श्रीमती उज्ज्वला केळकर
विविधा
☆ नवरंगी वसंत ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मराठीत कविता लोकप्रिय करण्याचं आणि काव्यरसिक घडवण्याचं काम विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकार आणि वसंत बापट या त्रिमूर्तीनं केलं. त्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जागोजागी कविता वाचनाचे कार्यक्रम केले. श्रोत्यांना ते आवडू लागले. त्यांना दादही मिळत गेली. या त्रिमूर्तीत शोमन होते, वसंत बापट. पाडगावकार म्हणायचे, ‘वसंत बापट म्हणजे सळसळणारं चैतन्याचं झाड’, तर विंदा म्हणायचे, ‘वसंत बापट यांच्या व्यक्तिमत्वाचे ९ रंग आहेत. प्राध्यापक, कवी, गीतकार, शहीर, समीक्षक, सापादक, कार्यकर्ता, वक्ता, शोमन हे ते ९ रंग.
वसंत बापट, म्हणजे विश्वनाथ वामन बापट तथापि ते वसंत या नावानेच सर्वपरिचित आहेत. त्यांचा जन्म २५ जुलै १९२२ला कर्हाड इथे झाला. नुकतीच त्यांची जन्मशताब्दी पूर्ण झाली.
प्राध्यापक – उत्कृष्ट अध्यापन हा त्यांच्या कवितेचा पाहिला रंग. नॅशनल कॉलेज वांद्रा इथे १५ वर्षे, नंतर रुईया कॉलेज माटुंगा इथे १५ वर्षे त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर ७४मध्ये मुंबई विद्यापीठातील गुरुदेव रविंद्रनाथ टागोर अध्यासनाचे ते प्राध्यापक होते. ते मराठी आणि संस्कृत विषय शिकवायचे. ते कुशल आणि विद्यार्थीप्रिय अध्यापक होते. मराठी, संस्कृत, इंग्रजी, हिन्दी, बंगाली इ. भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.
कवी – वयाच्या २०व्या वर्षी वसंतरावांनी कविता लिहायला सुरुवात केली. ३०व्या वर्षी ‘बिजली’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला. या संग्रहावर त्यांचे सेवादलाचे आणि सानेगुरुजींचे संस्कार स्पष्ट दिसतात. त्यानंतर पुढे ६० वर्षे त्यांनी कविता लिहिल्या. अकरावी दिशा, तेजसी, मानसी, रसिया, राजसी इ. त्यांचे २५ कवितासंग्रह प्रकाशित झाले. त्यांनी १०००च्या वर कविता लिहिल्या. बिजलीनंतर त्यांचे अनुभवाचे क्षेत्र अधीक विस्तृत व जाणीवा अधिक सखोल होत गेल्या. त्यांच्या कवितेवर संस्कृत, इंग्रजी, बंगाली कवितेचा प्रभाव होता. संस्कृतमधील अभिजात आणि नादवती शब्दकला त्यांच्या कवितेत दिसून येते. गुरुदेव टागोरांचा मानवतावाद आणि इंग्रजी कवितेतील स्वच्छंद प्रवृत्ती यांचे ठळक संस्कार त्यांच्या कवितेवर दिसून येतात.
निसर्गातील लावण्य विभ्रम, यौवनाचा अभिजात डौल , खट्याळ शृंगार याबरोबरच वसंतरावांची कविता सामाजिक विषमता आणि अन्याय यांच्या जाणीवाही व्यक्त करते. जनजागृती करणे हेही कवितेचे एक मोठे काम आहे, असे ते मानत. राष्ट्र संकटाच्या, दु:खाच्या वा देशातील विविध जन आंदोलनाच्या प्रसंगी त्यांची संवेदनाशीलता त्यांच्या काव्यातून प्रगट झाली आहे. उत्तुंग आमची उत्तर सीमा… महाराष्ट्राचा पोवाडा, गांधींची जीवनयात्रा, नव्या युगाचे पोवाडे, (भाग १ ते ३) , सैन्य चालले पुढे इ. कविता याची साक्ष देतील. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी ‘मेघहृदया’च्या रूपाने मराठीत आणली, तर ‘सकीना’तील कवितांना खास उर्दू लहेजा आहे.
वसंतरावांनी अनेक बालकविताही लिहिल्या. अबडक तबडक, चंगा मंगा, परीच्या राज्यात, फिरकी, फुलराणीच्या कविता असे त्यांचे अनेक बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत.
युगोस्लावियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात ते भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. इ.स. १९७७ व १९९३ मध्ये अमेरिकेत आणि १९९२ मध्ये आखाती देशात त्यांचा काव्यदर्शन हा कार्यक्रम झाला. ते श्रेष्ठ आणि लौकिकसंपन्न कवी होते.
गीतकार – वसंतराव उत्तम गीतकार होते. गीत म्हणजे कविताच. फक्त ही कविता वृत्त, छंद, मात्रा, यमक इ. बंधने पाळून लिहिली जाते. आणखीही सूक्ष्म फरक सांगितला जातो. कविता या अंत:स्फूर्तीने लिहिल्या जातात तर गीताची प्रेरणा बाह्य असते. चालीमुळेही गीत लोकप्रिय होते. उत्तम गीत ही उत्तम कविता असेलच असे नाही. पण ग.दि. माडगूळकर, शांता शेळके यांच्याप्रमाणेच वसंतरावांची गीते या उत्तम कविताही आहेत. ‘उत्तुंग आमची उत्तर सीमा’, ‘गगन सदन तेजोमय’, ‘देह मंदीर चित्त मंदीर’, ‘सदैव सैनिका’, ही त्यांची गीते लोकांना खूप आवडतात. असेच ‘दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिल्लेही चालली खुशीत’ हे तालकाव्यही ऐकताना खूप मजा वाटते.
शाहीर – शाहिरी हा वसंतरावांच्या व्यक्तिमत्वाचा तिसरा पैलू. वीरश्रीयुक्त ओजस्वी रचना आणि नजाकतीचा वा धीट शृंगार ही शाहिरी काव्याची वैशिष्ट्ये. पोवाडा आणि लावणी हे शाहिरी काव्याचे गीतप्रकार. वसंतरावांनी राष्ट्र सेवादलाच्या कलापथकासाठी अनेक पोवाडे आणि लावण्या लिहिल्या. ‘शूर मर्दाचा पोवाडा’, ‘संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा’ असे त्यांचे पोवाडे गाजले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी त्यांनी कलापथकाद्वारे अनेक कार्यक्रम बसवून सादर केले. त्यांनी ‘महाराष्ट्र दर्शन’, ‘भारत दर्शन’, हे कार्यक्रम लिहिले. बसवले आणि कलापथकाद्वारे ते सादरही केले. ते उत्तम दिग्दर्शक होते. पौराणिक, ऐतिहासिक कथानकांवर त्यांनी नृत्यनाट्ये लिहिली. ‘शिवदर्शन’ हा नृत्यनाटकात्मक कार्यक्रम चांगला गाजला. कलापथकासाठी त्यांनी, तमाशा, लोकनाट्य, पथनाट्य, नृत्य, नाट्य याबरोबरच लोककलेचे अन्य प्रकारही वापरले. त्यांच्या कलापथकाच्या कार्यक्रमांनी समाजाची आणि जाणकारांची खूप दाद मिळवली.
समीक्षक – वसंतरावांनी समीक्षात्मक लेखन तूलनेने थोडं केलय, पण जे केलय ते लक्षणीय आहे. आधुनिक मराठीचे शतक १९०० ते २००० संपले, तेव्हा त्यांनी या कलखडातील साहित्यावर २४ लेख लिहीले. ‘शतकाच्या सुवर्णमुद्रा’ या पुस्तकात ते समाविष्ट आहेत. तौलनिक साहित्याभ्यास- मूलतत्त्वे आणि दिशा हे त्यांचे आणखी एक समीक्षणात्मक पुस्तक. त्यातून त्यांच्या विचारांचा आणि अभ्यासाचा आवाका स्पष्ट होतो. समीक्षा या शब्दाची व्याप्ती थोडी वाढवली आणि त्यात सामाजिक व राजकीय जीवनाची समीक्षा असा अर्थ घेतला, तर त्यांच्या आणखी काही पुस्तकांचा समावेश इथे करता येईल. प्राचीन बखर वाङ्मयाच्या शैलीत त्यांनी लिहिलेलं ‘विसाजीपंतांची बखर’ हे पुस्तक म्हणजे राजकीय समीक्षाच आहे. ‘बारा गावचं पाणी’, ‘अहा देश कसा छान’, ‘गोष्टी देशांतरीच्या ही त्यांची प्रवासवर्णने एका अर्थाने सामाजिक जीवनाची समीक्षाच आहे.
संपादक – साधनाच्या पहिल्या अंकापासून ते साधनाशी निगडीत आहेत. १९८३ ते १९८८ ते साधना नियतकालिकाचे संपादक होते.
कार्यकर्ता – वसंतरावांची लहानपणापासून राष्ट्र सेवादलाशी जवळिक होती. तरुणपणी ते सेवादलाचे निष्ठावान कार्यकर्ते झाले. त्यांनी तरुणपणी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. ४२च्या ‘चले जाव’ चळवळीत त्यांचा सहभाग होता. त्यासाठी त्यांना काही काळ तुरूंगवासही भोगावा लागला होता. राष्ट्र सेवादलाच्या कलापथकाचे ते अध्वर्यू होते. कलापथकासाठी त्यांनी कार्यक्रम लिहिले. बसवले आणि सादरही केले. या कलपथकाने लोकजागृतीचे मोठेच काम केले होते.
वक्ता – सामाजिक, वाङ्मयीन, संस्कृतिक क्षेत्रातील विविध विषयांवर त्यांनी भाषणे दिली. त्यांची भाषणे ऐकताना लोक मंत्रमुग्ध होऊन जात. कुमार गंधर्वांनी माळव्यात निर्गुणी भजनाचा कार्यक्रम सुरू केला, त्यावेळी निरुपणासाठी त्यांनी वसंतरावांना बोलावले. अतिशय सुरेख आणि प्रभावी असं त्यांचं निरूपण असे.
शोमन- वसंतरावांचं व्यक्तिमत्व आकर्षक होतं. उंच-निंच शरीरयष्टी , गोरापान रंग, सोनेरी काड्यांचा चष्मा, प्रसंगाला अनुसरून केलेली अभिरुचीपूर्ण वेशभूषा, कधी सिल्कचा कुर्ता-पायजमा, वर जाकीट, कधी पूर्ण सुटाबुटात आणि एरवी पॅंट व हाफ बुशशर्ट असा त्यांचा पेहेराव असे. ‘आपल्या अस्तित्वाने वातावरणात चैतन्य निर्माण करणारे ते चैतन्यामूर्ती होते’, असं त्यांची विद्यार्थिनी मृदुला जोशी म्हणते.
तर असे हे नवरंगात रंगून गेलेले वसंत बापट. त्यांच्या ‘सेतू’ या कविता संग्रहास आणि मुलांसाठी लिहीलेल्या बाल-गोविंद’ या नाटकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. ७२व्या अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. या मंचावरून त्यांनी अत्यंत प्रभावी आणि सर्वंकश असे भाषण केले होते.
© श्रीमती उज्ज्वला केळकर
मो. 9403310170, e-id – [email protected]
संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈