सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी – भाग १ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्राप्त निबंध)
गंगेच, यमुनेचैव, गोदावरी सरस्वती।
नर्मदे , सिंधू ,कावेरी ,जलेस्मिन संन्निधिं कुरु ।।
दररोज सकाळी देवाची पूजा करत असताना, देवा जवळच्या कलशात सर्व नद्यांना आपण आवाहन करतो. त्यावरूनच नदीचे महत्व किती आणि कसं असतं पहा बरं!
पण आज ती व्यथित आणि दुःखी झालीय . तिची व्यथा कोणी तिर्हायितानी सांगण्यापेक्षा तिने स्वतः सांगितली तर ते जास्त सयुक्तिक ठरेल. आणि मग तिच्या व्यथेवरील उपचार, व्यष्टी ते समष्टी पर्यंत कसे आणि काय करायचे याचा विचार करावा लागेल .ती स्वतःची महानता प्रथम सांगायला लागली .भारतीय संस्कृतीमध्ये आम्हाला देवत्व दिलं.राष्ट्रगीतातही नावं घेतली. ऋग्वेदामध्ये आमच्या अनेक प्रार्थना आहेत. आम्हाला केवळ पाण्याचा प्रवाह न मानता, ईश्वरी तत्त्वाचा अविष्कार , देवता स्वरूप मानून, मंदिरं बांधली. मानव, प्राणी, पक्षी, जंगलं, शेती, वीज निर्मिती, जल पर्यटन किती किती सांगू ! या सगळ्यांच्या जीवनदायीनी आहोत आम्ही! स्कंद पुरणात एक श्लोक आहे”, न विभाती नदी हीनो पृथ्वीय भूसुरत्तमं। नदीहीनो हय्यं देश प्रसिद्धोपि न शोभते”।। देशातल्या जणू रक्तवाहिन्या आहोत आम्ही.
पण हाय ,हाय! ही सगळी माझी महानता असली तरी आज माझी काय दूरदशा आहे, असं म्हणण्यापेक्षा, या माणसाने काय दुर्दशा केलीये असं म्हणावं लागेल .मी, आम्ही अमृत गंगा. पण घाणीची अंघोळ घालून विषगंगा करून टाकलय आम्हाला .त्यामुळे माझ्या अंगा खांद्यावर खेळणारे मासे, कासव, मगरी, वगैरे जलचर आजारी पडून मरत आहेत. आणि ते खाऊन माणसंही मेंदू आणि पोटाच्या विकाराने आजारी पडत आहेत. चार लाख लोक मृत्यू पावत आहेत. आणि ही गोष्ट डब्ल्यू. एच. ओ. चा अहवालच सांगतो. शहरांमधली विसर्जित केलेली घाण, कचरा ,औद्योगिक उत्सर्जक वस्तू, किरणोत्सारी पदार्थ माझ्या पोटात टाकून माझी नरकावस्था करून टाकलीय. कुठवर सहन करू मी हे सगळं? 2009 मध्ये केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालात माझ्यासह दीडशे अशा माझ्या भगिनी प्रदूषित असल्याच सांगितलंय. आणि 2019 मध्ये ती संख्या 300 इतकी झाली . हे चित्र जीवसृष्टीचा संकट काळ जवळ येत असल्यासच आहे ना? मला माणसाला विचारावसं वाटतं, “तुमची जीवनदायी मी माझे उपकार फेडणार, कृतज्ञ होणार, की माझ्या अस्तित्वाशीच खेळणार रे ? माझ्या अस्तित्वाची भवितव्याची मला घोर काळजी लागलीय.
क्रमशः…
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈