सुश्री वर्षा बालगोपाल
विविधा
☆ निघाले आज स्मृतींच्या घरी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
खूप दिवसांनी रेडिओ लावला आणि रेडिओवर गाणे लागले होते निघाले आज तिकडच्या घरी…
लगेच डोळ्यासमोर निरोप घेणारी मुलगी तिला निरोप देणारे आई-वडील लग्न सोहळा एकाला निरोप देणे दुसऱ्याचे स्वागत करणे हे सगळे सगळे डोळ्यापुढे उभे राहिले…
दुसरे स्टेशन लावले तर ते इथे कोणाच्यातरी वाढदिवसाच्या कार्यक्रम चालू होता प्रत्येक जण गाण्यातून शुभेच्छा देत होता बार बार दिन ये आये बार बार दिल ये गाये तुम जियो हजारो साल ये मेरी है आरजू… पुन्हा विचार आला एक वर्ष संपून दुसऱ्या वर्षात पदार्पण केले म्हणून वाढदिवसाचे हे क्षण आनंदी उत्साही करून हा उत्सव साजरा करणे म्हणजे वाढदिवस…
पुन्हा स्टेशन बदलले आणि तेथे गाणे लागले होते आनेवाला पल जानेवाला है |हो सके तो इसमें जिंदगी बितादो पल ये भी जानेवाला है ||खरच सगळेच जाणारे असते ना?
तसेच आज ३१ डिसेंबर… २०२३ संपून २०२४ घेऊन येणारे काही भारीत क्षण. सरत्याला निरोप येणाऱ्याचे स्वागत. सासरी चाललेल्या मुलीला निरोप द्यायच्या वेळे सारखेच. किंवा वाढदिवसाच्या दिवशी पूर्ण झालेल्या वर्षांना धन्यवाद देऊन नवे वर्ष सुख शांती समृद्धीचे जावो म्हणून केलेले अभिष्टचिंतन हे आदर्श क्षण जसे आपण जगतो ना अगदी तसेच नव्या वर्षातील शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी जल्लोष हर्ष उल्हास यांनी सरत्या वर्षाला दिलेला निरोप आणि नव्याचे केलेले स्वागत यांचा एकत्र मिलाप.
किती भान हरपून मनात कुठलाच विचार न ठेवता सगळ्यांच्याच भावना साजरा करण्याच्या आंनदी असल्याने साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी आनंदाने भारलेले हे क्षण असतात.
मग मनात विचार आला फक्त ३१ डिसेंबरचे नव्हे तर रोजचा येणारा दिवस दिवसातील प्रत्येक सेकंद हा जाणारच असतो. हा क्षण आपल्याला आनेवाला पल जानेवाला है याचा संकेत देत असतो आणि ती वेळ निघाले आज स्मृतीच्या घरी असे सांगत असते. येणारा प्रत्येक क्षण आठवण होऊन मनात साठवायचा असेल तर फक्त ३१ डिसेंबरच नाही तर प्रत्येक क्षण साजरा करता यायला हवा.
वर्षातले सगळेच महिने, आठवडे दिवस, तास, मिनिटे, क्षण हे जाणारेच असतात तो प्रत्येक क्षण जाणार म्हणून दुःख आणि नवा येणार म्हणून आनंद अशा संमिश्र भावना असायला हव्यात फक्त ३१डिसेंबरलाच नको.
जेव्हा तुमच्या प्रत्येक क्षणात सकारात्मकता भरलेली असेल तेव्हा आता असणारा क्षण हा जाणारच असल्याने तोच क्षण जगून घ्यायची वृत्ती ठेवली तर जाणारे वर्षच फक्त निघाले आज स्मृतीच्या घरी असे न होता प्रत्येक क्षण तसा होईल.
मग जीवनातील प्रत्येक क्षण उत्सव होऊन राहील. तेव्हा नव्या वर्षाच्या प्रत्येक क्षणाचा उत्सव व्हावा या नव्या वर्षाच्या शुभेच्छा आणि सगळ्यांची वृत्ती अशी सदा हर्ष उल्हासाने भरलेली रहावी ही प्रार्थना 🙏
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈