सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ नाते… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
सोशल मीडिया वर त्यांची ओळख झाली.थोड्या जुजबी गप्पातून आवड निवड जुळली.तिला माहिती होते,अशा ओळखी होतात थोडा वेळ राहतात आणि गायब होतात जणू सशाच्या डोक्यावरचे शिंग.म्हणून तीही कुठे अडकत नव्हती.जपून बोलत होती.
एक दिवस तो तिला भेटला.ती अंतर ठेवून वागते हे त्याच्या लक्षात आले होते.ती अनुभवाने शहाणी किंवा सडेतोड वागणारी झालेली. तर तो फार हळवा प्रत्येक गोष्ट तिला सांगणारा अगदी मना पासून कोणतेही नाते निभावणारा.तसा तो पारदर्शक वाटत होता.तसे वागतही होता.पण हिच्या मनात एकच प्रश्न आपले नाते काय? तो म्हणे सगळ्याच नात्यांना नाव का द्यायचे?नाते फुलू द्यायचे.म्हणजे नाते आपोआप तयार होते.ही एकच गोष्ट सोडली तर प्रत्येक बाबतीत त्यांचे एकमत होत असे.आवडी निवडी पण सारख्या होत्या.त्या मुळे एकमेकांची जणू सवयच लागली होती.पण ती मध्येच अस्वस्थ व्हायची.आणि नात्याचे नाव शोधू लागायची.
एक दिवस रस्त्यात फुले विकणाऱ्या मुला कडून त्याने लाल गुलाब घेतला आणि तिला दिला.त्या दिवशी ती छान दिसते हे ऑफीसमध्ये खूप लोकांनी सांगितले होते. ती पुरती गोंघळून गेली.तिला वाटले त्याच्या या कृतीचा अर्थ काय असावा?त्या नंतर ती त्याला टाळू लागली.जेवढ्यास तेवढे बोलू लागली.
एक दिवस तो धावत पळत तिच्या घरी आला.
एका हातात एक बॉक्स तर दुसऱ्या हातात पोस्टाचे पाकीट.तिला म्हणाला बहिणीने राखी पाठवली आहे. तूच बांध आणि हा माझ्या कडून ड्रेस.ती परत गोंधळात पडली.
एक दिवस सिनेमाची तिकिटे काढली.दोघे त्याच्या हट्टामुळे सिनेमाला गेले.त्यात हिरोची आई मरते असे दृश्य होते.तो इतका भावना विवश झाला.घरी येऊन तिच्या मांडीवर डोके ठेवून मनसोक्त रडला.ती डोक्यावर हात फिरवत राहिली.
नोकरी बदलताना, ड्रेस घेताना कोणतेही छोटे मोठे निर्णय तिला विचारून घेत होता.
प्रत्येक गोष्ट तिला सांगत होता.ही सगळे आनंदाने ऐकत होती,सल्ले देत होती.पण मध्येच हीचा प्रश्न डोके वर काढायचा. आपले नाते काय?
तिच्या मनातील घालमेल त्याला समजली.एक दिवस त्याने तिला आपल्या बरोबर नेले.रस्त्याने ऊन लागत होते.तिने स्कार्फ बांधून घेतला.रस्त्यात वाळवणे दिसली.ऊन आवश्यक असणारी आणि ऊन त्यांना किडी पासून वाचवणार होते.पुढे उन्हाळ्यात चालणारी रस्त्याची,काही सफाईची कामे दिसली.त्यांना एक बांधकाम दिसले.ते काम पावसाळ्या पूर्वी पूर्ण व्हायला हवे म्हणून मालक कडक सूचना देत होता.तिथल्याच झाडा खाली काही प्राणी उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून झाडा खाली बसले होते.दुसऱ्या झाडाखाली एका मजुराचे बाळ झोळीत झोपले होते.आणि त्याची आई त्याला ऊन लागू नये म्हणून जपत होती.
एकीकडे फुले सुंदर फुलली होती तर एकीकडे नाजूक गवत करपत होते.
हे सगळे त्याने तिला दाखवून दिले आणि विचारले आता सांग ऊन कसे आहे?ती पुन्हा विचारात पडली.आणि उत्तर शोधू लागली.मग तोच पुढे म्हणाला,ज्यावेळी मी तुला लाल गुलाब दिला त्या वेळी तुझ्यात मला प्रेयसी दिसली होती.ज्या वेळी मी राखी बांधून घेतली त्यावेळी तुझ्यात बहीण दिसली होती.ज्या वेळी मी हळवा होऊन रडलो त्यावेळी तुझ्यात आई दिसली होती.प्रत्येक सल्ला घेताना तुझ्यात उत्तम सल्लागार दिसला होता.प्रत्येक गोष्ट शेअर करताना एक जिवलग मैत्रीण दिसत होती.
जशी उन्हाची विविध रूपे दिसली,ऊन चांगले की वाईट हे त्याच्या त्या त्या वेळे नुसार ठरते.तसेच आपले नाते आहे.आता त्याला कोणते नाव द्यायचे हे तूच ठरव.आणि जास्त गोंधळात पडू नको.आणि आपण आपल्या या सगळ्यात समाधानी आहोत,तर प्रत्येक नात्याला नाव देण्याचा अट्टाहास करू नको.कदाचित नात्याला नाव देण्या मुळे आपण दुरावले जाऊ.
या सगळे तिला मनापासून पटले आणि नवीन मैत्रीच्या विविध धाग्यांनी विणलेला गोफ सोबत घेऊन ती समाधानाने शांत चित्ताने घरी गेली.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈