श्री सतीश मोघे

🌸 विविधा 🌸

नाती विणता विणता… ☆ श्री सतीश मोघे

ऊबदार आणि रेशीमस्पर्शी नाती प्रत्येकालाच हवीहवीशी वाटतात. तहहयात अशा नात्यांचा अनुभव येणे हा नशिबाचा भाग. पण प्रत्येकानेच अश्या नात्यांचा अनुभव केव्हातरी, काहीकाळ तरी घेतलेलाच असतो. एकाच नात्यातही हा अनुभव कधी येतो तर कधी येत नाही. नात्यात जेव्हा हा अनुभव येतो, तेव्हा आपण त्याचे श्रेय मनातल्या मनात स्वत:ला आणि समोरच्यालाही देत असतो. अर्थात त्यातही बऱ्याच नात्यात जादा श्रेय आपण स्वत:कडेच घेत असतो. याच न्यायाने ऊबदार, रेशीमस्पर्शी अनुभव येत नाही,तेव्हाही खरे तर याचा दोष दोघांनी वाटून घेणे आणि त्यातही दोषातला अधिक वाटा आपण घेणे उचित ठरते. पण असे घडत नाही. अशा प्रसंगात सर्व दोष समोरच्याच्याच माथी मारुन आपण मोकळे होतो.

सुज्ञ व्यक्ती मात्र असे करत नाहीत. नात्याचे वस्त्र सुखकर, सुंदर विणले गेले नाही, ‘मन नाती विणता विणता, मन ठेवी करुनि गुंता’ असे घडले, तर या गुंत्याचा दोष त्या व्यक्ती स्वत:कडे घेतात. आपणच या नात्याचे वस्त्र विणण्याच्या कौशल्यात कमी पडलो, असे म्हणून ते कौशल्य आत्मसात करण्याच्या प्रयत्नाला लागतात. गुलजारांची एक सुंदर कविता आहे. कवयित्री शांता शेळके यांनी या कवितेचा तेवढाच सुंदर मराठी भावानुवाद केला आहे. ही कविता विणकाम करणाऱ्या विणकराला उद्देशून आहे. गुलजार म्हणतात, ‘हे विणकरा, तूझे विणकाम अखंड चालू आहे. धागा कधी तुटतो, कधी संपतो. तू पुन्हा नव्याने विणकाम सुरु करतोस. पण एकसंध. त्यात कुठेही गाठी नाहीत. मी एकदाच नात्याचे वस्त्र विणायला घेतले मात्र… त्याच्या अनेक गाठी मला दिसत आहेत. तेव्हा हे विणकरा, गुंता होऊ न देता, गाठी पडू न देता वस्त्र विणण्याचे हे तुझे कौशल्य तू मला शिकव. या कवितेतला संदेश मोलाचा आहे. किमान हवीहवीशी वाटणारी, पण तरीही दूरावत आहेत असे दिसणारी नाती तरी, हे कौशल्य आत्मसात करून सांभाळणे, पुन्हा त्यात जवळीकता आणणे आवश्यक आहे.

नात्यात कौशल्याचा वापर करण्यावर आक्षेपही असू शकतो. प्रेमाच्या, आपलेपणाच्या नात्यात कौशल्यासारखी तांत्रिक गोष्ट का? आणि कशाला हवी? हे प्रश्नही उपस्थित होऊ शकतात. त्याची उत्तरे देणेही आवश्यक आहे. कोणतेही कौशल्य शिकतांना सुरुवातीस तांत्रिक वाटते, पण तेच एकदा पूर्णतः आत्मसात झाले की तो आपला सहजस्वभाव होते. आपल्या घरी दुरुस्तीसाठी येणारा इलेक्ट्रिशियन, विद्युत प्रवाह सुरू असतांनाही दुरुस्तीचे काम करत असतो. त्याने प्राप्त केलेले कौशल्य त्याचा सहजस्वभाव होऊन जाते. त्याला आल्यावर आधी पुस्तक उघडून काही वाचावे लागत नाही वा थांबून पुढचा टप्पा काय? असे आठवावेही लागत नाही. नात्यांच्या विणकामातले कौशल्यही असेच आहे. सुरुवातीस ते शिकावे लागेल. पण एकदा का अंगवळणी पडले की ते सहजस्वभाव होऊन राहील. गाठी न पडता वस्त्रांची वीण करणे सुलभ होऊन जाईल.

अन्य कामातले कौशल्य हे बुद्धीचे असते. बुद्धीच ते आत्मसात करते आणि बुद्धीपर्यंतच ते सीमीत रहाते. फार तर हात, पाय असे आवश्यक देहांचे अवयव करावयाच्या कामाच्या आवश्यकतेनुसार त्यात सहजपणे सामील होतात. पण मनाने स्वतंत्रपणे त्यात करण्यासारखे काही नसते. नात्यांतील विणकामाचे कौशल्य मात्र मनाचे असते,मनापासून असते. ते वापरत असतांना बुद्धीला काय वाटते आहे, याचा फार विचार न करता पुढे जायचे असते. कारण  नात्यांच्या विणकामातले हे कौशल्य स्वतःच्या हितापेक्षा समोरच्याच्या  हिताचाच अधिक विचार डोळ्यासमोर ठेऊन मनाने आत्मसात केलेले असते व मनाकडून त्याचा वापर होत असतो.बऱ्याचदा समोरच्याला हे कळायला वेळ लागतो. पण कधीतरी ते कळतेच . 

समोरच्याच्या हिताच्या विचाराबरोबरच समोरच्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याची वृत्ती आणि  नात्यात समोरच्याची वारंवार परीक्षा न घेण्याची वृत्ती, ही  नात्यांच्या विणकामातील आवश्यक दोन मुख्य कौशल्ये आहेत. पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण जर असा विचार करायला लागलो की, बघू या हिचे प्रेम खरे आहे का? आज काहीच भेट नको नेऊ या.तरी तिचे प्रेम तसेच राहते  का बघू या…तर गुंता झाला आणि गाठ  पडलीच म्हणून समजा. असा विचार करण्यापेक्षा आपण मोगऱ्याचा गजरा, सोनचाफ्याची फुले आणि एखादी छोटीशी भेटवस्तू घेऊन गेलो तर ती पाहून तिला किती आनंद होईल ! असा विचार प्रबळ होऊन तिचा आनंदी चेहरा डोळ्यासमोर आला की नकळत आपल्याकडून तशी कृती होते. त्यातून दोघांना आनंद होतो. नात्याची वीण अधिक घट्ट होते. विणकाम नवीन उत्साहात सुरु होते. केवळ पती- पत्नी नात्यात नव्हे तर कोणत्याही नात्यात वारंवार समोरच्याची परीक्षा घेणे टाळणे आणि ज्या काही छोट्या छोट्या गोष्टींनी त्याला आनंद होईल, अशा गोष्टी करणे, नाती सुखदायी होण्यासाठी आवश्यक असते.

नात्याचे वस्त्र विणतांना त्याग करण्याची वृत्ती असणेही आवश्यक असते. हा त्याग काही फार मोठा असा अपेक्षित नसतो. समोरच्याला ‘तू माझ्यासाठी खूप विशेष आहेस’,असे सांगणारी लहानशी कृतीही यात पुरेशी असते. आपला मित्र एखादे पुस्तक किंवा औषध त्याच्या गावी मिळत नसल्याचे आपल्याला कळवितो व  मिळालेच तर पाठव,असे सांगतो.खरे तर वाट पाहण्याची त्याची तयारी असते. पण आपण त्याच दिवशी खास वेळ काढतो, बाजारात शोधून ते पुस्तक किंवा औषध मिळवितो आणि त्याला कळवितो, ‘तुझे काम केले आहे.’ या आपल्या कृतीतून आपल्यासाठी तो ‘विशेष आहे’ हा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचतो. मैत्रीचे नाते अधिक घट्ट होते.   

जीवनप्रवासात आलेल्या नात्यांपैकी काहीच नाती आपण हदयाशी जपतो. ही अशी जपलेली  नाती आठवून पाहा. यातील प्रत्येकाने, किमान एकदातरी ‘तुम्ही त्याच्यासाठी विशेष आहात’, हा अनुभव तुम्हाला देणारी कृती तुमच्यासाठी आणि तुम्हीही त्याच्यासाठी केल्याचे नक्कीच आठवेल.

नात्याचे वस्त्र विणण्याची अशी अनेक कौशल्य सांगता येतील. लेखनमर्यादा लक्षात घेता, शेवटची  आणखी दोन कौशल्ये नमूद करतो. त्यातले पहिले म्हणजे समोरचा सुखात असतांना आपले दुःख व्यक्त न करणे  आणि समोरचा दुःखी असतांना आपले सुख लपविणे आणि दुसरे म्हणजे नात्यात केवळ ‘सांगणारे’ न होता ‘ऐकणारे’ही होणे. समोरच्याच्या सुखात सहभागी होऊन त्याचे सुख दुप्पट करणे आणि दुःखात सहभागी होऊन दुःख निम्मे करणे ही भावना मनात रुजलीच पाहिजे. अनेकदा मित्रांच्या व्हाट्सॲप ग्रुपवर एखाद्याच्या जवळच्या नातलगाच्या दुःखद निधनाची बातमी येते. किमान त्या दिवशी तरी हास्य, विनोदाच्या पोस्ट ग्रुपवर टाकणे टाळले पाहिजे. तेच एखाद्याने आधीच आनंदाची पोस्ट शेअर केली असेल तर दुसऱ्याने ग्रुपवर दुःखाची बातमी शेअर करणे टाळले पाहिजे. ही साधी सोपी पथ्ये आहेत. परस्परांच्या सुखदुःखाशी एकरूप झाले तरच ही पाळली जातात.ही पाळली गेली तरच मनात अढी बसत नाही,नात्याच्या वस्त्राच्या विणकामात गाठी पडत नाहीत. अशी संवेदनशीलता असेल तरच दुसऱ्याला समजून घेणे,ऐकून घेणेही घडते.

काही नाती जन्मताच मिळतात. काही नाती विवाहाने व त्यानंतर जीव जन्माला घालून आपण  निर्माण करतो. काही मैत्रीची, सख्यत्वाची नाती असतात. तर काही नाती कारणपरत्वे आयुष्यात ये-जा करणारी असतात. या सर्व प्रकारच्या नात्यात प्रत्येक व्यक्तीशी असणाऱ्या नात्याचे वस्त्र स्वतंत्र असते, त्याचे विणकाम स्वतंत्र असते. पण या प्रत्येक विणकामात गुंता,गाठी न होण्यासाठी वर सांगितलेली कौशल्ये आवश्यकच असतात. यासोबतच  अलिप्तता आणि भावनिक गुंतवणूक या दोन रंगांच्या धाग्यांपैकी कुठला धागा, कुठल्या वस्त्राच्या विणकामात जास्त वापरायचा?याचे विवेकी ज्ञान देखील आवश्यक आहे. कौशल्ये प्राप्त होऊनही या रंगांचे प्रमाण चुकले तरी फसगत होते. ‘मन नको त्यावरि बसते, मन स्वत: स्वत:चि फसते, नसत्याच्या धावे मागे’, असे होऊन बसते. यासाठी अलिप्तता आणि भावनिक गुंतवणूक यांचे योग्य प्रमाण ठेवण्याचे कौशल्यही आवश्यक आहे. काही नाती सुटावीशी वाटत असूनही सुटत नाहीत, तोडावीशी वाटत असूनही तोडता येत नाहीत. काही तुटतात, त्यातली काही पुन्हा येऊन जुळतात. नात्यांचे हे असेच असते,हेही समजून असले पाहिजे. सर्व कौशल्य आणि अलिप्तता-भावनिक गुंतवणुकीचे योग्य प्रमाण राखूनही नात्यांची वीण जुळत नसेल, जमत नसेल, तर  त्या नात्यांवर जास्त वेळ खर्च न करता ,काही काळ ती नाती आणि विणकाम बाजूला ठेवलेले बरे.

प्रत्येक नात्याच्या मधुमासाचा एक काळ असतो. काही नात्यात तो अल्पकाळ, तर काही नात्यात तो दीर्घकाळ चालतो. या सुरुवातीच्या मधुमासाच्या काळात परस्परांना समजून घेतले आणि ते नाते टिकविण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत, हे समजून घेऊन,प्राप्त करून घेऊन, योग्य प्रमाणात अलिप्तता आणि भावनिक गुंतवणूकीची गुंतवणूक केली तरच ती नाती मधुमास संपल्यावरही लाभदायी, आनंददायी ठरतात. असे होण्यासाठी  गुलजारांनी केलेली प्रार्थनाच आपणही विणकराला करू या. ‘प्रिय विणकरा, नात्याचे वस्त्र विणण्यासाठी तुझे कौशल्य आम्हाला तू शिकव.’

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments