श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
विविधा
☆ ‘नागपंचमी…‘ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
सनातन वैदिक हिंदू धर्म हा एकमेवाद्वितीय आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सर्व सण/उत्सव हे विज्ञानावर तरी आधारित आहे किंवा कर्तव्यावर. ‘कृतज्ञता’ हा हिंदू संस्कृतीचा आत्मा आहे. निव्वळ ‘सोहळा’ (इव्हेंट) साजरा करणे हा कोणत्याही सणांचा किंवा उत्सवाचा हेतू खचितच नाही. नागपंचमी सुद्धा त्यास अपवाद नाही. एकच चैतन्य सर्व प्राणीमात्रांत भरून राहिले आहे, यावर हिंदू धर्माचा नुसता विश्वास नाही तर तशी पक्की धारणा आहे. हिंदू धर्मियांनी ‘तसे’ आचरण करून दाखविले आहे, असे आपल्या लक्षात येईल. ही परंपरा खूप प्राचीन आहे. त्याकाळात दळणवळणाची, संपर्काची अल्पसाधने असतानाही तत्कालीन समाज व्यवस्थेने ही परंपरा रुजवली, सांभाळली आणि वृद्धिंगत केली. याबद्दल आपण सर्वांनी आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यावश्यक आहे. आज मात्र ही हजारो / लाखो वर्षांची परंपरा कुठेतरी शीण होते की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. ब्रिटिशांना जे त्यांच्या सुमारे दीडशे वर्षांच्या राजवटीत जमले नाही ते मात्र त्यांनी घालून दिलेल्या शिक्षणपद्धतीने सत्तर वर्षात करून दाखविले आहे असे खेदाने नमूद करावे लागत आहे. एका अर्थाने आज हिंदू धर्म हा अप्रागतिक, बुरसटलेल्या विचारांचा आणि एकूणच मागासलेला आहे असा जो प्रचार सर्वच माध्यमांतून चालू आहे त्यास प्रत्युत्तर देणे हा या लेखनाचा हेतू निश्चित आहे, पण तो गौण आहे. या लेखाचा मूळ हेतू हा आहे की आपला हिंदू धर्म हा विश्वातील सर्व धर्मांमध्ये वैज्ञानिकता आणि कृतज्ञता याबाबतीत सर्वश्रेष्ठ आहे आणि तसे आपण साभिमानाने जगास सांगितले पाहिजे. आज त्याची नितांत गरज आहे.
हिंदू धर्मात पशुपक्षांचीही कृतज्ञभावाने पूजा करण्याची पद्धत आहे, परंपरा आहे. गायीवासरांसाठी ‘वसुबारस’, शेतीच्या कामास उपयुक्त ठरणाऱ्या बैलांसाठी ‘बैलपोळा’, मधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या कोकिळेसाठी ‘कोकिळाव्रत’ तर शेतीचे उंदरांपासून आणि इतर किटकांपासून संरक्षण करणाऱ्या नागांसाठी ‘नागपंचमी’, वनरक्षणासाठी ‘वटपौर्णिमा’, अशा प्रमुख सणांचा उल्लेख करता येईल. नागांचा इतिहास मनुष्याइतकाच पुरातन आहे असे म्हणता येईल. साक्षात देवाधिदेव महादेव यांनी नागाला आपल्या कंठी धारण केलेले आहे. कृष्णलीलांमध्ये कालिया मर्दन प्रसिद्ध आहे. त्यानंतर मंगलमूर्ती गणपतीच्या कमरेत नाग आहे, तर सर्व सृष्टीचे पालक भगवान विष्णू हे स्वतः शेषशायी निवास करतात. रामावतार आणि कृष्णवतारात स्वतः शेषनाग भगवंताचे एकदा ज्येष्ठ बंधू झाले तर एकदा कनिष्ठ बंधू झाले. नागास शेतकऱ्यांचा मित्र असेही म्हणतात. सरपटणाऱ्या प्राण्यांचे राजे हे ‘नागराज’ असावेत. राजाचा मान केला की स्वाभाविकपणे तो आपसूकच प्रजाजनांचाही होतो. या दृष्टीने विचार करता नाग हा आपल्या संस्कृतीचा तसेच आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे.
नाग देवता आणि त्यांची प्रजा यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. वडाच्या फांद्या तोडून पूजा करणे आणि नागोबाला पकडून त्याची पूजा करणे हे दोन्ही एकाच प्रकारचे आहे आणि दोन्हीही त्याज्यच आहे. भले साप दूध पीत नसेल, नागाणे खात नसेल, पण त्यामागील मुख्य हेतू अथवा मर्म लक्षात न घेता मी त्यावर टीका करणार नाही, आपल्याच परंपरांची खिल्ली उडवणार नाही, असे आज प्रत्येकाने ठरवण्याची गरज आहे. हा सण श्रावणात येतो. या महिन्यात हवा सारखी बदलत असते, पोटातील वैश्वानर थोडा मंद असतो, म्हणून भाजलेले कडधान्य, दूध, लाह्या इ. पदार्थ पचावयास हलके आणि पौष्टिक असतात. म्हणून ते नागाला वाहण्याची पद्धत असावी. दुर्वा ही औषधी वनस्पती आहे. ती सुद्धा नागास वाहिली जाते. त्यानिमित्ताने दुर्वा दारी राहतील असाही प्रयत्न असावा. कृषिप्रधान देशात कृषिला उपयुक्त ठरणाऱ्या सर्व भूतमात्रांचे मनुष्याने ऋणी असणे अत्यंत गरजेचे आहे असे मला वाटते.
नाग, सापांची उपयुक्तता घरोघरी, शाळा, महाविद्यालये यांच्यामध्ये जाऊन सांगितली पाहिजे. नागांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. हरित क्रांतीची मनीषा पूर्ण व्हायची तर उंदरांच्या पोटात जाणारे धान्य वाचवावे लागेल. प्रत्येक तीन पोत्यापैकी एक पोते उंदीर खातात. म्हणूनच नागपंचमीचे आधुनिक व्रत ‘धामण पाळा नि धान्योत्पादन वाढवा’ अशा उद्घोषणाबरोबरच ते कृतीतूनही व्हायला हवे. तरारून आलेल्या शेताकडे पाहून कृषी कन्यांना केवढा आनंद होतो ! मग त्या भविष्याची सुख- स्वप्ने पाहात उंच उंच झोके घेतात व हा सण साजरा करतात. या काळात मुलांनी मैदानी खेळ खेळावे अशी जुनी प्रथा आहे. त्यासाठी मैदानी खेळांच्या स्पर्धा भरविण्याचा संकल्प श्रावणात धरावा व चातुर्मासात पूर्ण करावा. पर्यावरण संतुलन करण्यामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांचा अर्थात नागदेवतेचा मोठा वाटा आहे. निसर्गात प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून आहे. ही एक जीवनसाखळी आहे. यातील एक दुवा जरी निस्टला तरी पूर्ण साखळी तुटते. आज पर्यावरणाची जी गंभीर समस्या निर्माण झाली आहे त्यामागे या ‘साखळी’चा कमकुवतपणा कारणीभूत आहे. याबाबतीत आज ‘सर्पमित्र’ अतिशय जबाबदारीने कार्य करीत आहेत. आजच्या मंगलदिनी त्यांचेही कौतुक करायला हवे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त करायला हवी. सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल आदर करण्यासाठी घरांमधून कापणे, चिरणे आदी आजच्या दिनी वर्ज्य केले जाते. शेतकरी आजच्या दिवशी जमीन नांगरत नाहीत, एकूणच शेतीच्या कामांना सुट्टी असते.
याबाबत काही पौराणिक कथाही सांगितल्या जातात. विस्तार भयास्तव त्या इथे देत नाही. आपण सर्वांनी नागपंचमीचे महत्व समजून घेऊ आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी या सरपटणाऱ्या प्राण्यांची हत्या न करण्याचा संकल्प करू आणि खऱ्या अर्थाने नागपंचमी साजरी करू.
आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय।
जय नागराज।
© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈