☆ विविधा ☆ नातं – आईची आई ☆ सौ.दीपा पुजारी 

एकावर एक दोन ड्रेस चढवून वर स्वेटर, त्यावर ओव्हरकोट, डोक्याला माकडटोपी, हॅंडग्लोव्हज, मोजे, बूट अशी जय्यत तयारी करून मी तयार झाले. तेव्हढ्यात हातात गरम चहाचा कप घेऊन माझी लेक समोर ऊभी. सरणारा ऑगस्ट महिना. डब्लिन मधील एक पहाट. डब्लिनवासियांसाठी प्लेझंट पण आमच्यामते गारठलेली पहाट. मुलीने हट्टाने एक दिवसाची Galway-Belfast-Gaints Causeway ची खास आमच्या साठी ठरवलेली ट्रीप. थोड्या नाईलाजानेच मी ऊबदार, मऊ दुलईतून बाहेरआले व स्वत:ची तयारी करू लागले. हे तर केंव्हाच तयार होऊन बसलेले.

हसतमुखपणे गुडमॉर्निंग म्हणून तिने कप मला दिला व ती पुन्हा लगबगीने किचनकडे वळली.काल रात्रीच तिने  आलू पराठे करून ठेवले होते . सोबत शिरा व इतरही किरकोळ खाऊ होता. छानशा पिशवीत सगळे पॅक करून तयार होतेच. “चला चला ,इथे बस  वेळेवर सुटते हं. बाबा, आई आवरा लवकर.” ती हातात लॅच की घेऊन ऊभी.

तिने आम्हांला बाहेर काढलेच. रस्यातून जाताना तिच्या सूचना सुरु होत्याच. काय बघायचे ? कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या? बस कुठे थांबेल? गाईड कशी माहिती सांगेल? इथले नियम कसे कडक असतात. वगैरे….वगैरे….

“आई, २० मि. दिली असतील एखाद्या स्पाॅटला तर १५. मि. बस कडे ये हं. २० मि. म्हणजे अर्धा पाऊण तास नाही हं. वेळ लागला तर ओरडून घेशील मग मूड जाईल तुझा.”

“बाबा,एखाद्या ठिकाणी खूप चालावे लागले पण दमलात तर बसून रहा बाजूच्या बाकावर . नाही चालावे वाटले तर राहू दे.” असे म्हणत तिने स्वत:चे एक कार्ड बाबांच्या हातात ठेवले. बरोबर थोडे युरोही होते. “आई बाबा चहा काॅफी घ्या. काही खावेसे वाटले तर खा. आणी खरेदी ही करा हं.”

मी बसच्या खिडकीतून बाहेर पाहिले. ती हसत हसत हात हलवून निरोप देत होती. ही एव्हढी मोठी कधी झाली? माझ्या नजरेसमोर तर अजून ऊड्या मारत स्कूल युनिफॉर्म मधलीच आहे. शाळेच्या सहलीला जाताना तिची बस दिसेनाशी होईपर्यंत गेटजवळ मी ऊभी असायची हात हलवत. तिचा ऊल्हासित चेहरा, मैत्रिणींच्या बरोबर चाललेल्या गप्पा, टाळ्या, आणी इतक्या मुलींमधूनही एव्हढ्या किलबिलाटात ही ओळखता येणारी तिची हास्य लहर!! तिचा तो अवखळपणा, अल्लडपणा, निरागसपणा जाऊन हा बदल कधी झाला? दुसर्‍या ईयत्तेत असताना एकदा वर्गात रडत होती. बाईंनी कारण विचारले तर आईची आठवण आली म्हणाली. एव्हढ्या लांब परक्या जगात,परक्या वातावरणात कसा निभाव लागणार हिचा? कधी काही बोलली नाही. आज जग फिरुन अनेक अनुभव घेऊन अधिकच समंजस झालीय. आणी आज तर हिने नात्यांचीच अदलाबदल केली.

ही तर माझीच आई झाली. सुजाण, सुशिक्षित, कर्तबगार तरीही आपल्याच आई बाबांची छोटी आई!! मला वाटले हा दिवस लवकर संपावा व घरी जाऊन या ‘आईचीच आई झालेल्या आईच्या’ मांडीवर डोके ठेऊन शांत झोपावे. पिकनिक हून आल्यावर ती दमून शिरायची तसे……अगदी तसेच…….

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments