विविधा
☆ नाती अपडेट व्हायला हवीत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆
नेहमीप्रमाणे आठवड्यातून मी घरी जात असतो तसाच कालही गेलो. घरी आलो की सगळी दुनिया विसरून मी माझ्या दोन वाघांशी म्हणजे माझ्या निर्भय आणि शार्दुल सोबत मस्त रमून जातो. गेल्या गेल्या असाच रमून गेलो. बायकोने चहा दिला. चहा घेत असताना आमची दिदी आली, दिदी म्हणजे माझ्या मोठ्या भावाची मुलगी. तसा तो चुलत भाऊ पण मला सख्खा भाऊ नसल्यामुळे माझी सगळी चुलत भावंडे मी सख्ख्यासारखी ठेवली आहेत. भावांची बहिणींची सगळी लेकरं मला तात्या म्हणूनच बोलतात.
दिदी तसच मला पाहून जोरात आनंदाने ओरडली.”अय्या तात्या कधी आलायस, बरा आहेस का? असं म्हणत जवळ येऊन बसली आणि म्हणली, ”तात्या अरे पुढच्या महिन्यात लग्नाची तारीख काढायची म्हणतायत पप्पा. ”मी या दोन वाघांना मिठीत घेऊन रमून गेलो होतो तिच्या या वाक्याने मी थोडासा गडबडलो. मी म्हणलं दिदी कुणाचं गं लग्न? दिदीने सांगितलं तिचंच लग्न म्हणून आणि फलटण चे पाहुणे आहेत. सगळं ठरवून झालं आहे तात्या फक्त तारीख काढायची बाकी आहे. आणि तू हवा आहेस इथं, सुट्टी घे. बाकीचे कोणते कार्यक्रम घेऊ नकोस. दिदी हे बोलत होती आणि मी आतून घायाळ होत चाललो होतो. कारण यातलं एक टक्कासुद्धा माझ्या कानावर आलेलं नव्हतं. मी बायकोला जोरात आवाज देऊन बाहेर बोलावलं आणि रागाने विचारलं, की घरातली एवढी महत्वाची गोष्ट तू मला का सांगितली नाहीस. तर तिलाही यातलं काही माहीत नव्हतं. मला प्रचंड आतून वेदना होत होत्या. मी यांचा कुणीच नाहीय का? म्हणून आतून हुंदकत होतो. त्याच तंद्रीत पायात चप्पल घातली आणि थेट त्याच्या घरी. जेमतेम दहा मिनिटांचं पावली अंतर आमच्या दोन घरांमध्ये.
आमचं गाव असल्यामुळे घराची दारे बंद नसतात, की दारावर बेल वैगेरे नसते. थेट घरात घुसलो तर हा मोठा भाऊ आमचा नुकताच जेवायला बसला होता. मी कसलाही विचार न करता त्याला एवढंच म्हणलं. ”का रे दादा आपल्या दीदीला पाहुणे येऊन पसंत करून गेले. सगळी बोलणीसुद्धा झाली. फक्त तारीख काढायची राहिलीय आणि यातलं आम्हाला कुणालाच माहीत नाही असं का.? तर मला म्हणाला,”तुम्हाला कुणाला आमची काळजी आहे का.? तुम्हाला कुणाला आमचं चांगलं झाल्याचं बघवतच नाही. त्याच्या या बोलण्याने मी कोसळून गेलो. ”मी म्हणलं अरे आम्हाला कळलं तर आम्ही येणार ना. तर तो रागाने एकटक माझ्याकडे पाहत म्हणाला, नितीनराव आठ दिवसांपूर्वी मी तुला व्हाट्सअप्प ला मॅसेज करून ठेवलाय की दिदीला फलटणचे पाहुणे बघायला येणार आहेत म्हणून आणि तू अजूनही तो मॅसेज साधा वाचला सुद्धा नाहींयस. मी रोज पाहतोय तू ऑनलाईन असतोस पण माझा मॅसेज तू वाचत नाहींयस.
तातडीने मी माझा मोबाईल खिशातून बाहेर काढला, प्रिय दादा म्हणून त्याच्यासमोर नाव सर्च केलं आणि व्हाट्सअप्प ला पाहिलं तर खरोखर त्याने मला आठ दिवसापूर्वी तसा मॅसेज पाठवला होता. मी त्याच्याकडे नजर उचलून पाहिलं. तर, आता तुझ्यात आणि माझ्यात कसलेच नाते उरले नाही असा काही त्याच्या चेहऱ्यावरचा अनोळखी भाव पाहून मला त्याची अक्षरशः किव आली.
मग मी बोलायला सुरवता केली, की, ”दादा कामाच्या घाईत व्हाट्सअप्प वर येणारे प्रत्येक मॅसेज प्रत्येकजण आवर्जून वाचतोच असे नाही. मोबाईल काय माझ्या शरीराचा अवयव नाहीय दादा. त्यावर काही आलं की लगेच माझ्या मेंदूशी कनेक्ट होत नसते. आपलं घर लांब नव्हतं. तुझ्या बायकोने येऊन सांगायला हवं होतं किंवा साधा एखादा फोन तरी करायचा ना निदान, तुझा आवाज कानातून मेंदूत तरी गेला असता. तू व्हाट्सअप्प वरून मला कळवलं म्हणजे तू तुझं नात्यातील कर्तव्य पार पाडलं असं वाटलं का तुला? आणि तो माझ्याकडून मॅसेज वाचायचं राहून गेलं म्हणून तू इतक्या टोकाचे बोलतोय की बस्स आपल्यात आता काहीच नातं नाही राहिलं. मग तस असेल तर आम्हीही व्हाट्सअप वरूनच अक्षता पाठवतो, त्या दिवशी हवं तर दिदीचा फोटो dp ला ठेवतो. तू तिकडून आम्हाला जेवणाचं ताट पाठव चालेल ना दादा हे, ’यावर जरा तो गार पडला. मी प्रचंड अस्वस्थ होतो. ”माझ्या भावाच्या मुलीच्या लग्नात वरातीत मित्रांना घेऊन तंगड्या वर करून नाचायचं स्वप्न पाहणारा मी. नसेल माझी परिस्थिती सध्या तुझं ओझं उचलण्याची पण कुठूनतरी हप्त्यावर का होईना निदान एक गोदरेजचं कपाट तरी मी घेतलंच असतं की रे माझ्या दीदीसाठी. लग्नाच्या मांडवात पंगतीला भात वाढण्याची स्वप्न पाहणारा हा तुझा भाऊ केवळ तुझा व्हाट्सअप्प चा मॅसेज मी वाचला नाही म्हणून तुला इतका परका वाटायला लागला का रे? हे व्हाट्सअप्प इतकं महत्वाचं झालं का? “ हे व्हाट्सअप कधी आलं? तुझा माझा संवाद साधण्यासाठी आपल्याला याची गरज पडावी? ”एखादी साधी गोष्ट असती तर मी समजून घेतलं असतं पण, आयुष्यातली इतकी महत्वाची गोष्ट तू समोरासमोर माझ्याशी न बोलता या माध्यमातून सांगू पाहत होतास.?
दादा वयाने मोठा आहे. माझ्या बोलण्यावर तो मान खाली घालून उभा होता. त्याची चूक त्याला कळली होती. पण खरंतर तो चुकीचा नव्हताच. तो डिजिटल होता होता इतका गुंतून गेला की नातीसुद्धा त्यावरच टिकवू पाहायला लागला. दोघांच्याही डोळ्यात गच्च पाणी भरून आलं होतं. तसाच त्याला जोरात आवळून मिठीत घेतला. मिठीत येत फक्त एवढंच म्हणाला, नितीन सॉरी भावा, चुकलं, आज कळलं आयुष्यात की तू कवी का आहेस ते.
घट्ट झालेली मिठी मी डोळे पुसत पुसत सैल केली. हातात मोबाईल घेतला. नेट सुरू केलं. व्हाट्सअप्प उघडलं आणि नाव पुन्हा सर्च केलं प्रिय दादा. तो हे पाहतच होता. दोघांचेही डोळे ओसंडून वाहत होते आणि मी त्याच्यासमोर त्याला तिथून कायमचं ब्लॉक केलं आणि एवढंच म्हणलं, आयुष्यातली सगळी सुख दुःखे समोरासमोर भेटून बोलत जाऊया, हात हातात धरून संवाद साधत राहूया, आपल्या नात्यात संवाद साधण्यासाठी असल्या कुठल्याच माध्यमाची आपल्याला गरज पडता कामा नये, असं म्हणत दोघेही एका ताटात जेवलो. इथं सेल्फी काढावा वाटला मला पण तो मोह आवरला. तसाच मी माझ्या घरी आलो आणि तो त्याच्या घरी राहिला.
आज कायमचं अंतर वाढत जाणार होतं. मी अंतर वाढवणाऱ्या गोष्टीच संपवून टाकल्या.
मित्रांनो संवाद साधणारी माध्यमे आज प्रत्येक घरात आहेत. आपण याच्याशी कनेक्ट झालोय. जग जवळ आल्याची फिलिंग आपण अनुभवत असताना आपली नाती दुरावत तर चालली नाहीत ना? याचे भान आपल्या प्रत्येकाला असायला हवे म्हणूनच हे लिहावं वाटलं मला.
खालील कवितेच्या ओळी माझ्या मनाचा अंतरंग अक्षरशः ढवळून काढत आहेत त्या ओळी ………
एकविसाव्या विज्ञान युगात
ही केवढी मोठी घोडचूक
रक्ताच्या नात्यालाही आज
लागते व्हाट्सअप आणि फेसबुक….
आणि खरं सांगू तुम्हाला,
खरच आपली जेवढी रक्ताची, जवळची, जी आपली असणारी माणसं, जिथं खरंच या लोकांशी समोरासमोर हातात हात घेऊन संवाद व्हायला हवा असं वाटणारी माणसं जी आहेत ना, त्यांना व्हाट्सअप वरून कायमचं ब्लॉक करा. काळजाचा डेटा कायम चालू ठेवा. तिथून ही नाती कधीच ब्लॉक होऊ देऊ नका. एकमेकांशी संवाद साधत, डिजिटल होता होता नाती जपता जपता आनंदाने जगता येईल आपण तसे जगुया.
लेखक – अनामिक
संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈