श्री तुकाराम दादा पाटील
विविधा
☆ निसर्ग, साधना आणि सामर्थ्य… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
एखादी कल्पना सुद्धा कल्पकतेनेच कागदावर मांडताना वास्तवाच्या घटनेची गती वेगळ्या वळणाने वास्तवाचा हात न सोडता ज्याला अंतीम नैसर्गिक सत्यापर्यंत लिलया पोहोचवता येते तोच खरा साहित्यिक बनतो.
पाळलेले कबूतर अवकाशात उंच उंच गिरक्या मारताना नाविन्याचा शोध घेत नाही. किंवा कुठल्याही लक्षाचा वेध घेत नाही. कारण त्याला माहीत असतं आपल्या दाण्यापाण्यची व्यवस्था आपल्या मालकाने आपल्या खुराड्या जवळच करून ठेवली आहे.
पण गरूडाला गगनभरारी घेतच आपलं लक्ष निश्चित करून त्यावर झडप टाकून ते मिळवावं लागत. कारण त्याला पुन्हा निसर्गाच्या कुशीतच परतायच असतं आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी म्हणूनच गरूड कबुतर, चिमणी वास्तवतेच्या वेगळ्या साच्यात आपला जीवनक्रम व्यतीत करताना आपापला प्रवर्ग वेगळा वेगळा आहे. हे ओळखून असतात त्यानी आपल्या वेगळ्या वेगळ्या तपसाधनेने वेगळी वेगळी सिद्धी साध्य केलेली असते. विधात्याने ही त्यांना तसेच घडवलेले असते.
हे नैसर्गिक सामर्थ्य आजपावेतो निसर्गाने कठोर साधना करणारानाच स्वखुशीने बहाल केले आहे. म्हणून साधना महत्वाची केवळ उसनवारी करून यातले काही साधता येत नाही. ऊर्जाश्रोत मुळात नैसर्गिक आहे. तो मिळवायला माणसाला निसर्गालाच शरण जावे लागते. स्तुतीचे भाडोत्री डोलारे भाडे थकताच पोबारा करतात आणि आपण उघडे पडलो आहोत याची जाणीव होते. म्हणून निसर्ग दत्त सामर्थ्य हेच अखेरचे वास्तदर्शी सत्य असते.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈