सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ निरोप… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
तुला काय आणि कसं सांगू ? मला ना गेले सात-आठ दिवस सारखी हुरहूर लागून राहिलीय. अरे तू आता जाणार ना रे आम्हाला सोडून? खरं तर तू खूप मोठं सत्कार्य करायला निघालायस. आपल्या देशाच्या बॉर्डरचं रक्षण करायला निघालायस. केवढं मोठं जबाबदारीच आणि धाडसाचं काम आहे ना रे! पण तू शूरवीर आहेसच. म्हणूनच तर तुझं नाव रणवीर ठेवलय ना! तू मोठं आणि अवघड काम करायला निघालायस. तरीपण आपली ताटातूट होणार, हा विचारही बेचैन करतोय. सारखं डोळ्यातून पाणी येतय रे. किती लळा लावलायस आम्हाला सगळ्यांना. रोज तुझ्या आवडीचे काही ना काही करते, आणि तू आवडीने खातोयस ना, बरं वाटतंय बघ मला. अरे, रणवीर परवा आपल्याकडे ते बॉस आले होते ना, ते तुला किती काम सांगत होते. आणि खरंच त्यांनी सांगितलेली कामं तू अगदी मनापासून करत होतास. त्यामुळे तुझ्यावर बेहद खुश झालेत ते. तेही येतील तुझ्याबरोबर कदाचित. खरं तर तुला सांगायची गरज नाहीये. पण तरीही सांगावसं वाटतं ना!
हे बघ ,भारत मातेचे नाव घ्यायचं . ” भारत माता की जय” म्हणायचं .आणि जोरदार आक्रमण करून ,आतंकवाद्यांना चांगलं लोळवायचं .वीरचक्र ,शौर्य चक्र मिळवायचं. आणि तुझं ‘रणवीर ‘ हे नाव सार्थकी करायचं. तुझी शौर्याचे गाथा आम्ही ऐकली ना ,की ऊर भरून येईल आमचा. अभिमान वाटेल तुझा आम्हाला
आता तुला बरोबर काय काय द्यायच बरं? इकड ये जरा. मला ना तुझ्या चेहऱ्यावरून ,पाठीवरून हात फिरवायचाय . आशीर्वाद देणार आहेत सगळेजण तुला. तू असा गप्प गप्प का रे? तुला पण आता आम्हाला सोडून जाणार, म्हणून कसं तरी वाटतंय का ? आता काही नाही . हसत हसत सगळ्यांशी बोल बघू.
उँ, उँ , उँ, हं ,हं,भुः, भुः, भुःभुः
आमचे स्नेही आचार्य यांनी आपले तीन महिन्यांचे लाब्राडोर जातीचे पिल्लू, देश कार्यासाठी आर्मीच्या डॉग स्कॉड कडे सुपूर्त केले . त्यांची पत्नी श्री रंजनी हिच्या मनातल्या निरोपाच्या प्रेमळ भावभावना.
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈