या छायेखाली सर्व देश चिंताक्रांत असताना आरोग्याची पहाट सुरू व्हावी म्हणून मोदीजींनी दीपोत्सव साजरा केला होता! नऊ मे रोजी रात्री पणत्या, मेणबत्ती, तसेच विविध प्रकारचे दिवे लावून एकात्मतेचा संदेश देण्यासाठी माननीय मोदीजींनी आवाहन केले होते. भारतीयांची मूळ मानसिकता ही श्रद्धेची आहे.
“तमसो मा ज्योतिर्गमय” अशी प्रार्थना करून हा अंधकार जाऊन प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला बळ मिळू दे, ही या दीपोत्सवातील मुख्य भावना असते. त्यानिमित्ताने आपण दिव्यांना पुन्हा उजाळा देतो. पणती, समई, लामणदिवे, दीपमाळ अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रकाशाची प्रार्थना करतो.. हे मनोभावे केलेले पूजन आपल्याला मार्गदर्शक होणार असते. त्यानंतर येणारा श्रावण महिना सणांची सुरुवात करतच येतो.
माझा नातू ,तेजस लहान असताना मी त्याच्या शाळेत बरेच वेळा जात असे. त्यांच्या शाळेत ” दीप अमावस्या” हा सण म्हणून साजरा करण्यात येत असे. शाळेच्या प्रवेशद्वारापासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांची आरास केलेली असे. सर्व छोटी छोटी मुले त्या कामासाठी मदत करत असत. पूर्वीच्या काळापासून वापरात असलेल्या समया,झुंबरे, विविध प्रकारचे दिवे तसेच युद्धाच्या वेळी वापरण्यात येणारे पलिते, पेशवे कालीन दिवे, अशा सर्व प्रकारच्या दिव्यांची माहिती दिली जात असे. सगळीकडे वातावरण दिव्याच्या तेजात उजळून निघे. एखादा वर्ग फक्त अशा विविध प्रकारच्या पेटविलेल्या दिव्यांनी उजळलेला असे.तिथे इलेक्ट्रिसिटी चा अजिबात वापर केलेला नसे. लहान मुले उत्साहाने त्या दीपोत्सवात सामिल झालेली दिसत! अमावस्या असूनही वातावरण अगदी पौर्णिमेच्या चांदण्याप्रमाणे झगमगते दिसत असे!
आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला काही वैशिष्ट्यं असते.निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा संबंध विचारात घेऊन त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.पृथ्वी,आप,तेज,वायू, आकाश या साऱ्या पंचमहाभूतांचे स्मरण ठेवणे, पूजा करणे हे आपल्या संस्कृतीतील चांगल्या विचारांचे द्योतक आहे.. इतकेच काय तर प्रत्येक प्राणीमात्रांना आपण महत्त्व देतो.
दीप अमावस्येची रात्र अधिक झाकोळलेली असते.अंधाराचा प्रभाव जास्त असतो.पावसाची रिपरिप चालू असते..अशावेळी आपले मन नकळत निराशाजनक विचारांनी भरण्याची शक्यता असते,पण दीपोत्सव आपल्याला या नैराश्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो.अंधाऱ्या रात्री जाऊन आता तेजाची पहाट येणार आहे हेच जणू दीप सांगत असतो! दिवा हे उजेडाचे साधन आहे.आणि त्यामुळे मानवाची उन्नतीकडे वाटचाल चालू असते.
यानंतर येणाऱ्या श्रावणात दुष्टांचा संहारक कृष्ण जन्माला येतो,तर नवरात्रात देवीचे रूप हे दुष्टांचा संहार करणारी म्हणून येते.आणि नऊ दिवस दिवा लावून आपण नंतर दसरा साजरा करतो.दिपावली ला तर दिव्यांचे तेज झळाळून येते, कारण नरकासुराचा वध झालेला असतो. या सर्व गोष्टींतून असं लक्षात येतं की ,
दिवा किंवा तेज हे चांगल्या कडे वाटचाल करणारे आणि वाईट गोष्टींचा नाश करणारे असते! त्याची सुरुवात या दिव्याच्या अवसेपासून होते म्हणून ही दिव्याची अमावस्या महत्त्वाची मानली जाते!
या दिवशी आमच्याकडे कणकेमध्ये गूळ मिसळून , उकडून दिवे तयार केले जातात आणि हे कणकेचे दिवे तूप घालून खायला छान लागतात! मुलांनाही या दिव्याच्या खाद्य पदार्थांची मजा वाटते.अशी ही दिव्याची अमावस्या पुढील आनंदाच्या काळाची सुरूवात करणारी असते….
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈