कविराज विजय यशवंत सातपुते
विविधा
☆ निरोप तुजला देता… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
निरोप… हा शब्द उच्चारताच मन हेलावते. भावनांचा गहिवर आठवणींचा बांध फोडतो. सुखदुःखाचे सडा शिंपण सृजनाच्या पायघड्या घालते. वाईटातून चांगले घडते. मन मनाला समजावते. माणूस महत्वाचा. हे सूत्र लक्षात घेऊन काही आठवणी विसरायचा प्रयत्न करतो आणि निरोपाची घटिका समिप येते.
आयुष्यात वेळ प्रसंगी, कलाटणी देणाऱ्या प्रत्येक वळणावरती आपण सुख दुःखाची, अनेक शतके लिलया पार करतो.यावेळी अनेक व्यक्ती ,भावना, प्रसंग आपला निरोप घेतात आणि आपल्याच अंतरी आठवणी बनून विराजमान होतात.
निरोपाचे क्षण हा देखील आयुष्याच्या अविभाज्य भाग आहे त्यांचा उपभोग घेताना आपल्या इतर नात्यांवर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. आपले आणि पारीवारीक व्यक्तीशी जडलेले नाते हे.. भावनिक आणि शारीरिक असल्याने आपल्या कौटुंबिक जीवनाशी..स्वभावाशी अत्यंत निगडित असते.
आप्तेष्ट जिवलग व्यक्तीची साथ तुटावी,आणि पोरकेपणाची जाणिव ,दुर्देवी घेतलेला निरोप मन विषण्ण करते. मन विचलीत होते. निर्णय घेण्याची क्षमता क्षीण होते..अशा वेळी समाज मदतीला धावून येत़ो.
जाणारा केव्हाच दूरच्या प्रवासाला निघून गेलेला असतो. त्याने कधीच परलोकी चे हटके स्टेशन गाठलेले असते. कमावलेलं सारं काही इथंच असतं..जे आहे त्यात समाधान मानायचे ही शिकवण अशा वेळी कामी येते.
स्नैहमैत्रीचे, अनुभूतीचे नाते निरोप घेताना माणसाची सर्वंकष परीक्षा घेतात. त्याचं दुःखात वहावत जाणं,शोक करणं, इतकंच काय ,त्याचं सावरणं देखील त्याला निरोपाची भिती घालत रहातं.
इहलोकीचे ,अतूट बंधन, हळव्या ओल्या, विरह वेदना, समाचारात दिलेला दिलासा, जग रहाटीला सामोरं जाण्यासाठी रिती,रिवाज परंपरांचे बंधन घालतो. माणुस माणसाला निरोप देताना आठवणींच्या निजरूपानं त्यांनी त्या माणसाला काळजात बंदिस्त केलेलं असतं..त्याला मोकळं करणं अशावेळी अत्यंत गरजेचं असतं.त्यासाठी उत्तर कार्य विधी माणसाला माणसात रहाण्यासाठी मार्ग दाखवतात.
येणाऱ्या प्रत्येक दिवसाला सामोरे जाताना थोडे द्यायचे, थोडे घ्यायचे. देणा-याचे हात घ्यायचे हा निश्चय केला की जगणे सोपे होते. अनुभूती वेचताना प्रतिभा शक्ती जागृत होते. चारोळी, कथा, कविता, लेख कोणत्याही स्वरुपात ही अभिव्यक्ती व्यक्त होते. कौतुक आणि प्रोत्साहन ही गरज माणसाला माणूस करते. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद, समाधान मानायला शिकलं की मोठ मोठी संकटं, आपली गती धीमी करतात. “जोरका झटका धीरेसे लगे”.. याप्रमाणे काही आघात आपण सहन करतो ते या मुळेच. भाव फुलांचे,मोहरते क्षण दिठी मिठीचे, हळवे स्पंदन निरोपाचा क्षण संकलीत, संग्रहित करतात.
गतवर्षी अनेक संकल्प, योजना, उपक्रम यातून प्रेरणा मिळाली. अनेक साहित्यिक, सामाजिक,सांस्कृतिट संस्थांनी मला, माझ्यातल्या कवीला, माणसाला घडवले. अनेक नाती लाभली. एकमेकांवर जीवापाड प्रेम करताना रूसवा,राग, लोभ , आणि निर्व्याज प्रेम करीत गेलो.नव्याचा स्विकार करताना कोणाला कधी..? कसा निरोप द्यायचा हे वेळ, काळ, प्रसंगांनी शिकवलं..
या प्रवासात काही व्यक्तींच्या अतिशय जवळ गेलो. यश मिळवताना अनेकअपेक्षा ठेवल्या. अपेक्षा भंगाचे दुःख पचवले. पण कर्म फलाची अपेक्षा न ठेवल्याने जबाबदारी वाढत गेली. नवीन जबाबदारी स्वीकारताना काही चुका झाल्या. चुका निस्तरायला आपल्या माणसांनी दिलेला वेळ , निभावून नेलेले नाते ,दिलेली साथ.. यातून माझ्या सहित प्रत्येकाचे मुखवटे गळून पडले. माणूस माणसाच्या सोबत राहिला. आणि हीच सोबत कार्य प्रवणता , कार्यक्षमता, कलाकौशल्य वृद्धीगंत करते.
अशा वेळी कौतुकाची अपेक्षा आणि राग आपल्या जवळच्या माणसावर व्यक्त होते. चुकातून माणूस शिकतो. ही शिकवण सृजनाच्या पायवाटा सुजलाम सुफलाम करते. शब्द, स्वभाव आणि विश्वास आपल्यातला माणूस जिवंत ठेवतात. माणूस जपायला शिकलो तरच आपण आपली कला त्यातील बारकावे अधिक सखोलपणे शिकू शकतो. चारदोन कौतुकाच्या शब्दांनी किंवा ऑनलाईन स्पर्धात्मक प्रमाणपत्रांनी साहित्यिक घडत नाही. साहित्यिक तेव्हाच घडतो, जेव्हा “काय लिहायचं नाही ..?” हे त्याला उमगलेले असते. आणि काय लिहायचे नाही यासाठी स्पर्धा, उपक्रम यात प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे. स्पर्धेत सहभागी होताना, यश मिळाले नाही तर परीक्षकांना दोष देण्यापेक्षा आपली चूक आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर आपण आपला कला व्यासंग अधिक उत्तम प्रकारे जोपासू शकतो.
जोपर्यंत आपण आपल्या चुका मान्य करीत नाही तोपर्यंत आपली आकलन शक्ती प्रतिभा शक्तीला थोपवून धरते. हे थोपवून धरणे घातक ठरू शकते. प्रसिद्धी हव्यास आणि सदोष लेखन कमी करायचे असेल तर दैनंदिन लेखन व्यासंग अत्यंत गरजेचा आहे. माफ करा या शब्दांनी इतरांना दिलेले मोठेपण आपल्यातला कलाकार घडवीत जातो.
अनुभव हा एकमेव असा गुरू आहे कि जो आधी परिक्षा घेतो..आणि नंतर धडा शिकवतो. आपल्या अहंकाराला निरोप द्यायला शिकलो कि जिवनाच्यापरीक्षेत आपण उत्तम गुणांनी पास होतो.
दुसर्याला दिलेला आनंद, समाधान आपल्याला मोठे करतो हे मोठेपण माणसातला विवेक जागृत ठेवतं.. अशा विवेकी माणसांच्या ह्रदय कोंदणात निर्माण झालेले साहित्य… ही त्याची ओळख बनते. ही ओळख मी सातत्याने जपतो आहे. माणसांचे स्वभाव दोष समजून घेताना कदाचित मी देखिल चुकलो असेल पण ती चूक माफ करताच मी मला सावरू शकलो. मोठेपणा मिळवणे खूप सोपे आहे पण हा मोठेपणा टिकवून ठेवणे फार अवघड आहे. सतत नवनवीन साहित्य निर्मिती करायची असेल तर चुकांना निरोप आणि नव्या आव्हानांचा स्वीकार यशोमंदिराची वाट दाखवीत रहातो.
सरत्या वर्षाला निरोप देताना इतकच म्हणावसं वाटत –
☆ निरोप तुजला देता ☆
कुणीतरी येत, कुणीतरी जातं
स्वभाव तोच आठवण बदलते
आकडे तेच तिथी वार बदलेला
आठवणींचा ओला श्वास
पानापानावर थांबलेला.. !
शब्दाचं कुटुंब कागदावर सजलेलं
आठवणींच गोकुळ मनामध्ये नटलेलं
भूत, भविष्य, वर्तमान, पानामध्ये सामावलेलं
नवीन वर्ष, नवीन कॅलेंडर, प्रतिक्षेत थांबलेलं
निरोप आणि स्वागताला सदानकदा आसुसलेलं.. !
निरोप घेतोय..तो नववर्षाच्या भरभरून शुभेच्छा देऊन..चला तर मग तयार होऊ यात..नववर्षाच्या स्वागतासाठी..!
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈