सुश्री सुलभा तेरणीकर
विविधा
☆ धूळभेट… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆
शुभंकरोती, रामरक्षा, पाढे म्हणून झाल्यानंतर गोष्ट ऐकत आमची निवांत संध्याकाळ हलकेच, निःशब्द अशा रात्रीत विरघळून जात असे. रस्ते निर्मनुष्य होत. त्या काळातली ही आठवण आहे. हिरण्यकश्यपू, प्रल्हाद आणि नरसिंहाची गोष्ट आजी इतकी तपशिलातून रंगवून सांगत असे, की वाटे- हिने हे सारे प्रत्यक्ष घडत असताना पाहिले असले पाहिजे. मोठेपणी ही गोष्ट जाऊन त्यातून तिचे माहेर नीरा-नृसिंहपूर उदित होऊ लागले. कथेचे संदर्भ जुळले. नीरा-भीमेचा संगम, नरसिंहाचे हेमाडपंथी देऊळ, त्याची वालुकामय मूर्ती, तिचा भला मोठा वाडा, नदीकाठची शेती, दूधदुभते, नोकर, आईवडील, भावंडं, त्यांच्या मालकीची भली मोठी नाव….. हे सारे तपशील येऊ लागले. काही काळानंतर तिचे सर्व आयुष्य तुकड्या-तुकड्यांतून समजू लागले…..
वयाच्या बाराव्या वर्षीच हे तिचे गाव, घर तिने सोडले होते- लग्न होऊन ती कामाच्या रहाटगाडग्याला जुंपलेली होती. तेव्हापासून नीरा-नृसिंहपूरचे सूक्ष्म रेखाचित्र माझ्यासमोर असे. त्यातली तिची तानूमावशी म्हणे, एकदा पहाट झाली म्हणून मध्यरात्रीच उठून नदीवर अंघोळीला गेली. परतताना घाटावर एक माणूस उंचावर बसलेला पाहिला. त्याचा पाय एवढामोठा लांबलचक होता… थेट नदीत बुडलेला. मग घाबरलेल्या तानूमावशीने दोन महिने अंथरूण धरले होते. भीमेच्या बाजूच्या घाटावर तिचे भले मोठे घर होते. पूर आल्यावर कोळ्यांच्या कुटुंबांना वाड्यात थारा मिळे. तिची आई, मावशी त्यांना जेवण रांधून घालीत. त्या वाड्यात गुप्तधन होते. झोपाळ्याच्या कड्या करकरत, बिजागऱ्या सुटत, असे भास त्यांना होत. मग तिच्या वडिलांनी प्रार्थना करून आपल्या कुटुंबीयांना त्रास न देण्याबद्दल विनवले होते. या रेखाचित्रात ती मला अस्पष्ट असे. हे तपशील मात्र ठळक होते. आम्हाला तिचे गाव पाहायची ओढ लागली; पण ती मात्र फारशी उत्सुक नसे. तिच्या लग्नानंतर लवकरच वडील गेले. भावाच्या राज्यात तिचे माहेरपण हरवले. या अशा घटनाक्रमाचा मालिकेतली साखळी तीच तटकन तोडून टाकत असे; पण नरसिंहाचे नाव मात्र ओठी असे. त्याचे देऊळ तिच्या स्मरणात नित्य असे. पुढे मलादेखील त्या हेमाडपंथी देवळाची ओढ लागली; पण जायचा योग मात्र आला नाही. ज्या शतकात ती जन्मली आणि गेली, तेही संपले, तेव्हा पंच्याहत्तर ते साठ वयोगटातील तिच्या मुलांनाच घेऊन जायचे ठरवले. — – नीरा- नरसिंहपूरच्या त्यांच्या स्मृती अंधुक होत्या. अस्पष्ट होत्या. आता साठ-पासष्ट वर्षांनंतर त्या गावी जायचे झाले, तर काय आठवणार म्हणा !
आम्ही पुण्याच्या आग्नेय दिशेस एकशे पासष्ट किलोमीटरचे अंतर पार करून आलो होतो. नीरेचे विशाल पात्र डोळ्यांत मावत नव्हते. उंच बेलाग डोंगरकडे भयचकित करीत होते. पलीकडच्या तीरावरचे एखाद्या किल्ल्यासारखी तटबंदी असलेले नरसिंहाचे मंदिर, मंदिराचे उंच शिखर, नीरेचा विस्तीर्ण घाट पाहून मन निवले. प्रथेप्रमाणे धूळभेट घ्यायची होती. वेशीतून आत आल्यावर विंचूरकरांच्या वाड्यासमोर पश्चिम दरवाजा उभा ठाकला. उंच, चिरेबंदी तेहतीस पायऱ्या चढता-चढता दमछाक झाली. प्रवेशद्वारात सोंड वर करून दगडी हत्तींनी स्वागत केले, तेव्हा माझ्या पंच्याहत्तर वर्षे वयाच्या मामाला आपल्या वयोमानाचा विसर पडला… सहा-सात दशके गळून पडली. बालपणीचा मित्रच जणू त्याला भेटला…
मुख्य देवालयाचा गाभारा, सभामंडप, छतावरच्या मूर्ती, वेलबुट्टी, नक्षीकाम पाहताना मी हरवून गेले. भक्त प्रल्हादाच्या उपासनेतील वीरासनातली वाळूची मूर्ती पाहताच आठवण झाली ती त्याचे नाव सदैव घेणाऱ्या या गावच्या माहेरवाशिणीची.
अरगडे व अत्रे या लेखकद्वयींनी लिहिलेल्या पुस्तकाच्या आधाराने मी सर्वांना क्षेत्रमाहात्म्य सांगून चांगलेच चकवले होते.. जणू मी इथे नेहमी येत असल्यासारखी…
इतिहासातल्या पुराणांच्या कथा सांगून साऱ्यांची भरपूर करमणूक केली. दर्शन आणि प्रसाद घ्यायचे आणि परतायचे…
त्यापूर्वी नीरा-भीमा संगमात सारे उतरले. त्यांच्या पाण्याला भिणाऱ्या आईची आठवण निघालीच. ‘पाणी म्हणजे ओली आग’ असे म्हणायची ती.
त्यानंतर तिचा वाडा पाहायचा होता. ग्रामस्थांना विचारीत सारे जण पोहोचलो. वाडा जागेवर नव्हताच. दगड, विटा, लाकडे यांचा खच पडलेला. नांदत्या घराची एवढीसुद्धा खूण नव्हती. गुप्तधनासारखे सर्वच भूमिगत झाले काय? झोपाळा, माजघर, ओटी, गोठा… तिच्या लवकर हरवून गेलेल्या बालपणासारखे हरवून गेले होते… शेराची-निवडुंगांची झाडे, शेणाचा दर्प, गावातला दारिद्र्याचा सूक्ष्मपणे जाणवणारा गंध, भणाणणारा वारा, डोक्यावर तापलेले ऊन, उजाड आजोळघरात तिची प्रौढ लेकरे गप्प होऊन उभी होती. असे कसे झाले… असे काहीसे म्हणत होती. परतताना पाय जड झाले होते. देवालयात पुन्हा आल्यावर गाभाऱ्यातल्या काळोखाने मन निवल्यासारखे झाले. राक्षसासाठी उग्र रूप धारण केलेल्या नरसिंहाचे डोळे कनवाळू झाले ते भक्तांसाठी. देवापाशी काय मागावे ते आठवेना, सुचेना. मागायचे नव्हते-सांगायचे होते; तेही साधेना… प्रसादाचे जेवण घशाखाली उतरेना.
महर्षी नारदाची तपोभूमी असलेले नीरा-नरसिंहपूर, एकेकाळी वैभवशाली नगर होते. वेदपाठशाळा, पुष्पवाटिका यांनी गजबजलेले होते. नगर म्हणून उदयाला आले होते. समर्थ रामदासांनी, तुकारामांनी गौरविले होते. साधक, योद्धे, राज्यकर्ते यांना प्रिय होते. कालचक्राच्या आवर्तनात, महापुराच्या तडाख्यात, दुष्काळाच्या वणव्यात, कलहाच्या भोवऱ्यात, उदासीनतेच्या अंधारात ते हेलपाटले; हरवले; उध्वस्त झाले. हा वाचलेला इतिहास सर्वांना सांगितला, तरी आजोळघराची भूक डोळ्यांत काचत होती, खुपत होती…
उग्र वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम्
नृसिंह भीषणं भद्रं मृत्युमृत्यूं नमाम्यहम्।।
… या गावची ती माहेरवाशीण असे काही म्हणायची… त्याला संकटात हाक मारायची… कडक दैवत म्हणून भ्यायचीसुद्धा…
आता मात्र सारे निमाले होते. तिच्या घरातला झोपाळा थांबला होता. नावही उरली नव्हती. नीरा-भीमेची गळामिठी मात्र तशीच होती. खीर-खिचडीचा नैवेद्य रोजचा; आजही चुकला नव्हता. इतिहासावर धूळ होती आणि या धुळीचाही इतिहास होता. उग्रमूर्ती नरसिंहाचे डोळे गाभाऱ्यातल्या अंधाराला भेदून तिच्या लेकरांसाठी निरोपाचे पाणी लेऊन सांगत होते- पुन्हा या… धूळभेटीला पुन्हा या…
© सुश्री सुलभा तेरणीकर
मो. 8007853288
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈