सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
विविधा
☆ दार आणि खिडकी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
व्यवहाराच्या पायावर उभारलेल्या संसाराच्या इमारतीची आखणी कितीही योग्य तऱ्हेने केली तरी काही त्रुटी राहतातच असं दिसतं ! घराच्या भिंती सभोवतालच्या समाजाने बंदिस्त केलेल्या असतात, तर परमेश्वरी कृपेचे छप्पर सर्वांनाच नेहमी सावली आणि आधार देतं! दार- खिडकी हे घराचे आवश्यक, अपरिहार्य भाग! जसे घरातील नवरा बायको !कधी कधी वाटतं चुकांचे कंगोरे आपले आपणच बुजवून घ्यायचे असतात! खिडकी आणि दार यांचे प्रपोर्शन योग्य असेल तर ते चांगले दिसते.. खिडकीने जर दाराएवढं बनायचं ठरवलं तर घराचे रूप बिघडते! अर्थात हे माझं मत आहे!
दार ही राजवाट आहे जिथून प्रवेश होतो, त्याचे मोठेपण मानले तर आपोआपच बाकीचे भाग योग्य रीतीने घर सांभाळतात. खिडकी वाऱ्यासारखी प्रेमाची झुळूक देणारी असली की घरातील हवा नेहमी हसती, खेळती, फुलवणारी राहते. ही खिडकी बंद ठेवली तर चालत नाही, कारण तिची घुसमट वाढते! प्रकाशाचा किरण तिला मिळत नाही. एकेकाळी स्त्रीच्या मनाच्या खिडक्या अशा बंद केलेल्या होत्या! शैक्षणिक प्रगतीच्या सूर्याचे किरण झिरपू लागल्यावर तीच खिडकी आपलं अस्तित्व दाखवू लागली.
बाहेरचे कवडसे तिला- तिच्या मनाला -उजळवून टाकू लागले, पण म्हणून खिडकीचे अस्तित्वच मोठं मोठं करत दाराएवढं बनलं किंवा त्याहून मोठं झालं तर…. इमारतीच्या आतील सौंदर्य कदाचित विस्कटून जाईल! येणाऱ्या वाऱ्या वादळाचा धक्का खिडकी पेलू शकणार नाही.. तिला दाराचा आधार असेल तर जास्त चांगलं असेल!
सहज मनात आलं, ब्रिटिश कालीन इमारतींना दारं आणि खिडक्या दोन्ही मोठीच असत. !जणू काही तेथील स्त्री आणि पुरुष यांचा अस्तित्व फार काळापासून समानतेच्या दिशेने वाटचाल करू लागले, त्या उलट आपल्याकडे वाडा संस्कृतीत दार खूप मोठे असले तरी त्याला एक छोटं खिडकीवजा दार असे, ज्याला दिंडी दरवाजा म्हणत.. त्यातून नेहमी प्रवेश केला जाई! उदा. शनिवार वाड्याचे प्रवेशद्वार जरी मोठे असले तरी आत प्रवेश करण्यासाठी छोटा दिंडी दरवाजा आहेच..
जुन्या काळी स्वयंपाक घरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बाहेरच्याना दुस्तर होता. तसेच भक्कम पुरुषप्रधान दार ओलांडून किंवा डावलून, चौकट तोडून बाहेर पडणे स्त्रीलाही कठीण होते.
साधारणपणे ४०/५० वर्षांपूर्वी स्त्रीवर कठीण प्रसंग आला तर तिची अवघड परिस्थिती होत असे. शिक्षण नाही आणि आर्थिक स्वातंत्र्य कमी असल्यामुळे संसाराचा गाडा ओढण्याची एकटीवर वेळ आली तर हातात पोळपाट लाटणे घेण्याशिवाय पर्याय नसे.
मागील शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांची परिस्थिती काहीशी अशीच होती. त्यामुळे स्त्री शिक्षण हे महत्त्वाचं ठरलं! शिक्षणामुळे आत्मविश्वास मिळाला, नोकरीमधील संधी वाढल्या..
पण हळूहळू कौटुंबिक वातावरण ही बदलत गेलं. घरातील पुरुष माणसांबरोबरच स्त्रीचं अस्तित्वही समान दर्जाचे होऊ लागले. अर्थातच हे चांगले होते, परंतु काही वेळा स्त्री स्वातंत्र्याचाही अतिरेक होऊ लागतो आणि घराची सगळी चौकट बिघडून जाते.
अशा वेळी वाटते की एक प्रकारचे उंबरठ्याचे बंधन होते ते बरे होते का? अलीकडे संसार मोडणे, घटस्फोट घेणे या गोष्टी इतक्या अधिक दिसतात की दाराचे बंधन तोडून खिडकीने आपलेच अस्तित्व मोठे केले आहे की काय असे वाटावे!
दार आणि खिडकी एकमेकांना पूरक असावे. दाराला इतकं उघड, मोकळं टाकू नये की, त्याने कसेही वागावे आणि खिडकी इतपतच उघडी असावी की हवा, प्रकाश तर खेळता रहावा आणि चौकट सांभाळावी!
संसाराच्या इमारतीचा हा जो बॅलन्स आहे, त्यात दोघांचेही असणारे रोल दाराने आणि खिडकीने सांभाळावे नाहीतर या चौकटी खिळखिळ्या होऊन संसाररूपी इमारतीची वाताहात होण्यास वेळ लागणार नाही……
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈