श्री मुबारक बाबू उमराणी
विविधा
☆ नवा मुलूख नवा दिवस ☆ श्री मुबारक बाबू उमराणी ☆
मन बेचैन झाले की,मस्त डोंगर दरी धुंडाळावी, छत्री, रेनोकोट,डोक्यावरची टोपी फेकून द्यावं अन् मनसोक्त फिराव . नव्या मुलूखात नव्या दिवासात आणि डोंगराच्या कडा उन्हात न्हात हळूच पाझरणा-या झ-याकडे पहात खळखळणारा नाद मनात साठवत कित्येक वर्षे उभा आहे. एकटक पहात दिवसागणिक त्याचा आनंद द्विगुणित होत जातो. त्याला भान राहात नाही. पडणाऱ्या रिमझिम पावसात तोही कोसळत असतो
पाऊस होऊनच. सभोवतालचा परिसर मनाला मोहित करुन सोडतो.लाल मातीतून हिरवे अंकूर, गवताची पाती वा-यासवे खेळत, नाचत असल्याचे दिसते.एखादे गवत फुल डोलत रानभर फिरणा-या मस्त मौला भूंग्याला बोलवतो अाहे.खुणावतो आहे .पण आपल्याच ना्दात फिरणा-याला यातले काहीच माहितच नसते.विरहात झुरणारे फुल फुलते फुलते अन् एक एक पाकळी गळून पडते.फुलातला इवला गंध हळूच धरणीमातेच्या चरणी नौछावर होतो.माती तत्क्षणीच शहारते.पाझरणारे पाणी दूध होऊन खडकाच्या दणकट अंगावर बाल लीला करीत उड्या मारीत जातांनाचे दृश्य. पहात राहावे वाटते.चराचरात आनंद ,मोद,हर्ष, भरलेला आहे.पाखराची चिमणपिले पाण्यात खेळत असतांना ते थकत नाहीत. चिमण्यांनी आणलेला इवलासा सुरवंटाचा आस्वाद घेत लाल चोचीतून पोटात जातांनाचे दृश्य अन् मातृत्वाचा आविष्कार विधात्याने चरारात पेरून ठेवल्याचा प्रेमळ,वात्सल्याचा ठेवा येथेच पहावा.सारे सारे, वारा उनाड होऊन तुमच्या भोवती पिंगा घालायला लागतो अन् म्हणतो, अरे येड्या थोड लीन हो. सारं विसरून अंहम् पणाचा शेला वा-यावर पहाडाच्या टोकावरुन फेकून दे.मन हलके हलके होत मस्त वा-याच्या मा-यासह पावसाचे नाजूक तुषार अंगावर घेतच राहवे अन् निसर्गगीत गात गात मनातला दुःखाचा गाळ कधी अनंतात विलीन झाला हे कळणारही नाही.दगडाच्या उभ्या शीळांना कान लावून डोळे बंद करुन पहा.तुम्हांला ऐकू येतील घोड्यांच्या टापांचा आवाज.शिव छत्रपतीच्या जयजयकारचे घोष. शिवशाहीच्या यशोकिर्तीचा भगवा ध्वज फडपड आवाज करीत डौंलाने फडकत असल्याचा आवाज.मग तुमच्या मनाच्या ह्दयपटलावर जगण्याचे उन्मेश कोरले जातील. ईर्षा, द्वेश,नैंराश्य लयाला जाऊन तुम्ही स्वतः व्हाल शिवबाचे शिलेदार अन्
जयघोषाच्या निनांदात वीरत्वाचे संचार तुमच्या मनात येईल. मरगळ हवेत विरून जाईल, चेतना,चैतन्याच्या मंगलमय परीसाचा परीरस्पर्श तुम्हाला होईल अन् आपण स्वतः परीस होऊन जाल. कित्येक नैराश्याच्या गंजलेल्या लोखंडासमान असणाऱ्याना तुमचा हस्तस्पर्श होताच तो तत्क्षणी बदललेला दिसेल.
तू तू मी मी चे पागोटे किती दिवस डोक्यावर ठेऊन बसाल? दिवसागणिक पागोट्याचे वजन वाढत जाईल, वाढत जाईल. त्या वाढणाऱ्या वजनांच्या भाराखाली तुम्ही दबून जाल. भावनांच्या कल्लोळाच्या तडतड बाजाने तुम्ही वेडे व्हाल वेडे. आताच वेळ आहे ही वेडेपाणाची शाल फेकून द्यायची.मग कशाची वाट पहाता, फेका ना, बघा निसर्ग कसा हिरवाईचं कवच पांघरुन डोलत आहे.
पहा पहा ते निसर्गरंग फौंडेशनचे मा.कुलदीप देवकुळे याचे निसर्ग वारकरी ,अविरतपणे पाच वर्षे झाडे लावण्याचे अन् ते संवर्धन करण्याचे महान कार्य एक वारी म्हणून करीत अाहेत.विठ्ठलाच्या भेटीसाठी जातांना “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे सुस्वरे आळविती”ही तुकोबाची वाणी खरी करीत त्यांचा वारसा जपत कार्य करीत आहेत, “निसर्गराया भेटू या “. हे बिरूद घेऊन हिरवेपणाचं हिरवेपणा जपत आहेत ,यांच्या हातात हात घालून आपणही थोडं यांच्या बरोबर चालत एकतरी झाड लावू या. या धरणीमातेचे ऋण फेडू या.कोणाच्या आदेशाची वाट पहात आहात ? तुम्ही निसर्गात जा निसर्गाला सजवा,नटवा, फुलवा तरच आपले मानवी जीवन सुखी समृध्द होईल असा संदेश देत सांगलीपासून पेड पर्यंतचा निसर्ग वारीतील प्रवासात सायकलस्वारांनी ठिकठिकाणच्या गावात वृक्षारोपण करीत समाजाला देश वाचवा व पर्यावरण वाचवा असा संदेश कृतीतून दिला. मग आपणही मनात निश्चय करा, साहित्य-सांस्कृतिक छावणीतील मुख्य वजीर-इ- आलम, ऐपतदार होऊ या. चला गड्यानो व्हा हिरवे गालीचे, खळखळणारा झरा अन् वाहत राहा पाण्याच्या झुळझुळणा-या झ-यासारखे.
निसर्गरम्य कवी संमेलनाच्या निमिताने पेड ता.तासगाव, सुंदरलाल बहुगुणा नगरी जि.सांगली येथे दयासागर बन्ने, अभिजित पाटील, गौतम कांबळे, संजय ठिगळे, तानाजी जाधव, प्रतिभा जगदाळे, कु.खाडे, सुनीता बोर्डे-खडसे यांच्या समवेत जाण्याचे भाग्य मिळाले. त्यावेळी तेथील निसर्ग परिसर पाहून प्रभावित झालो अन् माझ्या मनात ज्या भावना आल्या त्या व्यक्त केल्या.
चला तर आपणही होऊ या एखादे झाड.
आणि पेरत राहू हिरवळ.निसर्गराया भेटूया चला विठ्ठल. पेरु या!
© श्री मुबारक बाबू उमराणी
शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈