श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ नाटक…एक अपूर्व योगायोग..! ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

अगदी न कळत्या वयापासून एक प्रेक्षक म्हणून माझ्या जडणघडणीला सुरुवात झाली त्याला निमित्त ठरलं ते किर्लोस्करवाडीत व्यतित झालेलं माझं बालपण.किर्लोस्करवाडी ही टुमदार काॅलनी.तिथल्या सांस्कृतिक आणि संस्कारक्षम वातावरणातील मोकळे श्वास हेच आमचं (त्या काळातही बाहेरच्या जगात अप्राप्य असणारं) वैभव होतं.माझ्या मनात रुजलेली नाटकाची आवड ही त्या वैभवाचीच देन..!

त्या टुमदार काॅलनीत सुरक्षाव्यवस्थेचा भाग म्हणून बाहेरच्या कुणाचाच परवानगीशिवाय वावर नसे.घरी येणाऱ्या पाहुण्यांनासुध्दा संपूर्ण चौकशी होऊन व रजिस्टरमधे सविस्तर नोंदी करुन घेऊन मगच प्रवेश दिला जात असे.अशा वातावरणामुळे स्थानिकांच्या करमणुकीचं कोणतंच साधन तिथं उपलब्ध नव्हतं.सिनेमा पहायलाही शेजारच्या रामानंदनगरच्या तंबूमधे(टूरिंग टाॅकीज)जावं लागे.तेव्हा रेडिओही घरोघरी नसायचे.

यामुळेच काॅलनीतील नागरीकांची सांस्कृतिक गरज लक्षात घेऊन किर्लोस्कर व्यवस्थापनातर्फे पुण्यामुंबईतील व्यावसायिक नाटक कंपन्यांची नाटके निमंत्रित करुन त्याचे खास प्रयोग आम्हाला विनामूल्य दाखवले जायचे.त्या विद्यार्थी दशेत  तिथे पाहिलेली बाळ कोल्हटकरांची ‘वेगळं व्हायचंय मला’,’दुरितांचे तिमिर जावो’,बाबुराव गोखल्यांची ‘करायला गेलो एक’, ‘व-हाडी मानसं’ अशी कितीतरी नाटकं आजही मी विसरलेलो नाहीय.

शेजारच्या कुंडल या गावी त्याकाळी खूप प्रसिध्द असलेली ‘आनंद संगीत मंडळी’ नावाची एक नाटककंपनी होती.खरंतर नाटककंपनी ही संकल्पना नुकतीच लयाला गेलेल्या त्या काळात ही ‘आनंद संगीत मंडळी’ मात्र अद्याप आपला आब राखून कार्यरत होती.किर्लोस्करांतर्फे दरवर्षी आमंत्रित केल्या जाणाऱ्या या कंपनीचा तिथे सलग आठ दिवस मुक्काम असे आणि तो मुक्काम म्हणजे आमच्यासाठी गाजलेल्या संगीत नाटकांची पर्वणी..!माझी पुण्यप्रभाव, मंदारमाला,एकच प्याला सारख्या

सगळ्या गाजलेल्या संगीत नाटकांशी ओळख त्यामुळेच होऊ शकली.

बाबूराव गोखल्यांच्या ‘श्री स्टार्स’या संस्थेचं एक ठळक वैशिष्ठ म्हणजे त्यांच्या जाहिरातीतून जाहीर केली जाणारी नाटक सुरु होण्याची वेळ.प्रयोगाची वेळ रात्री ८वाजून २८ मिनिटे,किंवा ८वाजून १७ मिनिटे अशी एखाद्या शुभकार्याचा मुहूर्त असावा तशी जाहीर केली जायची.आणि तिसरी घंटा रात्री बरोब्बर आठ वाजल्यानंतरच्या नेमक्या त्या मिनिटाला होत असतानाच पडदा उघडला जायचा.नाटकाची अनाउन्समेंट होतानाही पहिला,दुसरा,तिसरा अंक संपण्याच्या आणि पुढचा अंक सुरु होण्याच्या अशाच ‘नेमक्या’ वेळा उदघोषित करून पाळल्याही जायच्या.त्यांची नाटकेही तशीच दर्जेदारही असायची.पण वेळेच्या बाबतीतली त्यांची ती शिस्त मात्र एकमेवाद्वितीयच.वेळेचं हे नियोजन खरंच थक्क करणारं.आज आठवलं तरी हे सगळं अविश्वसनीय आणि म्हणून स्वप्नवतच वाटत रहातं.

याखेरीज तिथल्या सोशलक्लबतर्फे काॅलनीतील हौशी कलाकारानी स्वत: बसवून सादर केलेली असंख्य नाटकेही आनंद देऊन गेलेली आहेत.एका वर्षी स्थानिक हौशी कलाकारांनी बसवलेल्या पु.लंच्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकात पुढे कवी आणि गीतकार म्हणून रसिकप्रिय झालेल्या , तेव्हा नवतरूण असलेल्या सुधीर मोघे यानी केलेल्या कवी संजीव या भूमिकेची आठवणही मी विसरलेलो नाहीय.(श्रीकांत आणि सुधीर मोघे हे बंधूद्वय त्याकाळचे वाडीकरच.)

माझ्या न कळत्या वयापासून दर्जेदार नाटके सातत्याने पहायचा योग किर्लोस्करवाडीतील आमच्या वास्तव्यामुळे आला हे खरेच,पण पुढेही नोकरीनिमित्ताने मी प्रथम मुंबईत गेलो तो १९७१-७२चा काळ हा प्रायोगिक रंगभूमीचा पायाभरणीचा काळ तर होताच शिवाय आधुनिक व्यावसायिक रंगभूमीचा भरभराटीचा काळही होता.त्यात योगायोगाने माझे वास्तव्य शिवाजी मंदिरला चालत जाता येईल अशा दादरच्या नूर बिल्डिंग

मधे.त्यावेळच्या पगाराचा विचार केला तर तेव्हाचे नाटकांचे ४-५ रुपयांचे दरही न परवडणारेच वाटायचे.पण बालपणीच मनात पेरली गेलेली नाटकाची ओढ मला स्वस्थ बसू देत नव्हतीच.मग जमेल तिथे टोकाची काटकसर करत पैसे साठवून शिवाजी मंदिरला जाऊन नाटकं पहायची चैन करावी लागायची.त्यावेळी मी पाहिलेल्या नटसम्राट, संध्याछाया, जास्वंदी,अशा पुढे मैलाचा दगड ठरलेल्या असंख्य नाटकांनी माझ्यातला प्रेक्षक घडवतानाच माझ्याही नकळत माझ्या अभिरूचीला योग्य वळणही लावलं.पुढच्या काळात मी पाहिलेल्या विषवृक्षाची छाया, पुरुष,बॅरिस्टर,गारंबीचा बापू, हयवदन,ऋणानुबंध,सख्खे शेजारी,नातीगोती,हमीदाबाईची कोठी,महासागर यासारख्या असंख्य नाटकांच्या विषयवैविध्य आणि सकस मांडणीने मला कधीच विसरता न येणारा नाट्यानुभव दिलेला आहे.प्रेक्षकम्हणून मला घडवण्यात या सगळ्याच नाटकांचा महत्वाचा वाटा आहे.

या वेळेपर्यंत एक आवड म्हणून कथालेखनाचा व्यासंग जपलेल्या आणि त्यात बऱ्यापैकी स्थिर झालेल्या मला नाट्यलेखन हे एक वेगळंच तंत्र आहे आणि ते आपल्याला जमणार नाही असंच वाटायचं आणि मग मी दुधाची तहान ताकावर भागवावी तसा डोळसपणे नाटके पहात रहायचो.मी नाट्यलेखनाकडे वळलो तेही पुढे खूप वर्षांनंतर.तोही अतिशय अनपेक्षित योगायोगच होता.त्या संपूर्ण प्रवासाबद्दलही सांगण्यासारखं बरंच कांही आहे पण ते पुन्हा कधीतरी…!

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
श्री.सुधा भोगले.

अरविंद लिमयेंच्या नाट्य लेखनाची मुळं,वाडीतील,वास्तव्यात रुजली.याचे वर्णन छान.आहे.पुढील नाट्य लेखनाची आवड वृध्दींगत कशी झाली हे ही वाचायला आवडेल.