कविराज विजय यशवंत सातपुते
विविधा
☆ नाती आणि विश्वास… भाग-१ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
आयुष्यात शिक्षण, संस्कार, प्राथमिक मुलभूत गरजा यांच्या सोबतीने आवश्यक असते ती म्हणजे आपण जोडलेली, निभावलेली नाती. ही नातीच आपला समाज असतो. या समाजाचं आपण काही ना काही देणं लागतो.
पैसा आयुष्यात जितका महत्त्वाचा आहे तितकीच नाती आणि जिवाभिवाची माणसं देखील महत्वाची आहेत. माणसाचं माणूस पण, माणुसकी जपणारी ही नातीच त्याचं समाजातील अस्तित्व ठरवतात.
अमली पदार्थ सेवन, व्याभिचार या वैयक्तिक बाबी आहेत. त्याचा अतिरेक किंवा लपवा छपवी नात्यात अत्यंत घातक असते. “जसा बाप तसा बेटा” ही म्हण कायमच चांगल्या अर्थाने वापरात यायला हवी.
आपल्या मुलानं तरी आपण केलेल्या चुका करून इतरांची मने दुखावू नयेत या करिता आपण आपली वागणूक, वर्तन, व्यवहार आदर्श वत असावा.
आपण कुणाचा आदर्श घ्यायचा? कुणाचा आदर्श समोर ठेवायचा? आपली जबाबदारी ,आपली कर्तव्ये हे सारे जर आपण आपल्या आर्थिक परिस्थितीशी निगडीत केले तर हा गुंता सोडवायला अतिशय कठीण जाईल.
आपण आणि आपली जबाबदारी यात जोपर्यंत ”आई बाबा ‘, यांचा समावेश होत नाही तोपर्यंत ही पळवाट आडवाटेनं या समाज व्यवस्थेला , कुटुंब व्यवस्थेला दुर्बल करीत रहाणार यात शंका नाही.
विश्वास हा दोघांचा दोघांवर, दोन्ही कडून तितकाच दृढ असायला हवा. नात्यात हा विश्वास पटवून देण्यासाठी कींवा संशयास्पद वातावरण निर्मिती साठी,नात्यात कटूता, संशय, सामंजस्य निर्माण होण्यासाठी,तिसऱ्या व्यक्तीची गरज लागावी यांसारखे दुर्दैव नाही. नात्यात पारदर्शकता असेल संशय, अविश्वास निर्माण होत नाही आणि जर झालाच तर तो वेळीच निराकरण होणे अत्यंत गरजेचे असते अन्यथा नाते संपुष्टात येते. नात्यात बदली माणूस येऊ शकतो पण तो आपल्या माणसाची जागा घेईलच असं नाही. आपण आपल्या कुटुंबास जसे वागवतो तसेच आपली पुढची पिढी त्याच्या कुटुंबाशी, समाजाशी वागणार आहे याचा विचार करून आपण आपले वागणे ठेवायला हवे.
“मी माझ्या माणसांचा आहे, घरातील बाई माणूस माझ्या कुटुंबाचा घटक आहे त्याच मन जपणे ही माझी जबाबदारी, आद्यकर्तव्य आहे…” हे जोपर्यंत पुरुष प्रधान संस्कृती मान्य करीत नाही तोपर्यंत ही पळवाट अशीच निघत रहाणार. आपण घडायचं की आपण बिघडायचं ..? घरातल्या स्री ला आधार द्यायचा की , आपल्या संशयास्पद वागणुकीचा भार व्हायचं हे आता ज्याचं त्यानचं ठरवायचं. ..!
पुरूषाला मैत्रीणी आणि स्त्रियांना विवाहोत्तर मित्र जरूर असावेत..पण त्यात दोन्ही बाजूंनी पारदर्शकता असावी..! “मी सांगतो आहे तेच खरं आहे.. तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव” असं सांगून जर आपण असत्याचा आधार घेतला तर आपण इतरांना नाही पण स्वतः ची मात्र अवश्य फसवणूक करतो.
आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकावर खोटं बोलण्याची वेळ येते.. काही वेळा इतरांचे मन जपण्यासाठी ते आवश्यक देखील असते..पण या खोट्या ची बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला सवय होऊ नये हे पथ्य पाळायला हवे.
पती पत्नीच्या नात्यात विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रेमापोटी नात्यातील एकच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या सर्व चुका माफ करत असेल,त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला सत्य मानून त्यावर विश्वास ठेवत असेल तर त्या व्यक्तीचा विश्वासघात होऊ नये याची काळजी दुसऱ्या व्यक्तीने घ्यायला हवी. आपले गृहस्थ जीवन जितके सुखी, आनंदी, समाधानी असेल,तितके आपण जीवनात यशस्वी होतो. आपल्या मनात येईल तसे वागणे, भरपूर पैसा कमावणे,आपली व्यसने जोपासणे, उच्च शिक्षण घेऊन विशिष्ट समाजात नाव लौकीक निर्माण करणे म्हणजे यशस्वी जीवन नव्हे.. “आपल्या मनातली माणूसकी इतरांच्या मनात अबाधित रहाणं” हे यशस्वी जगण्याचं खरं सूत्र आहे.
आई वडील जन्म भर पुरत नाहीत पण आईवडिलांनी केलेले संस्कार आपण आपल्या पुढील पिढीला समर्पित करणे आपले आद्य कर्तव्य आहे.
आपल्या वडिलांच्या दुर्गुणांचा त्याग करून त्यांच्या मधील सद्गुणी वारसा उचलणे जास्त हितकारक असते.
“आपलं ठेवायचं झाकून.. अन् दुसऱ्याचं पहायचं वाकून” ही मानसिकता बदलायला हवी. मैत्री च्या नात्यात तर (पारदर्शकता,) प्रेम आणि विश्वास हेच त्या नात्यांचे श्वाच्छोश्वास ठरतात. मैत्री त अशी काही गुपिते जिवापाड जपली जातात जी, जीव गेला तरी एकमेकांच्या ओठांवर येतं नाहीत.वेळप्रसंगी असे मित्र आपल्या कठीण काळात आपले आधार ठरतात. अशा मित्रांना कधीही विसरू नये. असा मित्र रागावला तरी तोच आपला खरा, सच्चा नातेवाईक असतो.कारण त्याचा राग म्हणजे दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वतः ला करून घेतलेली शिक्षा असते. जिथे जिवापाड प्रेम असते.. नात्यात तिथेच राग ही असतोच.
मी मध्यंतरी वाचले होते,
“मनुष्याचा पृथ्वीतलावरचा प्रवास संपला की त्याच्या गुणकर्मास आठवून इष्टमित्र व नातेवाइकांस अश्रू अनावर होतात. हे स्वाभाविकही आहे. ज्याच्याबरोबर खेळलो, बागडलो, सुख-दु:खाचे अनेक प्रसंग वाटून घेतले तो आयुष्याचा साथीदार जर निघून गेला तर दु:खाचा बांध फुटतोच*
परंतु ज्याचे कुणीच नाही, ज्याने जगताना सुख-दु:ख कधी वाटून घेतले नाही, कुणाच्या हाकेला कधी धावून गेला नाही अशा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर रडायचे कुणी? पण कुणीतरी गेल्यावर,कुणीतरी रडणे ही तर एक जगरहाटी आहे. म्हणून निव्वळ यासाठी तरी नाती जोडा नाती जपा….!!!”
माणसाच्या माघारी कोण त्यांच्या साठी किती रडला,कसा रडला यापेक्षा तो कसा जगला..कसा होता याच्या आठवणी माणसाला जास्त रडवतात.माणसाचं माणूसपण त्याच्या खरे पणाने सिद्ध होत.त्यानं नात्यात केलेल्या आर्थिक उलाढाली वर नाही. हिशोब कागदावर रहातो.पण नाती मनात कायम जिवंत रहातात.. अगदी कोणी कितीही दूर गेला तरी मनात जोडलेली नाती मनात कायम रहातात. कारण त्या व्यक्तीनं दिलेलं प्रेम, विश्वास, आपलेपणा आणि निभावलेलं नातं यांवर त्याच, तिचं नातं अबाधित रहातं.
अतिशय सुंदर असा संदेश यातून दिला गेला. कुटुंबातील व्यक्ती हाच आपला एकमेव आधार आहे . “आपल्या कुटुंबातील माणसांना आपण आपला वेळ द्यायला हवा” आपण हा सल्ला इतरांना देताना आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी विश्वास पात्र आहोत का..? “आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींना किती विश्वासात घेतो, किती वेळ देतो..?” तसेच आपण, “आपल्या पत्नीला/पतीला, मुलांना आपण समाधानी,खूष ठेवले आहे का..?” याचा विचार प्रत्येक पुरुषाने/स्त्रीने नाती निभावताना करायला हवा.
– क्रमशः भाग पहिला
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈